प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

मी अनेक वर्षांपासून ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. मला तीन महिन्यांपासून मुतखड्याचा त्रास आहे. डॉक्‍टरांनी तपासण्या केल्या त्यात मुतखडा मूत्रपिंडात असल्याचे निष्पन्न झाले. कृपया मार्गदर्शन करावे. तसेच माझे पोट साफ होत नाही, शौचाला त्रास होतो. मी अनेक उपाय केले, पण फरक पडत नाही. .... कल्पना कुलकर्णी 

उत्तर - पाणी नीट उकळून प्यावे. दिवसभर आवश्‍यक असणारे पाणी रोज सकाळी मोठ्या पातेल्यात उकळण्यास ठेवावे, उकळी फुटली की वीस मिनिटांसाठी मंद आचेवर उकळत ठेवावे. नंतर चारपदरी जाडसर कापडातून गाळून घेणे चांगले. पाणी उकळताना त्यात थोडे ‘जलसंतुलन मिश्रण’ टाकले तर त्याचा अजून चांगला फायदा होईल. बरोबरीने पुनर्नवासव, महारुणादी काढा, गोक्षुरादी गुग्गुळ घेता येईल. वैद्यांच्या सल्ल्याने ‘अश्‍मसॅन’ या गोळ्याही सुरू करता येतील. कृत्रिम रंग, रासायनिक फवारण्या वापरून उत्पादित केलेल्या भाज्या, धान्ये वगैरे गोष्टी आहारातून टाळणे हे सुद्धा श्रेयस्कर. पोट साफ न होणे, शौचास कडक होणे यामागे अपचन हे मुख्य कारण असते. यासाठी जेवणानंतर नियमितपणे अन्नयोग गोळ्या घेणे, रात्री झोपण्यापूर्वी ‘सॅनकूल चूर्ण’ घेणे, जाठराग्नीला ताकद मिळण्यासाठी तसेच आतड्यांना मऊपणा यावा यासाठी घरी बनविलेल्या साजूक तुपाचा आहारात समावेश करणे, रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात दोन चमचे तूप, चवीपुरते मीठ मिसळून पिणे, रोज नियमितपणे चालायला जाणे, सूर्यनमस्कारादी योगासने करणे हे सुद्धा हितावह होय.

*******************************************************

माझे वय ५२ वर्षे असून  दोन महिन्यांपूर्वी माझी अँजिओप्लास्टी झाली आहे. हृदयाची ताकद वाढविण्यासाठी काय करावे? हाडांना बळकटी येण्यासाठी आहार कसा असावा?
... विठ्ठल
उत्तर -
अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रियेनंतरही पुन्हा अवरोध तयार होऊ नये किंवा नवीन वाहिनीमध्येसुद्धा अवरोध उत्पन्न होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असतात, अन्यथा आधी झाला तसा त्रास पुन्हा होण्याची मोठी शक्‍यता असते. या दृष्टीने रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण अंगाला, कमीत कमी छाती व पोटाला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेला’चा अभ्यंग करणे, रोज सकाळ-सध्याकाळ ‘संतुलन सुहृदप्राश’ घेणे, वैद्यांच्या सल्ल्याने ‘कार्डिसॅन प्लस’ चूर्ण सुरू करणे हे चांगले. या सर्व उपायांनी हृदयाची, संपूर्ण रक्‍ताभिसरण संस्थेची ताकद सुधारण्यासाही मदत मिळते. पुन्हा अवरोध होऊ नये यासाठी अगोदर नीट स्नेहन-स्वेदन करून पंचकर्म, विशेषतः विरेचन, बस्ती हे उपचार करून शरीरशुद्धी करून घेणे, नंतर हृद्‌बस्ती घेणे घेणे हे सुद्धा उत्तम होय. हाडांना बळकटी येण्यासाठी आहारात भारतीय वंशाच्या गाईचे दूध, खारीक, खसखस, डिंकाचे लाडू, नाचणी सत्त्व, पाण्यात भिजविलेले बदाम वगैरे गोष्टी समाविष्ट करता येतील.  

*******************************************************
माझ्या पत्नीला गेल्या महिन्यापासून युरिन इन्फेक्‍शनचा त्रास होतो आहे. गेल्या वर्षी सुद्धा तिला असाच त्रास झाला होता. तिला ॲलोपॅथिक औषधे घेतल्यास उष्णतेचा त्रास होतो. तेव्हा वारंवार असा त्रास होऊ नये यासाठी उपाय सुचवावा तसेच पथ्यसुद्धा सांगावा. .... श्रीराम कुलकर्णी
उत्तर -
वारंवार युरिन इन्फेक्‍शन होण्यामागे मूत्रवहसंस्था तसेच प्रजनन संस्था यांच्यात अशक्‍तता असणे हे मुख्य कारण असू शकते. यासाठी ‘फेमिसॅन सिद्ध तेला’चा पिचू नियमित वापरणे, एक दिवसाआड ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेणे चांगले. तीन महिने सलग पुनर्नवासव, ‘संतुलन प्रशांत चूर्ण’, पुनर्नवाघनवटी तसेच गोक्षुरादी गुग्गुळ घेण्यानेही वारंवार जंतुसंसर्ग होण्याची प्रवृत्ती आटोक्‍यात येईल. काही दिवस धण्या-जिऱ्याचे पाणी किंवा साळीच्या लाह्या भिजविलेले पाणी पिण्याचाही उपयोग होईल. कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, गवार, वांगे, कच्चा टोमॅटो, अंडी, दही वगैरे गोष्टी आहारातून टाळणे चांगले.

*******************************************************

आमच्या घरी सुरुवातीपासून ‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणी येते व ती मला वाचायला खूप आवडते. मी सध्या बारावीत आहे. माझी समस्या अशी आहे की, मला पाळीच्या आधी, नंतर व तसेच अधेमधे सुद्धा पांढरे जाण्याचा त्रास होतो आहे. त्यामुळे मला हात-पाय गळाल्यासारखे वाटते. कामात किंवा अभ्यासात उत्साह राहत नाही. कंबरही दुखते. तरी कृपया याविषयी मार्गदर्शन करावे. ... सरिता
उत्तर -
अंगावरून पांढरे पाणी जाण्याने स्त्रियांच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत असतो. पाळी येण्यापूर्वी एक-दोन दिवस आणि स्त्रीबीज बाहेर पडते तेव्हा म्हणजे चौदा-पंधराव्या दिवशी थोडे पांढरे जाणे स्वाभाविक असते. या व्यतिरिक्‍त त्रास होत असल्यास त्यावर योग्य उपचार घ्यायलाच हवेत. पांढरे जाणे थांबावे तसेच, गर्भाशय व एकंदर प्रजननसंस्थेला ताकद मिळावी यासाठी नियमित योनीपिचू वापरणे उत्तम असते. यासाठी ‘फेमिसॅन सिद्ध तेल’ वापरता येईल. तसेच आठवड्यातून दोन-तीन वेळा खालून ‘संतुलन शक्‍ती धुपा’ची धुरी घेण्याचाही उपयोग होईल. आयुर्वेदात पुष्यानुग चूर्ण नावाचे एक औषध असते, ते मधाबरोबर मिसळून घेण्याने व वरून तांदळाचे धुवण पिण्यानेही सदर त्रास कमी होईल. बरोबरीने शतावरी कल्प, धात्री रसायन किंवा ‘सॅनरोझ’ ही रसायने घेण्याचा, ‘अशोक-ॲलो सॅन’ गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. सूर्यनमस्कार, फुलपाखरू वगैरे योगासने करण्याने स्त्रीसंतुलनाला मदत मिळाली की उत्साह, स्फूर्ती वाढण्यासही मदत मिळेल. या सर्व उपायांनी बरे वाटेलच, तरीही लहान वयात त्रास होतो आहे आणि त्रासाची तीव्रता जास्ती आहे तेव्हा तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे श्रेयस्कर होय. 

*******************************************************

गेल्या तीन वर्षांपासून मला डाव्या हाताच्या पंज्याला सतत मुंग्या येण्याचा त्रास होतो आहे. मी पथ्य नीट सांभाळतो. कुठलेही व्यसन करत नाही. या त्रासावर आजवर बरेचसे उपाय करून पाहिले, पण उपयोग झाला नाही. रक्‍तदाबाची एक गोळी घेतो, थोडा बद्धकोष्ठतेचेही त्रास आहे. याव्यतिरिक्‍त काहीही त्रास नाही. कृपया आपण मार्गदर्शन करावे.
उत्तर -
मुंग्या येणे हे शरीरात वातदोष वाढल्याचे आणि रक्‍ताभिसरण व्यवस्थित होत नसल्याचे एक लक्षण आहे. यावर पाठीच्या कण्याला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ आणि छाती-पोट-हातांना ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ नियमितपणे लावण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकणे, तसेच सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ घेणे हे सुद्धा चांगले. पथ्य सांभाळता आहात हे उत्तमच आहे. आहारात रोज किमान चार-पाच चमचे साजूक तूप समाविष्ट करणे चांगले. तसेच वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली बस्ती उपचार करून घेणे, वातनाशक द्रव्यांनी पाट-मानेवर पोटली मसाज घेणे हे सुद्धा चांगले. गोळी घेऊन रक्‍तदाब नियंत्रणात राहात असला तरी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली तो शक्‍य तितका बरा होण्यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा आवश्‍यक होय. काही दिवस रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर ‘सॅनकूल’ किंवा अविपत्तीकर चूर्ण घेण्याने बद्धकोष्ठतेची प्रवृत्ती दूर होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com