esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

गेल्या सात वर्षांपासून माझ्या दोन्ही तळपायांत भरपूर आग होते, जळजळ होते. विशेषतः चालताना हा त्रास जास्ती जाणवतो. यावर आजपर्यंत भरपूर उपचार घेऊन पाहिले, पण उपयोग झाला नाही, डॉक्‍टरांच्या सल्ल्याने अनेक वेळा रक्‍तशर्करा तपासून घेतली; पण त्याचे रिपोर्टस व्यवस्थित आले. गेल्या पंधरा वर्षांपासून मी रक्‍तदाब कमी करण्यासाठी रोज एक गोळी घेतो. बाकी त्रास काही नाही. कृपया मार्गदर्शन करावे. ... पांडुरंग गुंगे

उत्तर - चालताना तळपायांत जळजळ होण्यामागे रक्ताभिसरण योग्य प्रमाणात न होणे हे मुख्य कारण असू शकते. रक्तदाब फक्त नियंत्रणात ठेवला, मात्र त्याच्या संप्राप्तीवर योग्य, प्रकृतिनुरूप उपचार झाले नाहीत, तर या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यावर वैद्यांच्या सल्ल्याने योग्य औषध सुरू करणे सर्वांत श्रेयस्कर. बरोबरीने संपूर्ण अंगाला अभ्यंग करणे, सकाळी ‘संतुलन सुहृदप्राश’सारखे हृदयाला व रक्ताभिसरणाला मदत करणारे रसायन घेणे, रात्री झोपताना सर्पगंधाघनवटी घेणे हे उपचार सुरू करता येतील. नियमित पादाभ्यंग करण्याने सुद्धा रक्ताभिसरणाला चालना मिळून तळपायाची आग होणे कमी होईल. चपला किंवा घरात घालायच्या स्लिपर्स प्लॅस्टिकच्या नसाव्यात.  

*********************************

मी  ‘फॅमिली डॉक्‍टर’चा नियमित वाचक आहे. माझे वय २२ वर्षे असून, गेल्या तीन वर्षांपासून मला डोक्‍यामध्ये त्वचाविकार असल्याचे निदान झाले आहे. डोक्‍यामध्ये कोंडासदृश खपल्या तयार होतात व केस खूप गळतात. तरी यावर उपाय सुचवावा. .... महेश

उत्तर - बहुतेक सर्व त्वचाविकारांमध्ये रक्तशुद्धीची आवश्‍यकता असते. यासाठी पंचतिक्त घृत, मंजिष्ठासॅन गोळ्या, ‘संतुलन अनंत कल्प’, ‘संतुलन मंजिसार आसव’ सुरू करण्याचा उपयोग होईल. केसांना कुठल्याही प्रकारचे रासायनिक द्रव्य मिसळलेले शांपू, हेअर डाय, हेअर कलर वगैरे लावणे चाळावे. केस धुण्यासाठी रिठा, शिकेकाई, आवळकाठी वगैरे द्रव्ये किंवा तयार ‘संतुलन सुकेशा’ मिश्रण वापरणे चांगले. एकदा रक्तशुद्धी झाली की केस गळणे आपोआप कमी होईल. बरोबरीने ‘हेअरसॅन’, प्रवाळपंचामृत या गोळ्या घेण्याने केसांना आतून शक्ती देता येईल. 

*********************************
माझे वय ४८ असून मला उच्च रक्‍तदाबासाठी रोज एक गोळी घ्यावी लागते. माझी मासिक पाळी नियमित आहे. परंतु वाताचा त्रास होतो. पायात गोळे येतात. तसेच संपूर्ण शरीरात फडफडल्यासारखे होते. कॅल्शियम वाढण्यासाठी काही उपाय सुचवावा. 
... पाटील

उत्तर - कॅल्शियम हे नैसर्गिक असले तरच कोणत्याही दुष्परिणामांशिवाय अंगी लागू शकते. यासाठी खारीक पुडीसह उकळलेले चांगले सकस दूध घेणे, आहारात नाचणीसत्त्व, खसखस, डिंकाचे लाडू यांचा अंतर्भाव करणे, ‘सॅनरोझ’ हे रसायन व ‘कॅल्सिसॅन गोळ्या’ घेणे हे उत्तम होय. यामुळे पायात गोळे येणे आपोआप कमी होईल. नियमित अभ्यंग करण्याने, आहारात किमान पाच चमचे घरी बनविलेल्या साजूक तुपाचा समावेश करणे, ‘संतुलन वातबल गोळ्या’, दशमूलारिष्ट किंवा दशमुळांचा काढा करून तो सकाळ-संध्याकाळ घेण्याचाही फायदा होईल. गोळी घेऊन रक्‍तदाब नियंत्रणात राहत असला तरी त्यामुळे अजून समस्या उद्भवू नयेत यासाठी वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतिनुरूप औषधे सुरू करणे श्रेयस्कर होय. 

*********************************
माझ्या वडिलांना गेल्या दीड वर्षापासून पित्ताशयात खडे झाल्याचे निदान झाले आहे. कधी कधी त्यांच्या पोटात खूप दुखते, उलट्या होतात. वडिलांचे शारीरिक श्रम खूप होतात. यामुळे त्यांचे वजन दिवसेंदिवस कमी होते आहे. शस्त्रकर्म करण्याची त्यांची तयारी नाही. तसेच शस्त्रकर्मानंतर पूर्ण बरे वाटेल अशी शाश्वती डॉक्‍टर देत नाहीत. कृपया काही उपाय सुचवावा.
.... दिव्या. 
उत्तर ः खडे झाल्यामुळे संपूर्ण पित्ताशय काढून टाकणे हे एकंदर आरोग्यासाठी चांगले नसते, त्यामुळे तशीच आत्ययिक अवस्था नसली तर शस्त्रकर्म टाळणे अधिक सयुक्तिक ठरते. मात्र, सध्या होत असलेला त्रास नक्कीच कमी व्हायला हवा. यासाठी सकाळी उठल्यावर काही खाण्यापूर्वी ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेण्याचा तसेच जेवणानंतर कामदुधा या गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅनकूल चूर्ण’ किंवा अविपत्तिकर चूर्ण घेण्याचाही फायदा होईल. पोटावर स्नानानंतर तसेच झोपण्यापूर्वी ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावणे हे सुद्धा चांगले. रोज दिवसातून दोन वेळा  मूठभर साळीच्या लाह्या खाणे, भूक लागली असता दुर्लक्ष न करणे व रात्री वेळेवर व पुरेशी झोप (किमान सहा-सात तास) झोप घेणे हे श्रेयस्कर. काही दिवस स्वयंपाकात तेल, मोहरी, हिंग, लसूण, कांदा वगैरे उष्ण व तीक्ष्ण पदार्थ वर्ज्य करून वरण-भात, मुगाची खिचडी, मुगाचे कढण, ज्वारीची भाकरी, साजूक तुपात जिरे, हळद, धण्याची फोडणी घालून केलेल्या साध्या फळभाज्या अशा अगदी साधा आहार घेणे हेसुद्धा आवश्‍यक. या उपचारांनी आणि आहारातील बदलांमुळे बरे वाटेलच, अन्यथा त्रासाची तीव्रता लक्षात घेता वैद्यांचा सल्ला घेणे चांगले होय.

*********************************
माझे वय ४३ वर्षे असून, माझी पाळी पुढे जाते, रक्‍तस्रावही कमी होतो. तसेच कंबर-पाय खूप दुखतात. घामाचा त्रासही खूप होतो. ही सर्व लक्षणे मेनोपॉजची आहेत का? कृपया उपाय सुचवावा.
... महादेवी 
उत्तर - रजोनिवृत्ती नेमकी कधी येईल हे सांगता येत नाही, कारण त्यावर प्रकृतीचा व जीवनशैलीचा मोठा प्रभाव असतो. मात्र, रजोनिवृत्ती जितकी उशिरा येईल तेवढे स्त्रीआरोग्यासाठी चांगले असते. या दृष्टीने रोज शतावरी कल्प टाकून दूध पिणे, रोज सकाळी नाश्‍त्यापूर्वी कोरफडीचा ताजा गर घेणे, कुमारी आसव किंवा ‘संतुलन फेमिनाईन बॅलन्स आसव’ घेणे, ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरणे या उपायांचा फायदा होईल. रात्री झोपण्यापूर्वी सर्वांगाला अभ्यंग, पाठ-कंबरेवर ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावण्याने, काही दिवस ‘संतुलन वातबल गोळ्या’ तसेच धात्री रसायन किंवा ‘सॅनरोझ रसायन’ घेण्याचाही उपयोग होईल. घामाचे प्रमाण कमी होण्यासाठी स्नानाच्या वेळी तसेच स्नानानंतर अंगावरून तुरटीचा खडा फिरविण्याचा उपयोग होईल. शरीरात बदल होत असतानाच्या या काळात शास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्म व उत्तरबस्ती करून घेण्याचाही उत्तम फायदा होताना दिसतो.