प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 15 December 2017

दोन महिन्यांपूर्वी झोपेतून उठल्यानंतर चक्कर येत होती. तसेच चालायला गेले की पाठ अवघडत होती. एमआरआयमध्ये मानेच्या मणक्‍यात थोडा दोष आहे असे समजले. सध्या फारसा त्रास होत नाही, परंतु पुन्हा असा त्रास होऊ नये यासाठी मार्गदर्शन करावे.
..... सुशीला

दोन महिन्यांपूर्वी झोपेतून उठल्यानंतर चक्कर येत होती. तसेच चालायला गेले की पाठ अवघडत होती. एमआरआयमध्ये मानेच्या मणक्‍यात थोडा दोष आहे असे समजले. सध्या फारसा त्रास होत नाही, परंतु पुन्हा असा त्रास होऊ नये यासाठी मार्गदर्शन करावे.
..... सुशीला

उत्तर - पाठीला, मानेला रोज रात्री झोपण्यापूर्वी खालून वर या दिशेने ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध’ तेल हलक्‍या हाताने जिरविण्याचा उपयोग होईल. नाकात ‘नस्यसॅन घृता’चे किंवा घरी बनविलेल्या साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकण्याचा फायदा होईल. तूप-साखरेबरोबर ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेणे, ‘संतुलन वातबल गोळ्या’ घेणे हेसुद्धा चांगले. डिंकाचा लाडू, खारीक पूड घालून उकळलेले दूध, शतावरी कल्प यासारख्या पोषक गोष्टींचा रोजच्या आहारात समावेश करणे उत्तम होय. 

मी  ‘फॅमिली डॉक्‍टर’ नियमित वाचते. माझा नातू सहा वर्षांचा असून त्याचा घोळाणा बऱ्याच वेळा फुटतो. उजव्या नाकपुडीला जराही धक्का लागला तरी लगेच रक्‍त येते आणि ते लवकर थांबत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
.. . शैलजा

उत्तर - शरीरात उष्णतेचा प्रभाव अधिक असला तर या प्रकारचा त्रास होऊ शकतो. यासाठी त्याच्या टाळूवर थंड व मेंदू तसेच पंचज्ञानेंद्रियांना पोषक द्रव्यांनी सिद्ध केलेले ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’ नियमितपणे लावण्याचा उपयोग होईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात दोन-दोन थेंब घरी बनविलेले साजूक तूप किंवा तयार ‘नस्यसॅन घृत’ टाकण्याचा उपयोग होईल. नियमित पादाभ्यंग करणे, गुलकंद किंवा धात्री रसायन घेणे, आहारात घरी बनविलेले तूप, लोणी, साखर, साळीच्या लाह्या वगैरे पोषक आणि थंड गोष्टींचा समावेश करणे हे सुद्धा चांगले. सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा गोळ्या घेणे, दूर्वा लावलेल्या बागेत अनवाणी खेळणे, पळणे हेसुद्धा श्रेयस्कर होय.

मी  ज्येष्ठ नागरिक आहे. मला रक्‍तदाब, मधुमेह वगैरे कोणतेही आजार नाहीत, कसलेही औषध घ्यावे लागत नाही. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून अधून मधून माझ्या केसांत खाज येते. केसात कोंडा आहे. निरनिराळे शांपू, साबण वापरून पाहिले. गेल्या काही दिवसांपासून केसांना लिंबाचा रस लावून स्नान करतो, हे बरोबर आहे का? कृपया उपाय सुचवावा.
..... नारायण परोपकारे

उत्तर - केसांना लिंबाचा रस लावून स्नान करायला हरकत नाही. तरीही खाज, कोंडा, कमी होत नसला तर रक्‍तशुद्धीची औषधे घ्यायला हवीत. यासाठी ‘मंजिष्ठासॅन गोळ्या’, ‘संतुलन मंजिसार आसव’, पंचतिक्‍त घृत ही औषधे घेता येतील. केसांना लिंबाचा रस लावण्याबरोबर ‘सॅन पित्त हेअर पॅक’ लावण्याचा, तसेच केस धुण्यासाठी ‘संतुलन सुकेशा मिश्रण’ लावण्याचाही उपयोग होईल.

एक वर्षापूर्वी सोनोग्राफी केली तेव्हा मूत्राशयात छोटे मुतखडे होते. तेव्हा डॉक्‍टरांनी ‘शस्त्रकर्म करण्याची गरज नाही, भरपूर पाणी प्या’ असे सांगितले. आता जी सोनोग्राफी केली त्यात मुतखडे नाहीत, मात्र लघवी पूर्ण बाहेर पडत नाही, त्यामुळे मूत्राशयाला सूज आली आहे असे सांगितले. यासाठी शस्त्रकर्म करावे लागेल, असे सांगितले आहे, पण मला शस्त्रकर्म करायची इच्छा नाही. कृपया उपाय सुचवावा.
....करंदीकर

उत्तर - वास्तविक तहान लागेल त्या प्रमाणात, तसेच प्रकृती, जीवनशैली, ऋतुमान वगैरे मुद्द्यांचा विचार करून सहजपणे पचू शकेल इतक्‍या प्रमाणात पाणी पिणे आवश्‍यक असते. सध्या जो त्रास होतो आहे त्यासाठी पाणी वीस मिनिटे उकळून व गाळून घेऊन पिणे चांगले. पाणी उकळताना त्यात वाळा, अनंतमूळ वगैरे औषधी वनस्पतींपासून बनविलेले ‘जलसंतुलन’ मिश्रण टाकले तर असे पाणी सुगंधी तर होतेच, पण बरोबरीने पचायला सोपे होते, लघवी साफ होण्यासही मदत करत असते. बरोबरीने जेवणानंतर दोन-तीन चमचे पुनर्नवासव घेणे, गोक्षुरादी गुग्गुळ, पुनर्नवाघनवटी घेणे यांचा उपयोग होईल. वैद्यांच्या सल्ल्याने ‘संतुलन किडनी बाथ’ या मिश्रणाचा काढा बनवून त्यात कटिस्वेद (बसायच्या टबमध्ये या काढ्यात बसून शेक) घेण्यानेही बरे वाटेल. एकदा वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणेही श्रेयस्कर होय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor question answer