प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 18 August 2017

दुपारच्या व रात्रीच्या जेवणानंतर वज्रासनात दहा मिनिटे बसले तर चालते का? खडे मीठ, सैंधव, काळे मीठ, साधे मीठ, पादेलोण, समुद्र मीठ यात फरक काय? आहारात यापैकी कोणते मीठ वापरावे? सैंधव मीठ गुलाबी रंगाचे असते का?

... आनंद करंदीकर

दुपारच्या व रात्रीच्या जेवणानंतर वज्रासनात दहा मिनिटे बसले तर चालते का? खडे मीठ, सैंधव, काळे मीठ, साधे मीठ, पादेलोण, समुद्र मीठ यात फरक काय? आहारात यापैकी कोणते मीठ वापरावे? सैंधव मीठ गुलाबी रंगाचे असते का?

... आनंद करंदीकर

उत्तर - जेवणानंतर वज्रासनात दहा मिनिटे बसणे उत्तम होय. यामुळे पचनशक्‍ती सुधारण्यास हातभार लागतो. मलावष्टंभ, गॅसेस वगैरे तक्रारींवर वज्रासनात बसणे हा एक उत्तम उपचार असतो. खडे मीठ, साधे मीठ व समुद्र मीठ ही सर्व एकाच मिठाची वेगवेगळी नावे होत. समुद्राच्या पाण्यापासून बनवलेले ते समुद्र मीठ, ते जर खड्याच्या स्वरूपात असले तर त्याला खडे मीठ म्हणतात, चूर्ण स्वरूपात असले तर त्याला साधे मीठ म्हणतात. सैंधव मीठ हे विशेष प्रकारच्या दगडापासून तयार झालेले असते. त्यामुळे त्याला रॉक सॉल्ट असेही म्हणतात. काळे मीठ आणि पादेलोण ही सुद्धा एकाच मिठाची दोन वेगवेगळी नावे आहेत. हे गुलाबीसर असते आणि त्याला विशिष्ट तीव्र गंध असतो. सैंधव मिठाचे खडे गुलाबीसर किंवा राखाडी रंगाचे असतात. आयुर्वेदाने आहारात वापरण्यासाठी सैंधव प्रशस्त सांगितलेले आहे. त्याखालोखाल कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले नैसर्गिक समुद्र मीठ वापरणे चांगले होय.

--------------------------------------------------------------------

मला ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून खूप काही शिकायला मिळते. माझ्या आईचे तीन-चार वर्षांपूर्वी गर्भाशय काढलेले आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात दुखत होते. त्यामुळे तपासण्या केल्या, तेव्हा त्यात पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले. आईला पुन्हा शस्त्रकर्म करायचे नाही. तरी आपण योग्य उपाय सुचवावा. मधुमेह असला तरी कोरफडीचा गर घेतलेला चालतो का?

... सुषमा हुमणे

उत्तर - मधुुमेही व्यक्‍ती एक चमचाभर कोरफडीचा गर घेऊ शकते. हा गर ताजा म्हणजे कोरफडीच्या पानातून काढलेला असावा. पित्ताशयात खडे असले तरी त्यामुळे पोटदुखी किंवा इतर त्रास होऊ नयेत यासाठी आहार-आचरणात काळजी घेण्याचा फायदा होत असतो. बरोबरीने पित्तसंतुलनासाठी औषधे घेण्याचाही फायदा होताना दिसतो. या दृष्टीने आईला सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’, कामदुधा, ‘सॅन पित्त सिरप’ देण्यास सुरू करता येईल. रात्री झोपण्यापूर्वी पोटावर ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावण्याचा, तसेच चमचाभर अविपत्तिकर चूर्ण घेण्याचाही उपयोग होईल. अति प्रमाणात मीठ, आंबवलेले पदार्थ, चिंच, शेंगदाणे, दही, ढोबळी मिरची, वांगे, अति प्रमाणात टोमॅटो वगैरे पित्तदोष वाढविणाऱ्या गोष्टी आहारातून टाळणे, तसेच उपवास करणे टाळणे चांगले. गर्भाशय काढून टाकावे लागले आहे, त्याचे दुष्परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने आईने ‘फेमिसॅन सिद्ध तेला’चा पिचू नियमित वापरणे उत्तम होय.

--------------------------------------------------------------------

माझे वय ५२ वर्षे असून, मला कोणताही मोठा आजार नाही. माझी प्रकृती वाताची असून माझे काम बैठ्या स्वरूपाचे असते. गेल्या वीस वर्षांपासून मला कानात आवाज येण्याचा त्रास आहे. सांध्यातून कटकट आवाज येतो, डोळे खोल गेलेले आहेत, शरीर खूप स्थूल झाले आहे, जेवणानंतर पोट फुगते. कृपया उपाय सुचवावेत.

... सुशांत मराठे   
 

उत्तर - वाताच्या त्रासावर स्नेहन हा उपाय उत्तम असतो. त्यामुळे रोज औषधी सिद्ध तेलाने अभ्यंग करणे चांगले. यासाठी ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ वापरले तर एका बाजूने वातसंतुलन होऊन सांध्यातून आवाज येणे कमी होईल. तसेच दुसऱ्या बाजूने वाढलेले अवाजवी वजन कमी होण्यासही उपयोग होईल. दिवसभर बैठे काम आहे, तेव्हा रोज चालायला जाणे, सूर्यनमस्कार तसेच ‘संतुलन क्रियायोगा’सारखी सहजतेने करता येणारी, न थकवणारी योगासने करणे चांगले. कानात ‘संतुलन श्रुती तेल’, नाकात घरी बनविलेल्या साजूक तुपाचे किंवा ‘नस्यसॅन घृता’चे तीन-तीन थेंब टाकण्याचाही उपयोग होईल. जेवणात काही दिवस गव्हाच्या ऐवजी तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर ही धान्ये समाविष्ट करून पाहता येतील. जेवणाच्या अगोदर एक-दोन चमचे आल्या-लिंबाचा रस, जेवताना गरम पाणी आणि जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग गोळ्या’ घेण्याने पचनशक्‍ती सुधारण्यास मदत होईल व क्रमाक्रमाने पोट फुगण्याचा त्रास कमी होत जाईल. प्रकृती व सध्या जाणवणारी लक्षणे लक्षात घेता, शास्त्रोक्‍त पद्धतीने शरीरशुद्धी करून घेण्याचा, विशेषतः हलके विरेचन व बस्ती करून घेणे, नंतर शिरोबस्ती उपचार करून घेणे सर्वांत चांगले होय.

--------------------------------------------------------------------

मला स्पाँडिलोसिसचा त्रास आहे, त्यामुळे हाताला मुंग्या येतात. दोन्ही कान, डोके, चेहरा या ठिकाणी आग आग होऊन दुखते. तसेच गेल्या चार वर्षांपासून अंगावर पित्ताच्या गांधी उठतात. दोन्ही कानांत चटके बसल्यासारखे वाटते, तरी कृपया मार्गदर्शन करावे.

.... अर्चना
 

उत्तर - यावर आहार आणि औषधोपचार अशा दोन्ही बाजूंनी उपचार करणे आवश्‍यक होय. मान, चेहरा, टाळू या तिन्ही ठिकाणी दिवसातून दोन वेळा ’संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. कानाच्या पाळीलाही हे तेल लावता येईल. पाठीच्या कण्याला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावण्याचा, तसेच नाकात साजूक तुपाचे किंवा ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकण्याचा उपयोग होईल. रात्रीच्या जेवणानंतर ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचा, सकाळ-संध्याकाळ प्रवाळपंचामृत, कामदुधा तसेच ‘संतुलन वातबल गोळ्या’ घेण्याचा उपयोग होईल. काही दिवस स्वयंपाक करण्यासाठी तेल न वापरता फक्‍त घरचे साजूक तूप वापरणे चांगले. आंबट पदार्थ, तिखट पदार्थ, आंबवून तयार केलेले पदार्थ, वांगे, गवार, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, कच्चे मीठ, दही, अंडी, मांसाहार आहारातून वर्ज्य करणे चांगले.

--------------------------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer