#FamilyDoctor प्रश्नोत्तरे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 September 2018

माझा मुलगा एक महिन्याचा आहे. मात्र, मला दूध योग्य प्रमाणात येत नाही. त्यामुळे मुलाचे पोट व्यवस्थित भरत नाही. तरी कृपया दुधाचे प्रमाण सुधारण्यासाठी काही उपाय सुचवावा.
...पांडव

माझा मुलगा एक महिन्याचा आहे. मात्र, मला दूध योग्य प्रमाणात येत नाही. त्यामुळे मुलाचे पोट व्यवस्थित भरत नाही. तरी कृपया दुधाचे प्रमाण सुधारण्यासाठी काही उपाय सुचवावा.
...पांडव

उत्तर - स्तन्यनिर्मिती योग्य प्रमाणात होण्यासाठी आईचा रसधातू परिपोषित होणे महत्त्वाचे असते. यादृष्टीने तुमच्या आहारात दूध, ताक, मऊ भात, तूप, मुगाचे कढण, मुगाची पातळ खिचडी, असे रसपोषक पदार्थ असायला हवेत. दिवसातून दोन-तीन वेळा कपभर दुधात दोन-तीन चमचे शतावरी कल्प मिसळून घेण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी पंचामृत, नाश्‍त्यानंतर काळ्या मनुका, अंजीर घेणे, सकाळ-संध्याकाळ चमचाभर धात्री रसायन घेणे, संतुलनच्या ‘लॅक्‍टोसॅन’ या स्तन्यनिर्मितीस मदत करणाऱ्या गोळ्या घेणे, रोज स्तनांना ‘संतुलन सुहृद तेल’ लावणे हेसुद्धा चांगले. वाटीभर अहळिवाची खीर रोज खाण्याचाही चांगला उपयोग होईल. या सर्व उपायांच्या बरोबरीने मन प्रसन्न व शांत ठेवणे, मनावर ताण येऊ न देणे हे महत्त्वाचे.

-----------------------------------------------------------------------

आपले लेख मला दैनंदिन जीवनात फार उपयोगी पडतात. माझे वय २४ वर्षे आहे. माझी समस्या अशी आहे, की मला मच्छर फार चावतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोठे फोड येतात. यार काही उपाय सुचवावा.
...शिरीष औटी

उत्तर - मच्छर चावू नयेत यासाठी उपाययोजना स्वतःलाच करावी लागेल. उदा. रात्री मच्छरदाणी वापरणे, संध्याकाळच्या वेळी घराची दारे-खिडक्‍या बंद ठेवणे, लांब बाह्याचे कपडे वापरणे, घरात किंवा घराच्या आसपास डबके साठलेले नाही, याकडे लक्ष ठेवणे वगैरे. घरात सकाळ-संध्याकाळ धूप करण्यानेही मच्छरांचे प्रमाण कमी होते. कोळसा किंवा गवरीचा निखारा तयार करून त्यावर ‘संतुलन प्युरिफायर धूप’, चांगला कापूर, घरात तुळशीचे झाड असले, तर त्याची एक-दोन पाने टाकून आलेला धूप घरात फिरवता येतो. यामुळे मच्छरांप्रमाणे इतर दृश्‍य, अदृश्‍य म्हणजे सूक्ष्म जीवजंतूंनाही अटकाव होऊ शकतो. मच्छर चावल्यावर त्या ठिकाणी लागलीच थेंबभर ‘संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल’ किंवा शुद्ध गुलाबजल लावले, तर गांधी येण्यास प्रतिबंध होईल. दोन-तीन महिन्यांसाठी पंचतिक्‍त घृत घेण्याने, तसेच संतुलनच्या ‘अनंतसॅन गोळ्या’ घेण्यानेही ही प्रवृत्ती नाहीशी होण्यास मदत मिळेल.

-----------------------------------------------------------------------

माझे वय ५५ वर्षे असून, माझे कोलेस्टेरॉल दिवसेंदिवस वाढते आहे. सध्या दोनशेच्या वर आहे. उपाय केले तरी ते कमी होत नाही. ही भविष्यात मधुमेहासारखे रोग होण्याच्या आधीची पायरी आहे, असे म्हणतात. तरी कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काही उपाय सुचवावा.   ... संजीव 
उत्तर - कोलेस्टेरॉल हा आरोग्याचा एकमेव मापदंड नव्हे. तसेच, कोलेस्टेरॉल कमी म्हणजे दोनशेच्या खालीच असावे, असे नाही, तर ते दोनशे पन्नासपर्यंत, काही प्रकृतीच्या व्यक्‍तीमध्ये याहूनही थोडे जास्त असले, तरी चालू शकते. मुळात दिवसातून दोन वेळा साधे जेवण, हलका नाश्‍ता, प्रकृतीनुसार आहार, नियमित योगासने, वेळेवर जेवणे-झोपणे, त्रास नसला तरी चाळिशीनंतर शरीर शुद्ध करणारे पंचकर्म करून घेणे या गोष्टी ध्यानात ठेवल्या, तर  कोलेस्टेरॉल वाढणार नाही; शिवाय मधुमेह, रक्‍तदाब, हृद्रोग यांसारख्या आजारांनाही दूर ठेवता येईल.

-----------------------------------------------------------------------

माझे वय २४ वर्षे आहे. माझी मासिक पाळी वेळेत येते, मात्र हवा तसा रक्‍तस्राव होत नाही. ॲलोपॅथीचे औषध घेतले, तर एक महिना फरक पडतो, पण मला या औषधांची सवय लावायची नाही. कृपया उपाय सुचवावा. ...भार्गवी
उत्तर - मासिक पाळी नियमित आहे, मात्र रक्‍तस्राव कमी दिवस किंवा कमी प्रमाणात जातो यावर आयुर्वेदिक उपचारांचा उत्तम उपयोग होताना दिसतो. यादृष्टीने दिवसातून दोन वेळा शतावरी कल्प घालून दूध घेण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी नाश्‍त्यापूर्वी एक चमचाभर कोरफडीचा ताजा गर घेण्याचाही फायदा होईल. काही दिवस दोन्ही जेवणानंतर दोन-दोन चमचे ‘संतुलन फेमिनाईन बॅलन्स’ आसव घेणे, ‘फेमिसॅन सिद्ध तेला’चा पिचू वापरणे हेसुद्धा उत्तम. रोज सकाळी सूर्यनमस्कार करणे, किमान पंधरा-वीस मिनिटे चालायला जाणे, आहारात पातळ पदार्थ उदा. ताक, सूप, फळांचे रस, पातळ भाजी, आमटी, कढी वगैरेंचा पुरेशा प्रमाणात समावेश असणे हेसुद्धा श्रेयस्कर. या उपायांनी गुण येईलच, तरीही एकदा तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेऊन स्त्री-संतुलनासाठी योग्य उपचार घेणे उत्तम होय.  

-----------------------------------------------------------------------

मला जुळी नातवंडे असून, त्यांचे वय अडीच वर्षे आहे. बालामृत व्यतिरिक्‍त मी त्यांना काय देऊ शकते? दोघांचेही डोळे निरोगी व सतेज राहण्यासाठी काय करू? एक नातू डोळे फार मिचकावतो व डोळे दुखतात, असे सांगतो. कृपया मार्गदर्शन करावे. ... जोशी
उत्तर - डोळे दुखत असल्यास एकदा नेत्रतज्ज्ञांना दाखवणे आवश्‍यक. दोघांनाही ‘संतुलन बालामृत’ देता आहात, ते चांगलेच आहे. मात्र, अडीच-तीन वर्षांनंतर बालामृत पुरेसे ठरत नाही. त्याऐवजी पंचामृतातून अर्धा चमचा ‘संतुलन अमृतशर्करा’ देण्यास सुरुवात करता येईल. दुधासह ‘संतुलन चैतन्य कल्प’ घेणेसुद्धा चांगले. यामुळे शक्‍ती वाढली की डोळ्यांत तेज आपोआप येईल. बरोबरीने या वयात मुलांना डोळ्यांत ‘संतुलन अंजन (काळे)’ घालण्याचा उपयोग होतो, असे दिसते. पादाभ्यंग करण्यानेही डोळ्यांची शक्‍ती सुधारण्यास मदत मिळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family Doctor Question Answer