आहार विधी 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 12 May 2017

पानांपासून बनविलेल्या ताटात जेवण्याने रुची वाढते, अग्नी प्रदीप्त होतो, विषाचा नाश होतो आणि पापही नष्ट होते. पत्रावळीवर किंवा केळीच्या हिरव्या ताज्या पानावर जेवण्याचे फायदे असतात.

अन्न नीट पचावे, अंगी लागावे यासाठी ते उघड्यावर, वर्दळीच्या ठिकाणी सेवन करू नये, असे आयुर्वेदशास्त्र सांगते. भारतीय परंपरेनुसारही जेवणाच्या सुरवातीला प्रार्थना म्हणण्याची पद्धत असते. 

अन्नं ब्रह्मा रसो विष्णुर्भोक्‍ता देवो महेश्वरः ।.... निघण्टु रत्नाकर 
अन्न हे ब्रह्म आहे, रस हा विष्णू आहे आणि साक्षात महेश्वर म्हणजे भगवान शंकर ते सेवन करणारे आहेत. अशी प्रार्थना करून भोजन करावे, असे आयुर्वेदातही सांगितले आहे. 

जेवण करण्याकरिता घेतलेले पात्र कशापासून बनवलेले आहे, त्यावरही अन्नाचे गुण बदलत असतात. सर्वांत चांगले ताट सुवर्णाचे असते. 
दोषहृद्‌दृष्टिदं पथ्यं हैमं भोजनपाचनम्‌ ।.... निघण्टु रत्नाकर 

सोन्याच्या ताटात जेवणे हे शरीरातील सर्व प्रकारचे दोष नष्ट करणारे, दृष्टी चांगली करणारे आणि पथ्यकर म्हणजे शरीराला अनुकूल असते. सुवर्णानंतर येते चांदीचे ताट. 
रौप्यं भवति चक्षुष्यं पित्तहृत्‌ कफवातकृत्‌ ।.... निघण्टु रत्नाकर 

चांदीच्या ताटात जेवणे हेसुद्धा डोळ्यांसाठी हितकारक असते, पित्तदोष कमी करणारे असते आणि कफ- वातवर्धक असते. 
कांस्यं च बुद्धिदं रुच्यं रक्‍तपित्तप्रसादनम्‌ ।.... निघण्टु रत्नाकर 

काशाच्या ताटात जेवण्याने बुद्धी वाढते, अन्न अधिक रुचकर लागते, रक्‍त शुद्ध होते, पित्ताचे प्रसादन होते. 
पैत्तल्यं वातकृत्‌ रुक्षं शूलकृमिकफप्रणुत्‌ ।.... निघण्टु रत्नाकर 

पितळेच्या ताटात जेवण्याने वात वाढतो, शरीरातील कोरडेपणा वाढतो; मात्र वेदना, कृमी व कफदोष यांचा नाश होतो. 
आयसे कान्तपात्रे च भोजनं सिद्धिकारकम्‌ । शोथपाण्डुहरं बल्यं कामलापहमुत्तमम्‌ ।।.... निघण्टु रत्नाकर 

लोखंडाच्या ताटात जेवण्याने भोजनाची सिद्धी होते. सूज, पांडु (रक्‍ताल्पता) या रोगांत फायदा होतो, ताकद वाढते आणि कावीळ दूर होते. 
दारुद्भवं विशेषेण रुचिदं श्‍लेष्मकारि च ।.... निघण्टु रत्नाकर 

लाकडापासून बनविलेल्या ताटात जेवल्यास अन्नाची रुची वाढते, तसेच कफ वाढतो. 
पात्रं पत्रमयं रुच्यं दीपनं विषपापनुत्‌ ।.... निघण्टु रत्नाकर 

पानांपासून बनविलेल्या ताटात जेवण्याने रुची वाढते, अग्नी प्रदीप्त होतो, विषाचा नाश होतो आणि पापही नष्ट होते. पत्रावळीवर किंवा केळीच्या हिरव्या ताज्या पानावर जेवण्याचे असे फायदे असतात. 

अशा प्रकारे धातूच्या ताटात जेवणे, लाकूड किंवा पानाच्या ताटात जेवणे आयुर्वेदात प्रशस्त समजलेले आहे. फक्‍त मातीच्या किंवा दगडापासून बनविलेल्या ताटात जेवण्याचे तोटे याप्रमाणे सांगितलेले आहेत, 
शैलजे मृण्मये पात्रे भोजनं श्रीनिवारणम्‌ ।... निघण्टु रत्नाकर 

दगड किंवा मातीपासून बनविलेल्या ताटात जेवण्याने लक्ष्मीचा नाश होतो. 
तेव्हा शक्‍यतो लोखंड, कांसे किंवा चांदीच्या ताटात जेवण करण्याची सवय असणे आरोग्यासाठी चांगले होय. पाणी पिण्याचे भांडे मात्र मातीचे असले तरी चालते. 
जलपात्रं तु ताम्रस्य तद्भावे मृदो हितम्‌ ।.... निघण्टु रत्नाकर 

पाणी पिण्यासाठी सर्वांत चांगले भांडे तांब्याचे असते, त्याखालोखाल मातीचे भांडे हितकर असते. 
शुद्ध स्फटिकाचे फुलपात्रसुद्धा पाणी पिण्यासाठी उत्तम होय. 
पवित्रं शीतलं पत्रं घटितं स्फटिकेन यत्‌ । काचेन रचितं तद्वत्‌ तथा वैडूर्यसंभवम्‌ ।।.... निघण्टु रत्नाकर 

स्फटिक किंवा काचेच्या पात्रातून पाणी पिणे हे पवित्र समजले जाते, तसेच शरीरात शीतलताही उत्पन्न करते. वैडूर्य मण्यापासून बनविलेले फुलपात्रही पाणी पिण्यासाठी उत्तम असते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: food health family doctor balaji tambe