प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Tuesday, 18 June 2019

‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीमधील लेखांमधून खूप मार्गदर्शन होते. ‘प्रश्नोत्तर’ सदरातील उत्तरांनी अनेक शंकांचे निरसन होते व आरोग्य चांगले राहते.

माझ्या पत्नीला मधुमेह नाही, मात्र गेल्या आठ महिन्यांपासून तिच्या उजव्या पावलावर झालेली जखम भरून येत नाही. शुद्ध रक्‍ताचा पुरवठा होत नसल्याने जखम भरत नाही, असे डॉक्‍टरांनी सांगितले. कृपया रक्‍ताभिसरण सुधारण्यासाठी मार्गदर्शन करावे. एका प्रश्नाच्या उत्तरात आपण व्हेरिकोज व्हेन्सवर सुवर्णजलाचा उपयोग होतो असे लिहिले होते, त्याचा मला खूपच फायदा झाला आहे.
.... हेमंत आपटे

उत्तर - जखम भरून यायला हवीच. तसेच रक्‍ताभिसरण सुधारणे, शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत शुद्ध रक्‍ताचा पुरवठा होणे आवश्‍यक आहे. हृदयाची व एकंदर रक्‍ताभिसरण संस्थेची शक्‍ती वाढविण्यासाठी आयुर्वेदात उत्तमोत्तम उपाय असतात, त्यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे सर्वांत चांगले. बरोबरीने संपूर्ण अंगाला ‘संतुलन अभ्यंग तीळ सिद्ध तेला’चा अभ्यंग करणे, ‘संतुलन सुहृदप्राश’, अर्जुनारिष्ट घेणे, वैद्यांच्या सल्ल्याने ‘संतुलन कार्डिसॅन प्लस’ हे चूर्ण मधात मिसळून घेणे हे उपाय सुरू करता येतील. नियमितपणे अनुलोम-विलोम करण्याचाही फायदा होईल. जखम भरून यावी यासाठी ‘सॅन हील ऑइंटमेंट’ लावण्याचा व एक दिवसाआड ‘संतुलन प्युरिफायर धुपा’ची धुरी घेण्याचा उत्तम गुण येईल. 

दीड वर्षांपूर्वी माझा डावा खांदा अचानक दुखू लागला. आता खांदा दुखणे थोडे कमी झाले असले, तरी डावा हात खूप दुखतो. डाव्या हाताने वजन उचलता येत नाही, हातातील शक्‍ती कमी झाल्यासारखी वाटते. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने बऱ्याच तपासण्या केल्या, बरीच औषधे घेतली पण गुण आला नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
.... विकास

उत्तर - या त्रासाचे मूळ वातदोषाच्या बिघाडात आहे. यावर पाठीचा कणा, मान, खांदा आणि डावा हात या सर्व भागांवर सकाळी स्नानापूर्वी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा या प्रकारे दोन वेळा ‘संतुलन कुंडलिनी  सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी  नाकात ‘नस्यसॅन घृता’चे  तीन-तीन थेंब टाकण्याचाही फायदा होईल. योगराज गुग्गुळ, ‘संतुलन वातबल’ गोळ्या, दशमूलारिष्ट घेण्यास सुरवात करता येईल. त्रासाची तीव्रता लक्षात घेता वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली बस्ती, पिंडस्वेदन, मेरुंदड पोटली यांसारखे उपचार घेणेही श्रेयस्कर. वाताशी संबंधित कोणत्याही त्रासावर वेळेवर योग्य ते उपचार घेणे अत्यावश्‍यक होय.

माझ्या पत्नीचे वय ६५ वर्षे असून त्यांना नेहमी काही ना काही तब्येतीचे त्रास असतात. हृदयाची तपासणी केली त्यात चार ब्लॉक्‍स आहेत असे समजले. त्यांचे वय व प्रकृती लक्षात घेता शस्त्रकर्म करण्याचे टाळले. परंतु पत्नीला कधी पायावर सूज, कधी अपचन, कधी फारच अशक्‍तपणा असे त्रास होतात. कृपया आपण काही उपाय सुचवावेत.
.... एस्‌. व्ही.

उत्तर - हृदयरोगावर शस्त्रकर्म हा एकमेव उपाय नसतो. उलट, पथ्य, औषधे, नियमित चालणे आणि वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म, हृद्‌बस्तीसारखे उपचार यांच्या समन्वयातूान अशा केसेसमध्ये उत्तम परिणाम साधता येतात. पचन सुधारण्यासाठी पत्नीला जेवताना उकळलेले गरम पाणी पिणे, जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग’ गोळ्या घेणे, रात्रीच्या जेवणात फक्‍त सूप, मुगाचे कढण, भाज्यांचे मिक्‍स सूप घेण्याची फायदा होईल. जेवणानंतर पुनर्नवासव घेण्याने पायांवरची सूज कमी होईल. नियमित अभ्यंग, सकाळ संध्याकाळ ‘संतुलन सुहृदप्राश’, वैद्यांच्या सल्ल्याने ‘संतुलन कार्डिसॅन चूर्ण’ सुरू करण्याने अशक्‍तपणा, कमी होईल, तसे हृदयावरही काम करता येईल. 

माझे वय २१ वर्षे असून, वजन कमी म्हणजे साडे अडतीस किलो आहे. मी सध्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेते आहे. मला वर्षातून दोन-तीन वेळा सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. आत्तापर्यंत डॉक्‍टरांची औषधे घेतली की बरे वाटत असे, मात्र सध्या दोन महिन्यांपासून झालेला खोकला कमी होत नाही. औषधे चालू असूनही फरक नाही. कृपया योग्य ते मार्गदर्शन करावे व उपाय सुचवावा.
..... श्रद्धा गोरे

उत्तर - रोगप्रतिकारशक्‍ती व एकंदर तब्येत सुधारणे हे गरजेचे आहे. या दृष्टीने रोज सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा ‘सॅन रोझ’ घेण्याचा व अर्धा-अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण मधात मिसळून घेण्याचा उपयोग होईल. खोकला आहे त्यासाठी ‘ब्राँकोसॅन कफ सिरप’ घेण्याचा, छाती व पाठ रुईच्या पानांनी शेकण्याचा उपयोग होईल. वजन वाढण्यासाठी नियमित अभ्यंग करणे, शतावरी कल्प टाकून दूध घेणे, सकाळी पंचामृत व भिजविलेले बदाम घेणे हे चांगले. अशा योग्य उपायांनी वजन वाढले की वारंवार सर्दी-ताप-खोकला होणेसुद्धा क्रमाक्रमाने कमी होत जाईल.  

मी  ‘फॅमिली डॉक्‍टर’ आवर्जून वाचतो. माझ्या दोन्ही मांड्यांची हाडे दुखतात. चालताना तर फारच ठणकतात. डॉक्‍टरांच्या उपायामुळे बरे वाटले नाही. कृपया उपाय सुचवावा.
.... हटकरे

उत्तर - रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही पायांना ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ लावणे, ‘संतुलन वातबल’ व ‘कॅल्सिसॅन’ या गोळ्या घेणे, हे उपाय सुरू करता येतील. स्नानाच्या वेळी मांड्यांवर कढत पाणी घेण्याचाही उपयोग होईल. आठवड्यातून एकदा प्रशिक्षित थेरपिस्टकडून अभ्यंग करून घेऊन नंतर वातशामक काढ्याच्या मदतीने स्वेदन करून घेण्याचाही उपयोग होईल. थोडेफार चालण्याचा सराव ठेवणेसुद्धा आवश्‍यक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family Doctor Question Answer