पथ्यापथ्य-क्षयरोग

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 11 August 2017

वजन एकाएकी कमी होणे, खोकला सुरू होणे, अंगात सातत्याने कसकस राहणे, शरीरशक्‍ती कमी होणे ही सर्व क्षयरोगाची सामान्य लक्षणे असतात. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मदतीने काही विशेष तपासण्या करून जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या क्षयरोगाचे पक्के निदानही करता येते. औषधांच्या बरोबरीने आहाराचे नियोजन क्षयरोगातही महत्त्वाचे असते. 

‘आहाराचे पथ्य सांभाळले तर औषधांची गरज भासणार नाही आणि आहाराचे पथ्य सांभाळले नसेल तर औषध घेण्याचा उपयोग होणार नाही’, अशा अर्थाचे एक सूत्र आयुर्वेदात प्रचलित असते आणि ते शब्दशः खरे आहे. निरोगी व्यक्‍तीने आहार आणि रसायनांच्या मदतीने आपले आरोग्य टिकवावे आणि रोगी व्यक्‍तीने औषधोपचाराला सुयोग्य आहाराची जोड देऊन लवकरात लवकर रोगमुक्‍त व्हावे ही आदर्श स्थिती म्हणता येईल. 

क्षयरोग हा सर्वपरिचित रोग होय. वजन एकाएकी कमी होणे, खोकला सुरू होणे, अंगात सातत्याने कसकस राहणे, शरीरशक्‍ती कमी होणे ही सर्व क्षयरोगाची सामान्य लक्षणे असतात. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मदतीने काही विशेष तपासण्या करून जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या क्षयरोगाचे पक्के निदानही करता येते. औषधांच्या बरोबरीने आहाराचे नियोजन क्षयरोगातही महत्त्वाचे असते. 

मूलकानां कुलत्थानां यूषैर्वा सूपकल्पितैः ।
यवगोधूमशाल्यन्नैः यथासात्म्यमुपाचरेत्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान

मुळा व कुळीथ यांच्या कढणाबरोबर जव, गहू किंवा तांदूळ यांच्यापासून बनविलेले अन्न (जवाची भाकरी, गव्हाची पोळी, तांदळाचा भात किंवा भाकरी) रुग्णाच्या आवडीनुसार द्यावे. 

क्षयरोगात तहान लागली असता साधे पाणी पिण्याऐवजी औषधांनी संस्कारित पाणी प्यायला सांगितले आहे. 
...................जलं वा पाञ्चमूलिकम्‌ ।।
धान्यनागरसिद्धं वा तामलक्‍याऽथवा श्रृतम्‌ ।
पर्णिनीभिश्वतसृभिस्तेन चान्नानि कल्पयेत्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान  

लघुपंचमुळांनी षडंग पद्धतीने तयार केलेले (म्हणजे औषधी द्रव्यांच्या चौसष्ट पट पाणी घेऊन, पाणी निम्मे शिल्लक राहीपर्यंत उकळवलेले) पाणी प्यावे किंवा धणे व सुंठ यांनी सिद्ध केलेले पाणी प्यावे किंवा भूम्यामलकी नावाच्या वनस्पतीसह सिद्ध केलेले पाणी प्यावे किंवा सालवण, पिठवण, मुद्गपर्णी, माषपर्णी या वनस्पतींनी सिद्ध केलेले पाणी प्यावे. इतर अन्न शिजविण्यासाठीसुद्धा हेच पाणी वापरावे. 

क्षयरोगात मांसाहार पथ्यकर सांगितला आहे. पुढील श्‍लोकात धान्यांच्या बरोबरीने मांसाहारी सूप घ्यायला सांगितले आहे. 

सपिप्पलीकं सयवं सकुलत्थं सनागरम्‌ ।
दाडिमामलकोपेतं स्निग्धमाजं रसं पिबेत्‌।।
....चरक चिकित्सास्थान 

जव, कुळीथ, सुंठ, पिंपळी, डाळिंब आणि आवळा या द्रव्यांच्या बरोबरीने भरपूर तूप घातलेले बकऱ्याच्या मांसाचे सूप प्यावे. मांसाहारी व्यक्‍तींना हा प्रयोग करता येण्यासारखा आहे. 

क्षयरोगामध्ये खोकला व ताप ही फार त्रासदायक आणि चिवट लक्षणे असतात. यासाठी चरकसंहितेत  बलादिक्षीर म्हणून औषधी दुधाचा पाठ दिलेला आहे. बला, सालवण, पिठवण, बृहती, कंटकारी या वनस्पती समभाग घेऊन काढा तयार करावा, तयार काढ्यात समभाग दूध आणि सुंठ, खजूर, तूप व पिंपळी यांचा समभाग कल्क मिसळून मंद आचेवर उकळण्यास ठेवावे. बाकीचा जलांश उडून गेला की व जेवढे दूध टाकले होते, तेवढे शिल्लक राहिले की गाळून घ्यावे व मध मिसळून प्यायला द्यावे. या औषधी दुधामुळे ताप, खोकला तसेच स्वरभेद (बिघडलेला आवाज) बरा होतो. 

क्षयरोगामध्ये जुलाब होत असल्यास, 
जम्ब्वाम्रमध्यं बिल्वं च सकपित्थं सनागरम्‌ ।
पेयामण्डेन पातव्यमतीसारनिवृत्तये ।।....

जांभळातील बी, आंब्यातील कोय, बेलाचा गर, कवठाचा गर व सुंठ या सर्व द्रव्यांचे समभाग चूर्ण तांदळाच्या पेजेबरोबर मिसळून प्यायला द्यावे. 

पाण्याच्या ऐवजी ताक प्यायला द्यावे किंवा डाळिंबाचा रस प्यायला द्यावा. 

क्षयरोगामध्ये घरी बनविलेले ताजे लोणी औषधाप्रमाणे हितकर सांगितलेले आहे. 

शर्करामधुसंयुक्‍तं नवनीतं लिहन्‌ क्षयी ।
क्षीराशी लभते पुष्टिमतुल्ये चान्यमाक्षिके ।।
...भैषज्य रत्नाकर

ताज्या लोण्यामध्ये खडीसाखर व मध मिसळून सेवन करावे आणि वरून दूध प्यावे. यामुळे धातुपुष्टी होण्यास मदत होते. 

क्षयरोगामध्ये बकरीचे दूध, तूप, मांस इतकेच नाही तर बकरीच्या सहवासात राहणेसुद्धा हितकर सांगितलेले आहे. 

छागमांसं पयच्छागं छागं सर्पिः सशर्करम्‌ ।
छागोपसेवन शयनं छागमध्ये तु यक्ष्मनुत्‌ ।।....

बकरीचे मांस, बकरीचे दूध, बकरीच्या दुधापासून काढलेले तूप व साखर या गोष्टी क्षयरोगात पथ्यकर होत. बकरीच्या कळपात राहणे व त्यांची निगा राखणे हेसुद्धा क्षयरोगात हितकर सांगितलेले आहे. 

क्षयरोगातील अजून पथ्य-अपथ्याची माहिती आपण पुढच्या वेळी पाहू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor TB