esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

माझ्या मुलाचे वय सात वर्षे आहे. त्याच्या चेहऱ्यावर व डोक्‍यावर उष्णतेमुळे गळवासारखे मोठे फोड येतात, ते पिकून फुटतात. उन्हाळ्याच्या दिवसांत याचे प्रमाण वाढते, पण वर्षभर थोड्या प्रमाणात त्रास होतच असतो. कृपया उपाय सुचवावा.
..दिलीप गायकवाड
उत्तर -
 गळू येणे हा त्रास उष्णतेशी, तसेच रक्‍तातील अशुद्धीशी संबंधित असतो. मुलाला ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ देण्याचा उपयोग होईल. कामदुधा, गोक्षुरादी गुग्गुळ, ‘मंजिष्ठासॅन’ घेण्याचाही फायदा होईल. गळू यायला सुरवात झाल्या झाल्या त्यावर उगाळलेल्या रक्‍तचंदनाचा लेप लावला, तर सहसा ते वाढत नाही व कमी होते असे दिसते. रात्री जागरण होणार नाही, तसेच पुरेशी झोप मिळेल, संगणक, टीव्ही बघणे मर्यादित राहील याकडे लक्ष ठेवणे चांगले. आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा किमान चार चमचे प्रमाणात समावेश असू देणे चांगले. मोहरी, दही, आंबवलेले पदार्थ, कुळीथ, तळलेले पदार्थ, बेकरीतील उत्पादने आहारातून वर्ज्य करणे चांगले. 

माझी मुलगी पाच वर्षांची आहे. तिला सतत सर्दी होते आणि छातीत कफ साठून दम लागल्यासारखे होते. कृपया उपचार सुचवावा. .... विनिता
उत्तर -
 मुलीला तीन महिन्यांसाठी नियमितपणे सकाळ-संध्याकाळ पाव पाव चमचा सितोपलादी चूर्ण मधाबरोबर देण्याचा उपयोग होईल. ‘ब्राँकोसॅन सिरप’ देण्यानेही बरे वाटेल. नियमितपणे ‘सॅनरोझ’, ‘संतुलन च्यवनप्राश’ देणे, नियमित अभ्यंग करणे चांगले. यामुळे तिची रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहील आणि सतत सर्दी होणे, छातीत कफ होणे असे त्रास होण्यास प्रतिबंध करता येईल. सर्दी होते आहे असे लक्षात आले, की लगेच वाफारा घेण्याने तसेच छाती-पाठीला अगोदर ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ लावून वरून रुईच्या पानांनी शेक करण्याचाही फायदा होईल. दही, चीज, मांसाहार, अंडी, सिताफळ, चिकू, केळी, आइस्क्रीम, तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ वर्ज्य करणे सुद्धा आवश्‍यक. फुप्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी वैद्यांच्या सल्ल्याने श्वासकुठार, ‘प्राणसॅनयोग’सारखी औषधे घेणे ही श्रेयस्कर.

मला गेल्या पाच वर्षांपासून मधुमेह आहे. साखर कमी-जास्त होत असते. माझ्या तळपायांची खूप आग होते, इतकी की रात्रभर झोप येत नाही. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने खूप उपचार करून झाले, पण गुण येत नाही. कृपया आपण काही उपाय सुचवावा. .... गोणावले
उत्तर - 
मधुमेह व कमी-जास्त होणाऱ्या रक्‍तशर्करेमुळे तळपायांची आग होते आहे, त्यामुळे यावर फक्‍त स्थानिक उपचार पुरेसे पडणार नाहीत, तर वैद्यांच्या सल्ल्याने मूळ मधुमेहावर योग्य उपचार करून घ्यावे लागतील. तत्पूर्वी पायांपर्यंत रक्‍ताचे, चेतासंस्थेचे अभिसरण सुधारावे यासाठी नियमित अभ्यंग करणे, पाठीला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावणे, रोज सकाळी पंधरा-वीस मिनिटे चालायला जाणे, तळपायांना शतधौतघृत किंवा औषधांनी संस्कारित ‘संतुलन पादाभ्यंद घृत’ लावून पाय शुद्ध काशाच्या वाटीने चोळणे हे उपाय सुरू करता येतील. मधुमेह आटोक्‍यात राहण्यासाठी तसेच मधुमेहामुळे शरीराची झीज होऊ नये, ताकद टिकून राहावी, इतर समस्या उद्‌भवू नयेत यासाठी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म, विशेषतः विरेचन, बस्ती हे उपचार करून घेणे सुद्धा आवश्‍यक आणि हितावह होय.

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’मधील ‘प्रश्‍नोत्तर’ हे सदर नेहमी वाचतो. मला काहीही खाल्ले की कफ होण्याचा त्रास होता, आपल्या उत्तरातील मार्गदर्शनानुसार मी जेवणाआधी आल्याचा तुकडा खायला आणि ‘संतुलन’चे सितोपलादी चूर्ण घेण्यास सुरवात केली आणि खूपच बरे वाटले. बरोबरीने मी रोज सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात चालतो, दिवसातून एकदा नारळाचे पाणी, तसेच कलिंगडाचा रस पितो. हे योग्य आहे काय?.... गाडगीळ
उत्तर -
 ‘प्रश्नोत्तर’ सदरातील मार्गदर्शनाचा उपयोग झाला हे कळविल्याबद्दल धन्यवाद. कोवळ्या सूर्यप्रकाशात चालायला जाणे उत्तमच आहे. नारळाचे पाणी प्यायला हरकत नाही. कधी कधी शहाळे वा नारळ फार मोठे असले, तर एकदम फार जास्ती पाणी प्यायले जाते, त्यामुळे शहाळे उघडून त्यातील एक ग्लासभर पाणी पिणे चांगले. तसेच शहाळे कच्चे नाही ना हे पाहणे आवश्‍यक. आत मलई धरलेले शहाळे असले तर पाणी गोड व आरोग्यासाठी चांगले असते. कलिंगड ज्या ऋतूत मिळते म्हणजे उन्हाळ्यात खाणे चांगले. कधी तरी कलिंगडाचा रस घ्यायलाही हरकत नाही, एकंदरच ज्या ऋतूत जी फळे निसर्गतः तयार होतात, त्या ऋतूतच ती खाणे इष्ट असते.