वसंतागमन होली आयी रे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 16 February 2018

शरीरातून कफनिवृत्ती झाली की शरीराला तरतरी येते. शरीर हलके झाल्याचा अनुभव येतो. यानंतर शृंगाराची कल्पना विकसित न झाली तरच नवल. वसंतपंचमीला केलेल्या रती-मदनपूजनातून घेतलेली ऊर्जा जेव्हा वाढीला लागेल, तेव्हाच सृष्टीच्या पुनरुत्पत्तीचे कार्य चालू राहू शकते. 

शरीरातून कफनिवृत्ती झाली की शरीराला तरतरी येते. शरीर हलके झाल्याचा अनुभव येतो. यानंतर शृंगाराची कल्पना विकसित न झाली तरच नवल. वसंतपंचमीला केलेल्या रती-मदनपूजनातून घेतलेली ऊर्जा जेव्हा वाढीला लागेल, तेव्हाच सृष्टीच्या पुनरुत्पत्तीचे कार्य चालू राहू शकते. 

शिशिर ऋतू संपत आला की, येणाऱ्या वसंताची तयारी करावी लागते. साधारणतः होळी हा थंडीला दिलेला शेवटचा चटका, आयुर्वेदात जो एक सौनासारखा प्रकार सांगितला आहे. हा प्रकार समजावा यासाठी त्याला गोष्टीची जोड देऊन त्याचे उत्सवात रूपांतर करून, त्याला कर्माची जोड देऊन होळीचा उत्सव सांगितलेला असतो. छातीत कफ झाला तर छातीवर निखारे ठेवता येत नाहीत, त्यासाठी तेल लावून तेल लावलेल्या रुईच्या पानांनी छाती शेकावी किंवा मीठ व ओव्याची पुरचुंडी तव्यावर गरम करून शेकावी. थोडक्‍यात काय तर अग्नी  छातीतील कफ वितळण्यासाठी अग्नी मदतरूप ठरतो. परंतु अग्नीचा उपयोग करून घेण्यासाठी एक व्यवस्था लागते. प्रत्येक वेळी अग्नीचा उपयोग करून घेत असताना यंत्राची मदत लागतेच. होळीच्या वेळी एका खड्ड्यात लाकडे, गोवऱ्या, थोडे गवत वगैरे टाकले जाते, मध्यभागी पान-फळांसकट एरंडीची फांदी ठेवली जाते.

आजूबाजूला काही अंतरावर गोल कोंडाळे करून लोक बसतात. कायमसाठी व्यवस्था करायचा असल्यास ओटा बांधून त्यावर पाय खाली सोडून बसता येईल, अशी योजना करता येते. असे केल्यास आपल्या छातीच्या उंचीपर्यंत होळीची धग येते. कायम योजना करत असताना मांडव करून वरून छत करावे, छताला वर मध्यभागी धूर बाहेर जायला भोक असावे. हा जणू आयुर्वेदिक सौना बाथ होय. शिशिराची उरलेली लक्षणे म्हणून पडणाऱ्या दवाचा त्रास होऊ नये, वातावरणात थोडा थंडपणा असला तर त्याचाही त्रास होऊ नये, परंतु होळीची उष्णता मिळावी व कफ वितळावा हे सर्व होळीच्या वेळी साध्य होते. 

होळीमुळे कफाचा नाश व्हायला मदत होते. याला समर्पक आहे प्रल्हादाची आणि हिरण्यकश्‍यपूची बहीण होलिका हिची कथा. हिरण्यकश्‍यपूने आखलेल्या बेतात होलिका जळून जाते आणि प्रल्हादाचे तेज वाढून तो बाहेर येतो अशी ही कथा आहे. 

थंडीच्या दिवसात प्रत्येकाने योग्य ती काळजी घेणे इष्ट असते. अशी काळजी घेत असताना डोक्‍याला वा मूत्रपिंडांना थंड वारा लागू नये याची काळजी घ्यावी लागते. थंड पाणी, संध्याकाळच्या वेळी आइस्क्रीमसारखे थंड पदार्थ खाणे टाळावे. पण काळजी घेतली तरी कफप्रकृती असलेल्यांच्या शरीरात कफसंचय होईल यात काही नवल नाही. परंतु इतरांनाही कफाचा त्रास होतोच. हवेत असलेले प्रदूषण, इतर दूषित वायू यांचाही त्रास होऊ शकतो. हा सर्व त्रास दूर करण्यासाठी आहे होलिकाउत्सव. होळीचा शेक घेतला की नंतर होळीची राख अंगाला लावण्याची प्रथा आहे. राखेमध्ये त्वचा अधिक संवेदनशील करण्याची क्षमता असते. त्वचेवर असलेली किटं, बारीक सारीक कळमटं निघून जातात.

होळीनंतर येते रंगपंचमीची पिचकारी. पिचकारीच्या थंड पाण्याने शरीर एकदा धुवून निघाले की वसंतागमनासाठी नवीन काही पेशी उत्पन्न व्हाव्यात, सृजन व्हावे, नवीन कल्पना सुचाव्या, नवीन व्यवसाय-धंदा सुरू करता यावा यासाठी शरीर तयार होते. केवळ शरीर हेच माणसाचे अस्तित्व नाही. माणसाच्या मनालाही तितकेच महत्त्व आहे. तेव्हा मनाला प्रसन्नता वाटावी म्हणूून निसर्गाने जणू योजना केलेली असते. या काळात वृक्षांना बारीक बारीक पाने फुटायला लागलेली असतात. पानांचा हिरवा रंग मनाला उत्साह देतो. शिशिरात झाडांच्या अंगावर थंडीमुळे केवळ काटे दिसतात त्याऐवजी आता हिरवी पाने व फुले दिसू लागतात. ही रंगांची उधळण निसर्गात चालू असते. रंगपंचमीच्या दिवशी पिचकारीतील पाण्याला रंग दिला तर अजूनच गंमत येते. वेगवेगळ्या रंगांनी वेगवेगळ्या सूचना केलेल्या असतात मंगलतेचे प्रतीक म्हणून केशरिया किंवा गुलाल हे रंग वापरून वसंतागमनाची तयारी केली जाते. या सर्व प्रथा पाहिल्या तर भारतीय संस्कृती, संस्कार, परंपरा, आयुर्वेद व आरोग्य यांचा कसा उत्तम संगम घातलेला आहे हे  लक्षात येते. म्हणून आयुर्वेदिक जीवनपद्धती (Ayurvedic Lifestyle) ही आरोग्यासाठी एकमेव उत्तम जीवनपद्धती आहे. ज्याला दीर्घायुष्याची अपेक्षा आहे त्याने स्वतःच्या शरीराबरोबर बाह्य सृष्टीचा, ऋतुमानाचा विचार करून त्यानुसार आहार-विचार-आचरण ठेवले तर दीर्घायुष्य कसे मिळते हेही यातून लक्षात येते. सणांनुसार आहाराच्या बाबतीत विचार करताना संक्रांतीच्या बारीकशा तिळगुळाने केलेल्या सुरुवातीचे पर्यवसान पुरणपोळीत कसे होते हे लक्षात येईल. पौषात येणाऱ्या संक्रांतीच्या वेळी शरीरातील कफदोषांना दूर करण्यासाठी तिळगुळाची अल्प प्रमाणातील उष्णता अमलात आणली जाते, तर त्यानंतर होळीच्या वेळी चण्याची डाळ, गूळ व गहू यांच्यापासून बनविलेली पुरणपोळी खाल्ली जाते.

पुरणपोळी पचावी यासाठी तिच्यावर भरपूर तूप घेऊन खाल्ली जाते किंवा तूप लावलेला पुरणपोळी दुधाच्या वाटीत बुडवून खाल्ली जाते. अशा प्रकारे खाल्लेली पुरणपोळी कफ वितळवते, तसेच ती सहजपणे पचून ताकद देण्यास समर्थ असते. 

शरीरातून कफनिवृत्ती झाली की शरीराला तरतरी येते. शरीर हलके झाल्याचा अनुभव येतो. यानंतर शृंगाराची कल्पना विकसित न झाली तरच नवल. वसंतपंचमीला केलेल्या रती-मदनपूजनातून घेतलेली ऊर्जा जेव्हा वाढीला लागेल, तेव्हाच सृष्टीच्या पुनरुत्पत्तीचे कार्य चालू राहू शकते. 
अत्यंत सुंदर अशा या कल्पनेतून आरोग्याची योजना सुरू केली. मग त्यातून वसंतध्वज म्हणजे गुढीपाडव्याची गुढी उभारून स्वतःला मिळालेले यश प्रदर्शित केले जाते. 

पंचकर्म कधी करावे, असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. पंचकर्म म्हणजे पंचतत्त्वांची शुद्धी असते, पण त्यातील पित्तदोषाची शुद्धी करणे अधिक महत्त्वाचे असते. पंचकर्मातील पूर्वकर्मांमुळे वितळलेला कफ बाहेर टाकण्यासाठी  वसंत ऋतूत वमनाची योजना केलेली असते. अर्थात अधून मधून शरीरशुद्धी करून घ्यायच्या दृष्टीने दोन-तीन आठवड्यातून एकदा केलेल्या उपचारामध्ये पित्तदोषाला बाहेर घालविण्यासाठी विरेचनाला महत्त्व असतेच, बरोबरीने कफ व वात यांचा आणि वायू व आकाशतत्त्व यांचाही विचार करावा लागतो. म्हणून सर्व विधी करून घेता येतील असा वसंत ऋतू हा पंचकर्मासाठी सर्वोत्तम काळ. शरीरातील उरले सुरले जाड्य व दोषामुळे होणारा त्रास दूर करण्यासाठी पंचकर्माची योजना आयुर्वेदाने या वेळी सुचवलेली आहे. पण तरीही पंचकर्म वर्षात केव्हाही करता येते. कारण दोष काढून टाकावाच लागतो त्यासाठी वसंत ऋतूची वाट पाहत राहिल्यास दोष वाढून अधिक त्रास होऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor vasantagaman holi