प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 23 March 2018

माझी नात बारावीत शिकते आहे. अंदाजे दोन वर्षांपासून तिचा वरचेवर घोळणा फुटतो. महिन्यातून एक-दोन वेळा तरी त्रास होतोच, निश्‍चित कारण समजत नाही. रक्‍त थांबविण्यासाठी डोक्‍यावर पाणी टाकावे लागते. बर्फाच्या पिशवीने शेकावे लागते, पण यात तिचा पूर्ण दिवस वाया जातो. अभ्यास होत नाही. कृपया आपण उपचार सुचवावेत.
.... अशोक शहा

माझी नात बारावीत शिकते आहे. अंदाजे दोन वर्षांपासून तिचा वरचेवर घोळणा फुटतो. महिन्यातून एक-दोन वेळा तरी त्रास होतोच, निश्‍चित कारण समजत नाही. रक्‍त थांबविण्यासाठी डोक्‍यावर पाणी टाकावे लागते. बर्फाच्या पिशवीने शेकावे लागते, पण यात तिचा पूर्ण दिवस वाया जातो. अभ्यास होत नाही. कृपया आपण उपचार सुचवावेत.
.... अशोक शहा

उत्तर - वारंवार नाकाचा घोळणा फुटणे हे शरीरात उष्णता वाढलेली असल्याचे एक निदर्शक लक्षण आहे. यासाठी रोज सकाळी एक चमचा गुलकंद, तसेच एक चमचा मोरावळा घेण्याचा, सकाळ-संध्याकाळ कामदुधा, तसेच ‘संतुलन पित्तशांती’ या गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. टाळूवर कायम शीत गुणधर्माचे तेल उदा. ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’, जे खोबरेल व बदाम तेलावर अनेक सौम्य व शीत वनस्पतींचा संस्कार करून तयार केले जाते, दोन-तीन थेंब लावणे, नियमित पादाभ्यंग करणे, रात्री झोपताना नाकात घरी बनविलेल्या साजूक तुपाचे किंवा तयार ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकणे या सर्व उपायांचा फायदा होईल. ताजे आवळे उपलब्ध असतील तेव्हा रोज एका आवळ्याचा रस काढून त्यात चवीनुसार खडीसाखर मिसळून घेण्यानेही रक्‍त शुद्ध होण्यास व उष्णता कमी होण्यास मदत मिळेल. लसूण, हिंग, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, दही, वांगे वगैरे गोष्टी आहारातून वर्ज्य करणे हितावह. 

मी शाकाहारी आहे, माझा आहार नियंत्रित आहे. सकाळी योगासने वगैरेही करतो. परंतु मला युरिक ॲसिड वाढण्याचा खूप त्रास आहे. डॉक्‍टरानी दिलेली गोळी घेऊनही पाय दुखत असतो, युरिक ॲसिड वाढलेलेच राहते. कृपया मार्गदर्शन करावे.
..... राम देशपांडे

उत्तर - रक्‍तात युरिक ॲसिड वाढलेले सापडणे हे शरीरात अशुद्धी साठत असल्याचे एक लक्षण असते. त्यामुळे यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म करून शरीरातील विषद्रव्ये, वाढलेले दोष शरीराबाहेर काढून टाकणे. विशेषतः अगोदर व्यवस्थित स्नेहन करून नंतर विरेचन, बस्ती हे उपचार करून घेणे उत्तम होय. बरोबरीने पुनर्नवासव, अमृतारिष्ट घेण्याचा उपयोग होईल. आठ-पंधरा दिवसांतून एकदा घरच्या घरी सौम्य विरेचक औषध घेऊन पोट साफ होऊ देण्याचाही फायदा होईल. गोक्षुरादी गुग्गुळ, ‘समसॅन गोळी’ घेणे, वैद्यांच्या मार्गदर्शनाने ‘सॅन अमृत’ गोळी घेणे याचा फायदा होईल. पाय दुखतो त्या ठिकाणी एक दिवस ‘संतुलन शांती सिद्ध तेल’, दुसऱ्या दिवशी ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावण्याचा, वैद्यांच्या सल्ल्याने विशेष लेप तयार करून घेऊन लावण्याचाही उपयोग होईल. आहार नियंत्रित आहे ते उत्तमच आहे. कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, वांगे, पावटा, वाल, वाटाणे, गवार, दही, टोमॅटो, चिंच वगैरे गोष्टी आहारातून टाळणे श्रेयस्कर.  

मी दुसऱ्या वेळी गरोदर आहे. पहिल्या बाळाच्या वेळी मला पोटावर खूप ‘स्ट्रेच मार्क्‍स’ आले होते. या वेळी येऊ नयेत यासाठी काय करायला हवे?
..... सुवर्णा

उत्तर - ‘स्ट्रेच मार्क्‍स’वर आयुर्वेदात उत्तम मार्गदर्शन केलेले आहे आणि त्याचा प्रत्यक्षातही उत्तम फायदा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. साधारण तिसऱ्या महिन्याच्या आसपास जेव्हा पोटाचा घेर वाढू लागल्याने तेथील त्वचेवर ताण यायला सुरवात होते, तेव्हापासून दिवसातून दोन वेळा ‘संतुलन रोझ ब्युटी तेल’ लावण्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो. तसेच स्नानाच्या वेळी पोटावर अनंतमूळ, ज्येष्ठमध, वाळा वगैरे वर्ण्य द्रव्यांनी बनविलेले उटणे किंवा तयार ‘सॅन मसाज पावडर’ हलक्‍या हाताने चोळून लावण्यानेही ‘स्ट्रेच मार्क्‍स’ येण्यास प्रतिबंध होऊ शकतो. कधी कधी त्वचा ताणली गेल्याने खाज येऊ लागते. अशा वेळी ज्येष्ठमधाचा काढा थंड करून त्याची धार पोटावर धरण्याने किंवा काढ्यात भिजविलेल्या कापडाची घडी पोटावर ठेवण्याने बरे वाटते. चालणे, योगासने करणाऱ्या स्त्रियांमध्ये ‘स्ट्रेच मार्क्‍स’चे प्रमाण कमी असते असेही दिसून आले आहे. स्तनांचे आरोग्य व दृढता चांगली राहावी यासाठी ‘संतुलन सुहृद तेल’ लावण्याचा उपयोग होताना दिसतो.

माझे वय ३२ वर्षे आहे. मला पाच वर्षांची एक मुलगी आहे. मी सध्या दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करते आहे. अशोकादी सिद्ध घृत घ्यायचे आहे. याबद्दल मार्गदर्शन करावे.
.... गीतांजली

उत्तर - ‘संतुलन अशोकादी सिद्ध घृत’ हे अशोक, माका, ज्येष्ठमध, शतावरी वगैरे गर्भाशयाला पोषक आणि गर्भाशयाची शुद्धी करण्याला मदत करणाऱ्या द्रव्यांनी संस्कारित घृत आहे. हे घृत गर्भधारणेपूर्वी कमीत कमी दोन-तीन महिन्यांअगोदरपासून रोज सकाळी एक चमचा या प्रमाणात घ्यायचे असते. पंचकर्मानंतर हे तूप घेण्याचा अधिक चांगला फायदा होतो. बरोबरीने गर्भधारणेला मदत होण्यासाठी शतावरी कल्प, ‘संतुलन प्रशांत चूर्ण’, ‘संतुलन धात्री रसायन’ वगैरे रसायन घेणे, ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे हेही उत्तम साहायक असते. यजमानांनी सुद्धा ‘संतुलन चैतन्य कल्प’, ‘मॅरोसॅन’, ‘संतुलन आत्मप्राश’ ही रसायने घेणे चांगले होय.

माझा मुलगा तेरा वर्षांचा आहे. त्याचे वजन ६५ किलो आहे. वजन कमी करण्यासाठी काही उपाय सुचवावा. त्याला भरभर चालताना धाप लागते, मध्ये मध्ये रक्‍तदाबसुद्धा वाढलेला असतो. कृपया मार्गदर्शन करावे.
.... मानस

उत्तर - लहान वयात इसके जास्ती वजन, त्यातही अधून मधून रक्‍तदाब वाढणे यावर तातडीने उपचार करायला हवेत. यासाठी आहार, औषधे, योगासने या त्रिसूत्रीचा अवलंब करायला हवा. नियमित चालायला जाणे, पोहणे, किमान दहा सूर्यनमस्कार करणे चांगले, योगासनांमुळे वजनाबरोबरच रक्‍तदाबसुद्धा संतुलित राहण्यास मदत मिळेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण शरीरावर ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ जिरवणे, स्नानाच्या वेळी ‘सॅन मसाज पावडर’सारखे उटणे चोळून लावणे, मेदपाचक वटी, त्रिफळा गुग्गुळ, ‘लिपिसॅन’सारखी औषधे घेणे चांगले. रात्रीच्या जेवणात पोळीऐवजी भाकरीवर भर देणे, रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणाच्या तुलनेने निम्म्या प्रमाणात असणे, मांसाहार, अंडी, दही, चीज, बेकरी उत्पादने टाळणे, वाटाणा, वाल, वांगे, कोबी, फ्लॉवर वगैरे गोष्टी आहारातून टाळणे सुद्धा आवश्‍यक. रोज सकाळी थंड (सामान्य तापमानाच्या) पाण्यात चमचाभर मध घेण्याने, तसेच दुपारी जेवणानंतर गरम पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून घेण्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer