तळपायांना होणारे त्रास

Foot
Foot

तळपायातून मेंदूकडे संवेदना विजेच्या प्रवाहाप्रमाणे जात असतात. या शिरातून जाणारा विजेचा प्रवाह विशिष्ट गतीने जात असतो. मेंदूमध्ये या गतीवरून ही संवेदना कोणत्या प्रकारची आहे हे ठरते. उदाहरणार्थ विशिष्ट गतीने जाणारी संवेदना गरम आहे का गार, वेदना आहे का सुखदायक आहे, हा फरक मेंदूत समजतो.

तळपाय हा शरीराचाच भाग आहे. त्यामुळे शरीराला इतरत्र होणारे आजार तळपायांनाही होत असतात. काही आजार तळपायांना विशेष होतात. त्यातल्या दोन तीन प्रकारच्या आजारांची आज आपण माहिती घेऊया.

शरीराच्या कुठल्याही भागातून संवेदना नेणाऱ्या नसा (sensory nerves) त्या त्या भागातून विविध प्रकारच्या संवेदना मेंदूकडे पोहचवितात. त्वचेकडून नेणाऱ्या संवेदनांमध्ये उष्णता किंवा थंडी प्रामुख्याने मेंदूकडे नेली जाते.

अंतस्थ अवयवातून बहुतांशी वेदना नेली जाते. हा सगळा कारभार विद्युत रासायनिक पद्धतीने चालतो. त्वचेमध्ये विविध प्रकारच्या संवेदनांचे स्वीकारक असतात. विशिष्ट स्वीकारक त्या विशिष्ट प्रकारच्या संवेदना ओळखतात व संबंधित शिरांमार्फत मेंदूकडे पाठवतात. त्वचेकडून किंवा अवयवाकडून संवेदना नेणाऱ्या शिरांचे मार्ग ठरलेले आहेत. या मार्गावर ठिकठिकाणी स्थानके  (stations) असतात. या स्थानकांमध्ये या संवेदना मार्ग बदलतात. शिरांमध्ये अथवा स्थानकांमध्ये काही दोष निर्माण झाला तर मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना त्यांचे स्वरुप बदलतात. 

तळपायातून मेंदूकडे संवेदना विजेच्या प्रवाहाप्रमाणे जात असतात. या शिरातून जाणारा विजेचा प्रवाह विशिष्ट गतीने जात असतो. मेंदूमधे या गतीवरुन ही संवेदना कोणत्या प्रकारची आहे हे ठरते. उदाहरणार्थ विशिष्ट गतीने जाणारी संवेदना गरम आहे का गार, वेदना आहे का सुखदायक आहे, हा फरक मेंदूत समजतो. एकाच शिरेमधून एकाच मार्गाने जाणाऱ्या संवेदना कोणत्या प्रकारच्या आहेत हे मेंदूच्या विविध भागात ठरविले जाते. एकाच प्रकारच्या विजेच्या तारेतून उष्णताही वाहिली जाते आणि थंडीही वाहिली जाते. तसाच काहीसा हा प्रकार आहे. 

एक खूपच नेहमी आढळणारा दोष म्हणजे तळपायांची आग होणे. अशा प्रसंगी तळपायाच्या पेशी गरम होत नाहीत. परंतु संवेदना नेणाऱ्या शिरांमधून जाणाऱ्या विजेच्या ‘करंट’ची गती बदलते. मेंदू त्याचा अर्थ ठरल्याप्रमाणे बदललेला लावतो. मेंदूत अनेक भागामध्ये सतत काम करणाऱ्या पेशी रासायनिक द्रव्ये तयार करतात. ही रासायनिक द्रव्ये विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळात व विशिष्ट गतीने तयार होणे आवश्‍यक असते.

यात काही फरक झाला तर ज्या अवयवातून हा करंट मेंदूकडे जातो, तेथे कोणताही विकार नसला तरी नको ती संवेदना निर्माण होते. 

अन्ननलिका ही एक पोकळ नलिका असते. तिच्या आतल्या बाजूनी जे अस्तर असते, त्यात काही बिघाड झाला तर मेंदूकडे नेणाऱ्या शिरातून जाणाऱ्या विजेच्या करंटमध्ये फरक पडतो आणि व्यक्तिला आपल्या छातीमधे जळजळ झाल्याची भावना होते. बहुतेक वेळेला अन्ननलिकेत कुठलाही दोष नसताना केवळ या विजेच्या करंटमधे झालेल्या बदलामुळे छातीत आग होते व त्या माणसाला अन्ननलिकेत आम्ल जास्त झाले आहे असे वाटू लागते. ही जळजळ नेमकी कशामुळे होते आहे हे ओळखण्याकरता ज्ञान व अनुभव लागतो. काही वेळा हृदयविकाराचा झटका आला, तरी देखील छातीच्या मध्यभागी जळजळ होऊ लागते. उपचार करताना ही जळजळ नेमकी कशामधे होते आहे हे ओळखण्यात चूक झाली तर हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला आम्ल कमी करण्याचे औषध दिले जाते. रुग्णाची तक्रार काळजीपूर्वक ऐकून होणारा त्रास कशामुळे आहे, हे ओळखता येते. त्यामुळे रुग्ण त्याची तक्रार सांगत असताना ही जळजळ कशामुळे आहे, याचा अंदाज बरोबर करता येतो. केवळ शरीर तपासून ते कारण कळेल असे नाही. तळपायाची आग होताना ती कशी सुरु झाली, केव्हा कमी/जास्त असते, सिमेंटच्या रस्त्यावर अनवाणी चालला होता का अशी माहिती महत्वाची ठरते. 

तळपायांना होणारा दुसरा त्रास म्हणजे टाचा दुखणे. पावलांच्या आतमधे एक पदर असतो. प्रत्येक वेळा आपण चाललो की तो पदर ताणला जातो व परत पूर्ववत होतो. त्यामुळे हा पदर काही ठिकाणी झिजतो, पातळ होतो किंवा फाटतो. येथून निघणाऱ्या शिरा टाचेतून वर पायाकडे संवेदना नेतात. त्यामुळे रूग्णाला आपली टाच दुखते आहे, अशी भावना येते. कधीकधी संबंध तळव्यालासुद्धा काही वेदना होतात असे रूग्णाला वाटते. पण प्रत्यक्ष तळवा तपासला, तर बाहेरुन दिसेल असा कोणताही दोष तिथे आढळत नाही. अशा तऱ्हेची झीज व पदर फाटणे, हे आपल्या शरीरात इतर ठिकाणाही होऊ शकते. उदाहरणार्थ खांदा, कोपर, पाठ, छातीच्या पिंजऱ्यातील फासळ्यांच्या पुढच्या टोकाची कुर्चा. हा दोष आपोआपच दुरुस्त करण्याची यंत्रणा आपल्या शरीरात आहे त्यामुळे नऊ महिने ते तीन वर्षात यातला कुठलाही त्रास शमतो.

वेदनाशामक औषधांचा उपयोग काही काळ वेदना कमी करण्याकडे होतो, पण तो त्रास जात नाही. फिजिओथेरपी ही उपचार पद्धती हे दोष लवकर बरे करु शकते. 

तळपायांच्या पंजामध्ये आपल्या हाडाच्या सांगाड्याचाच एक भाग असतो. ती हाडे बरीचशी पोकळ असतात. त्यांच्यावर अकस्मात ताण आला तर ती मोडू शकतात. सहसा पावलामधे अंगठ्यापासून दुसरे किंवा तिसरे हाड असे मोडते. याला ‘मार्च फ्रॅक्‍चर’ असे म्हणतात. आपण नेहमीपेक्षा पाच सहा पटीने जास्त चाललो, तर असा प्रकार घडतो. आपल्याला तेव्हा वेदना अस्थिभंगाप्रमाणे होत नाही. परंतु पावलावर सूज येते. हे हाड देखिल आपोआपच दुरुस्त होते. एकाच पावलावर कारण नसताना (मार लागणे, पडणे) सूज आली, तर ते ‘मार्च फ्रॅक्‍चर’ असण्याची शक्‍यता असते. 

शरीरात वेदना होणे, ही गोष्ट प्रकृतीच्या दृष्टीने उपयुक्त असते. ज्या भागात वेदना होते, तेथे आपले लक्ष जाते व आजार नाही ना हे पाहिले जाते. हे आजार प्राणघातक नसतात. पण वेदना सहन करावी लागते. बहुतांशी ती वेदना फिजिओथेरपीने लवकर जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com