esakal | थकवा
sakal

बोलून बातमी शोधा

Fatigue

"थकवा येणे', "अशक्तपणा जाणवणे' आणि "निरुत्साह अनुभवणे' या तीन तक्रारींचे अर्थ वेगवेगळे असतात. त्यामुळे रुग्णाला नेमके काय होते आहे, याची प्रथम खात्री करून घेणे आवश्‍यक असते. थकव्यामागचे कारण शारीरिक असो अथवा मानसिक, ते दुरुस्त केल्याखेरीज थकवा शमणार नाही.

थकवा

sakal_logo
By
डॉ. ह.वि. सरदेसाई

"थकवा येणे', "अशक्तपणा जाणवणे' आणि "निरुत्साह अनुभवणे' या तीन तक्रारींचे अर्थ वेगवेगळे असतात. त्यामुळे रुग्णाला नेमके काय होते आहे, याची प्रथम खात्री करून घेणे आवश्‍यक असते. थकव्यामागचे कारण शारीरिक असो अथवा मानसिक, ते दुरुस्त केल्याखेरीज थकवा शमणार नाही.

आपल्या कौटुंबिक वैद्यकीय सल्लागाराकडे ("फॅमिली डॉक्‍टर'कडे) नियमाने उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी दोन टक्के रुग्णांची, केवळ "थकवा' ही मुख्य तक्रार असते. "मला थकवा येतो' हे त्यांचे सांगणे असते. "थकवा येणे', "अशक्तपणा जाणवणे' आणि "निरुत्साह अनुभवणे' या तीन तक्रारींचे अर्थ वेगवेगळे असतात. त्यामुळे रुग्णाला नेमके काय होते आहे याची प्रथम खात्री करून घेणे आवश्‍यक असते. या प्रत्येक तक्रारीचे कारण वेगळे असते आणि उपायही वेगळा असतो. "थकवा' श्रम केल्यानंतर येतो. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त श्रम झाल्यास येणाऱ्या स्थितीला "थकवा' म्हटले जाते. "अशक्तपणा' याचा अर्थ शक्ती कमी होणे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती चार किलो वजन चार फूट उचलू शकत होती, त्या व्यक्तीला आता दोन किलो वजन दोन फुटच वर उचलता येत असेल तर शक्ती कमी झाली आहे. "उत्साह' ही स्थिती काम करण्यापूर्वीची असते. "उत्साह' ही स्थिती बव्हंशी मानसिक असते. एखादी गोष्ट कार्य अथवा श्रम करण्याने आपला फायदा आहे हे पटले तर ती क्रिया करण्यास उत्साह वाटतो. श्रमानंतर आलेला थकवा बव्हंशी शारीरिक असतो. विश्रांती, विशेषतः चांगली झोप मिळाल्यावर थकवा कमी होतो किंवा जातो. अशक्तपणे देखील शारीरिक असतो; परंतु केवळ विश्रांती घेण्याने शक्ती येत नाही. शारीरिक आजाराचे निर्मूलन करणे, सकस आहार घेणे व नियमाने व्यायाम करणे या उपायांनी शक्ती येते व अशक्तपणा जातो.