प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 12 July 2019

फॅमिली डॉक्‍टर’ मधील लेखांमधून खूप मार्गदर्शन होते. ‘प्रश्नोत्तर’ सदरातील उत्तरांनी अनेक शंकांचे निरसन होते व आरोग्य चांगले राहते.

माझे वय ४५ वर्षे असून गुडघे दुखतात. तपासण्या केल्या तर त्यात गुडघ्यांतील वंगण कमी झाले आहे, झीज झाली आहे, असे निष्पन्न झाले. यावर आयुर्वेदातील काही उपाय सुचवावा. .... लतिका
उत्तर - गुडघ्यातील वंगण वाढविण्यासाठी व झीज भरून येण्यासाठी आयुर्वेदात उत्तम उपाय असतात. गुडघ्यावर दिवसातून दोन-तीन वेळा ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ जिरविण्याचा उपयोग होईल. तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’, ‘वातबल’ गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. आहारात साजूक तूप, भिजविलेले बदाम, खसखस, नाचणीसत्त्व, डिंकाचे लाडू यांचा समावेश करणे, खारीक चूर्णासह उकळलेले दूध पिणे हेसुद्धा चांगले. गुडघा फार दुखत असेल तर त्यावर ‘सॅन वात लेप’ लावून ठेवण्याचाही उपयोग होताना दिसतो.  

--------------------------------------------------------------------
माझ्या मुलीला पाच वर्षांपूर्वी न्यूमोनिया झाला होता. अजूनही अधूनमधून खोकल्याचा त्रास होतो. डॉक्‍टरांकडे जाऊन औषधे घ्यावी लागतात. कृपया योग्य मार्गदर्शन करावे. ... प्रतिभा पाटील
उत्तर - न्यूमोनियाचा शरीरावर झालेला दुष्परिणाम व कमी झालेली प्रतिकारशक्‍ती सुधारण्यासाठी उपाय योजणे गरजेचे असते. यासाठी मुलीला सकाळ- संध्याकाळ च्यवनप्राश व ‘सॅनरोझ’ हे रसायन देण्याचा, तसेच अर्धा-अर्धा चमचा सीतोपलादी चूर्ण गरम पाण्याबरोबर किंवा मधात मिसळून देण्याचा उपयोग होईल. खोकला होणार असे वाटू लागले की लागलीच एक बेहडा, बोटभर लांबीचा ज्येष्ठमधाचा तुकडा व एक पिकलेले अडुळशाचे पान यांचा काढा करून देण्याचा उपयोग होईल. छातीला तेल लावून वरून रुईच्या पानांनी किंवा ओव्याच्या पुरचुंडीने शेक करण्याचाही उपयोग होईल. फुप्फुसांची कार्यक्षमता पूर्ण सुधारावी यादृष्टीने तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे. विशेष औषधी द्रव्यांच्या पोटलीने छाती-पोटावर मसाज करून घेणेसुद्धा श्रेयस्कर. दही, पनीर, चीज, सीताफळ, केळे, फणस रात्रीच्या वेळी दूध वगैरे कफकारक गोष्टी मुलीला न देणे चांगले.

--------------------------------------------------------------------
आम्ही बाळासाठी गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. बऱ्याच तपासण्या केल्या, त्यात स्त्रीबीजांची संख्या खूप कमी असल्याचे समजले. डॉक्‍टरांच्या मते मूल होणे अवघड आहे. तरी, स्त्रीबीजांची संख्या वाढून दिवस राहण्यासाठी काही उपाय सुचवावा.  ... गायत्री

उत्तर - स्त्रीबीजांची संख्या ही जन्मतः निश्‍चित झालेली असते, ती नंतर वाढविता येत नाही. मात्र दर महिन्याला स्त्रीबीज पूर्ण परिपक्वतेने तयार व्हावे, ते सर्वगुणांनी संपन्न असावे, गर्भधारणेसाठी सक्षम ठरावे यासाठी आयुर्वेदीय उपचारांचा उत्तम फायदा होताना दिसतो. यासाठी वैद्यांच्या मार्गदर्शनाने औषधे घेता येतात. मात्र त्यापूर्वी शास्त्रशुद्ध पंचकर्म करून घेणे सर्वोत्तम असते. तत्पूर्वी ‘फेमिसॅन तेला’चा पिचू, शतावरी कल्प, ‘संतुलन अशोकादी घृत’ घरच्या घरी घेण्यास सुरवात करता येईल. गर्भधारणा होण्यापूर्वी स्त्रीबीज व पुरुषबीज या दोघांची संपन्नता आवश्‍यक असते. यादृष्टीने यजमानांनीही च्यवनप्राश, ‘संतुलन चैतन्य कल्प’ घेण्याचा उपयोग होईल.  

--------------------------------------------------------------------

माझे वय ४३ वर्षे असून आमच्या घरी बहुतेक सर्व वडीलधाऱ्यांना उच्च रक्‍तदाबाचा त्रास आहे. रक्‍तदाब होऊ नये यासाठी मी काय उपचार घ्यायला हवेत?  
मल्हार

उत्तर - वडीलधाऱ्यांना रक्‍तदाबाचा त्रास असला तरी तो पुढच्या पिढीत जाऊ नये यासाठी वेळेवर व योग्य प्रयत्न करण्याचा उत्तम परिणाम मिळतो असे दिसते. आपल्या वयाचा विचार करता, शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म करून घेणे उत्तम ठरावे. रोज किमान अर्धा तास चालणे, दहा-बारा सूर्यनमस्कार घालणे, पुरेशा प्रमाणात झोपणे, वेळेवर जेवणे या गोष्टी दैनंदिन जीवनात पाळणे चांगले. अंगाला नियमित अभ्यंग करण्यानेही रक्‍ताभिसरणाला मदत मिळून रक्‍तदाब न वाढण्यास हातभार लागत असतो.  

--------------------------------------------------------------------

आमवाताच्या रुग्णांमध्ये आम तयार होण्याचे प्रमाण कमी-जास्त असते. आम तयार होऊ नये व साठून राहिलेल्या आमाचे पचन व्यवस्थित व्हावे यासाठी उपाय सुचवावेत.  ... साने 
उत्तर - आमावर उपचार करणे हे आयुर्वेदानेही कठीण मानलेले आहे. उकळलेले गरम पाणी पिणे, जेवणात आल्याचा वापर करणे, अचपन होणार नाही याकडे लक्ष ठेवणे हे आमावर उपचार करताना उपयोगी पडते. जेवणानंतर आमपाचक वटी घेणे, जेवणाच्या आधी लवणभास्कर चूर्ण लिंबाच्या रसाबरोबर घेणे हेसुद्धा आमपचनासाठी साहायक असते. गहू, तांदूळ वगैरे धान्य एक वर्ष जुने असणे, स्वयंपाकात वापरण्यापूर्वी भाजून घेणे, जेवण भूक लागेल तेव्हा व भूक असेल तेवढ्याच प्रमाणात घेणे हे सर्व आम तयार होऊ नये यासाठी साहायक असते. नियमित चालणे, अनुलोम-विलोम करणे, वेळच्या वेळी पंचकर्म करून शरीरशुद्धी करून घेणे हेसुद्धा शरीरात आमदोष तयार होऊ नये यासाठी उत्तम असते.

--------------------------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer