प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 25 August 2017

मी २१ वर्षांची आहे. मला दोन वर्षांपासून टॉन्सिलायटिसचा त्रास आहे. बोलताना तसेच श्वास घेताना त्रास होतो. घशामध्ये कायम अवरोध झाल्यासारखे वाटते. कृपया उपाय सुचवावा.
- ऐश्वर्या 

मी २१ वर्षांची आहे. मला दोन वर्षांपासून टॉन्सिलायटिसचा त्रास आहे. बोलताना तसेच श्वास घेताना त्रास होतो. घशामध्ये कायम अवरोध झाल्यासारखे वाटते. कृपया उपाय सुचवावा.
- ऐश्वर्या 

उत्तर - टॉन्सिलायटिस वारंवार होऊ नये यासाठी रोगप्रतिकारशक्‍ती सुधारणे आवश्‍यक असते. यादृष्टीने काही दिवस रोज सकाळी च्यवनप्राश, तसेच ‘सॅनरोझ’ ही रसायने घेण्याचा फायदा होईल. सकाळ संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण कोमट पाण्यासह किंवा मधात मिसळून घेण्याचा उपयोग होईल. शक्‍य तेव्हा उकळून घेतलेले कोमट पाणी पिणे चांगले. तसेच सकाळी उठल्यानंतर रोज गंडुष करणे म्हणजे एका चमचा इरिमेदादी तेल किंवा ‘संतुलन सुमुख तेल’ आठ-दहा मिनिटांसाठी तोंडात धरून ठेवणेही उपयुक्‍त होय. दही, पनीर, चीज, शीतपेये, आइस्क्रीम, सीताफळ, केळी, फणस वगैरे गोष्टी आहारातून वर्ज्य करणे चांगले. आठवड्यातून दोन वेळा गरम पाण्यात गवती चहा, तुळशीची पाने, ओवा टाकून त्याचा वाफारा घेण्याचा फायदा होईल. ऑफिसमध्ये किंवा घरी पंखा किंवा एसीचा झोत डोक्‍यावर येणार नाही याकडे लक्ष देण्याचाही उपयोग होईल.  

---------------------------------------------------------- 

सकाळची ‘फॅमिली डॉक्‍टर‘ पुरवणी अतिशय चांगली आहे. त्यातही दिनांक ७ जुलै २०१७ ची पुरवणी फारच उत्कृष्ट आहे. या अंकात ओवा, ज्येष्ठमध, तीळ यांचे मिश्रण एकत्र करून सुपारीप्रमाणे खायला सांगितले आहे. यातील तीळ काळे की पांढरे असावेत? तसेच या तिन्ही द्रव्यांचे प्रमाण काय असावे?
- थत्ते

उत्तर - सदर मिश्रणातील तीळ पांढरे असावेत. यात ओवा व तीळ प्रत्येकी एक एक भाग घेतले तर ज्येष्ठमधाचे चूर्ण अर्धा भाग असावे. ओवा व तीळ मंद आचेवर वेगवेगळे भाजून घेतले आणि भाजताना त्यावर थोडासा लिंबाचा रस आणि मीठ भुरभुरले तर तयार मिश्रण अजून स्वादिष्ट होते.

----------------------------------------------------------

‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणी, ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे पुस्तक आणि वेळोवेळी मिळालेले तुमचे मार्गदर्शन यामुळे दवाखान्यात जावे लागण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. याबद्दल तुमचे आभार. माझी मुलगी दीड वर्षाची आहे. ती चोवीस तासांत गाईचे एक लिटर दूध पिते. तिची भूक व्यवस्थित आहे. इतर जेवणही ती व्यवस्थित करते. वयोमानानुसार दुधाचे प्रमाण किती असावे याबद्दल मार्गदर्शन करावे.
- प्रियांका जगताप

उत्तर - नवजात बालकाचा दूध हाच संपूर्ण आहार असतो. त्यामुळे लहान वयात दूध
सवयीचे असते. फक्‍त हे दूध चांगल्या प्रतीचे, निर्भेळ आणि भारतीय वंशाच्या गाईचे (ए २ प्रकारचे) असण्यावर भर द्यायला हवा. लहान वयात दिवसातून तीन-चार वेळा दूध प्यायले तरी चालते. मात्र क्रमाक्रमाने म्हणजे मूल पाच-सहा वर्षांचे झाले की सकाळी व संध्याकाळी असे दिवसातून दोन वेळा दूध पिणे चांगले. घरामधील सर्वांनीच असे शुद्ध आणि सकस दूध पिणे चांगले असते. घरातील मोठ्या व्यक्‍तींनी सूर्यास्तानंतर दूध पिणे टाळणे चांगले. दूध पचण्यास मदत व्हावी आणि दुधाची सकसता वाढवावी यासाठी दुधात शतावरी कल्प, ‘संतुलन चैतन्य कल्प’ मिसळता येते. 

----------------------------------------------------------

नाचणी, ज्वारी व बाजरी ही धान्ये आपण कोणत्या ऋतूत खाऊ शकतो? उच्च रक्‍तदाब असणाऱ्या व्यक्‍तीला ही धान्ये चालतात का? पावसाळ्यात नाचणी खाल्ली तर चालते का? 
- सुवर्णा दाते   

उत्तर - नाचणी तसेच ज्वारी ही दोन्ही धान्ये पित्त कमी करणारी असतात. त्यामुळे ही धान्ये उन्हाळ्यात, तसेच शरद ऋतूत खाणे उत्तम असते. बाजरी मात्र जरा उष्ण असल्याने हिवाळ्यात खाणे चांगले असते. ज्वारी थंड आणि बाजरी उष्ण असल्याने ज्वारी-बाजरीची मिश्र भाकरी संपूर्ण वर्षभर खाता येते. नाचणीसुद्धा तिन्ही दोषांचे शमन करणारी असल्याने कधीही खाल्ली तरी चालते, पावसाळ्यातही खाता येते. गव्हाच्या तुलनेत ही धान्ये पचण्यास हलकी असल्याने मधुमेह, उच्च रक्‍तदाब असणाऱ्यांनाही अनुकूल असतात. मात्र थोडी रुक्ष असल्याने भाकरीवर चमचाभर साजूक तूप टाकून खाणे श्रेयस्कर असते. 

----------------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer