डोकेदुखी

डॉ. ह. वि. सरदेसाई
Friday, 17 November 2017

डोके असेल तर कधी ना कधी ते दुखतेच. कारणे अनेक. शरीरात पाण्याची कमतरता असेल तरी डोके दुखते. सर्दी, ताण येणे, डोक्‍याला मार लागणे, नाका-घशात धूर जाणे, खूप वेळ संगणकासमोर अथवा टीव्हीच्या पडद्यासमोर असणे ही कारणेही डोकेदुखीला पुरेशी असतात. बहुतेक वेळा मर्यादित काळापुरतीची डोकेदुखी गंभीर नसते किंवा जिवाला धोका असणाऱ्या परिस्थितीचे लक्षण नसते. पूर्वीच्या अनुभवावरून ज्या घटनांनी डोकेदुखी सुरू होते, त्या घटना शक्‍यतो टाळाव्यात. मसाज करण्याचा फायदा होतो. शांत व अंधाऱ्या जागेत पडून राहण्याचाही उपयोग होऊ शकतो. वेदनाशामक औषधे शक्‍यतो टाळावीत. डोकेदुखीचे नेमके कारण शोधून त्यानुसार उपाययोजना केली पाहिजे.

काहींचे डोके वारंवार दुखते, काहींना डोकेदुखीचा अत्यंतिक त्रास होतो. बहुतेक वेळा डोकेदुखी गंभीर किंवा जिवाला धोका असणाऱ्या परिस्थितीचे लक्षण नसते. जेव्हा डोकेदुखी एखाद्या गंभीर परिस्थितीचे लक्षण असते, तेव्हा रुग्णाला डोके दुखण्याच्या बरोबरीने इतरही त्रास होत असतात. उदाहरणार्थ, डोके दुखण्याबरोबर फिट (अपस्मार किंवा फेफरे) येणे, काही काळ रुग्ण बेशुद्ध होणे, एका ऐवजी दोन दिसणे इत्यादी. डोके दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. बहुतेक वेळा मर्यादित काळापुरतीची डोकेदुखी गंभीर नसते. अशा गंभीर नसणाऱ्या प्रकारापैकी स्नायूत तणाव निर्माण झाल्याने जाणवणारी डोकेदुखी हा प्रकार प्रत्येक माणसाने केव्हा ना केव्हातरी अनुभवलेला असतो. याला ‘टेंशन हेडएक’ म्हणतात. कपाळ, कानावरचा कवटीचा भाग, मानेच्या वर या भागात एखादा पट्टा आवळला जावा अशा प्रकारचे दुखणे असते. यातील काही भाग दुखरा झाल्याचे (दाबल्यावर दुखणे) जाणवते. अशा टेन्शन हेडएकच्या बरोबरीने मळमळ किंवा उलटीचा त्रास सहसा होत नाही. किंवा प्रखर उजेडाचाही असह्य त्रास जाणवत नाही. अशी डोकेदुखी काही आठवडे किंवा महिने टिकू शकते. उलटपक्षी ‘मायग्रेन’ (अर्धशिशी) प्रकारात डोकेदुखी बाहत्तर तासांपेक्षा जास्त वेळ टिकत नाही. मानसिक तणाव, मोठे आवाज, नाका-घशातून जाणारे धूर, दीर्घकाळ दूरचित्रवाणी अथवा संगणक यांच्या पडद्यांचे निरीक्षण अशा घटनांनी ‘टेंशन-हेडएक’ सुरू होण्याची शक्‍यता असते. शरीरात पाण्याची कमतरता होणे हे ही एक महत्त्वाचे कारण असू शकते. डोक्‍याला मार लागणे हे तर कारण उघडच असते. परंतु, कधी कधी आपले डोके का दुखत असेल, मोठा आजार तर नसेल ना, अशा विचारांनी या प्रकारची डोकेदुखी अधिकाधिक जास्त वेळ चालू राहते! अशा प्रकारची (टेंशन हेडएक प्रकारची) डोकेदुखी त्रासदायक असली तरी धोकादायक नसते हे ध्यानात ठेवावे!

पूर्वीच्या अनुभवावरून ज्या घटनांनी डोकेदुखी सुरू होते, त्या घटना शक्‍यतो टाळाव्यात. मसाज करण्याचा फायदा होतो. नियमाने केलेल्या व्यायामाचाही उपयोग होतो. शरीरात पाणी कमी पडले असेल अशी शंका आल्यास (अंगात ताप, गरम हवा. घाम येणे, जुलाब होणे) थोडे-थोडे पाणी वारंवार प्यावे. आपल्या पूर्वीच्या अनुभवावरून एखादी वेदनाशामक औषधाची गोळी घेण्यास हरकत नाही. परंतु, वारंवार वेदनाशामक औषधांचे सेवन करणे डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.

डोके दुखण्याचे दुसरे कारण मायग्रेन (अर्धशिशी) होय. या प्रकारात ठोके पडल्यासारखे (घणाघाती) डोके दुखते. सहसा माथ्याचा पुढचा भाग दुखतो. डोके दुखीबरोबर मळमळ होणे, उळटी येणे, डोळ्यांसमोर प्रकाशाचे झोत दिसणे किंवा शरीरात मुंग्या येत असल्यासारख्या संवेदना जाणवतात. बऱ्याच वेळा अशी डोकेदुखी कुटुंबात, घराण्यात इतर व्यक्तींनाही असते. कॉफी, कोला पेये, चॉकलेट, पुरण अशा पदार्थांचे सेवन डोकेदुखीला कारणीभूत ठरू शकते. ॲस्पिरीन किंवा पॅरॅसिटॅमॉल अशा औषधांनी आराम पडतो. काही वेळा वेदनाशामक औषधांचा परिणाम ओसरला, की पुन्हा डोकेदुखी सुरू होऊ शकते, याचे भान ठेवणे आवश्‍यक असते. शांत व अंधाऱ्या जागेत पडून राहावे (झोप लागली तर उत्तमच).

डोके दुखण्याचे असेच त्रासदायक, परंतु धोका नसणारे कारण म्हणजे ‘सायनसायटिस’ हे होय. नाकाच्या बाजूच्या चेहऱ्याखाली असणाऱ्या पोकळ्यांना ‘सायनस’ म्हणतात. यात ॲलर्जी अथवा जीवाणू-विषाणू यामुळे झालेल्या संसर्गामुळे डोके दुखते. सहसा अशा आजाराबरोबर सर्दी, खोकला, ताण, नाक वाहणे असे त्रास असतात. नाकाच्या बाजूच्या चेहऱ्याचा भाग दाबला तर दुखते (भाग दुखरा होतो). वाफारा घेण्याने बहुतेक वेळा आराम पडतो. कधी कधी प्रतिजैविके किंवा ॲलर्जी काबूत आणण्यासाठी औषधे किंवा शस्त्रक्रिया आवश्‍यक पडू शकते.

‘क्‍लस्टर हेड-एक’ हा एक डोके दुखण्याचा त्रासदायक प्रकार असतो. हा आजार पुरुषांना जास्त प्रमाणात होतो. बऱ्याच वेळा वयाच्या तिशीत सुरू झालेला हा त्रास वयाच्या पस्तिशीपर्यंत ओसरू लागतो. धूम्रपान किंवा मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये क्‍लस्टर हेड एक जास्त वेळा होताना आढळते. एका डोक्‍याच्या बाजूने अथवा मागच्या बाजूला अतोनात वेदना होतात. डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ज्या बाजूने डोके दुखते, त्या बाजूची नाकपुडी चोंदणे, रुग्णाला उलटी होते. दिवसातल्या ठरावीक वेळेला डोके दुखते. उदाहरणार्थ, एखाद्या रुग्णाचे डोके सकाळी उठता उठता दुखू लागते. क्‍लस्टर हेड एक हा डोकेदुखीचा एकच असा प्रकार आहे, की रुग्णाची डोकेदुखी झोप लागलेली असताना सुरू होऊ शकते, त्यामुळे झोपमोड होते. वेदनेचा काळ पंधरा मिनिटांपासून तीन तासांपर्यंत असू शकतो. डोके दुखत असताना रुग्ण अस्वस्थ होतो, स्थिर राहणे कठीण होते. रुग्ण येरझाऱ्या मारत राहतो. एकदा डोकेदुखीचे झटके येऊ लागले, की आठवड्यातून अनेकवेळा येऊ लागतात. पण ते थांबले, की कित्येत महिने त्रास होतही नाही. काही विशेष त्रासदायक काळात एकाच दिवसात अनेक झटके येऊ शकतात. सर्वसामान्य वेदनाशामक औषधांचा उपयोग होत नाही. लिथियम कार्बोनेट या औषधाचा चांगला उपयोग होतो. दुर्दैवाने या औषधाचा वापर धोक्‍याचा ठरू शकतो, म्हणून या औषधाबद्दल चांगली माहिती असणाऱ्या न्यूरॉलॉजिस्ट डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच लिथियम घ्यावे.

क्‍लस्टर हेडएकचा झटका शंभर टक्के ऑक्‍सिजनवायू घेण्याने थांबू शकतो. झटके येण्याच्या काळात अशा वायूचा एक सिलिंडर व ऑक्‍सिजन देण्याची, बरोबर नेता येईल अशी (पोर्टेबल) यंत्रणा बरोबर बाळगावी लागते.

चेहरा, कपाळाचा काही भाग ‘ट्रायजेमिनल न्यूराल्जिया’ या विकारामुळे दुखू शकतो. हा आजार प्रौढ आणि वयस्कर व्यक्तींना होण्याचा संभव जास्त असतो. नागीण आणि मज्जातंतूच्या इतर आजारामध्ये असा त्रास होऊ शकतो. चेहऱ्यावर गार वाऱ्याचा झोत लागणे, थंड पेय पिणे, आईस्क्रिमसारखे गार पदार्थ सेवणे अशा घटनांनी वेदना सुरू होऊ शकते. वेदनेची सुरवात अकस्मात होते. वेदना अत्यंत तीव्र असते, त्यामुळे रुग्ण मागे हटतो. ही हालचाल अनैच्छिक प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे होत राहते. त्यामुळे त्याला वेळोवेळी चेहऱ्यावर किंवा इतरत्र होणारी हालचाल करण्याची सवय लागते. वेदनेचा झटका काही सेकंद (क्वचित मिनिटभर) टिकतो,  पण दिवसभरात अनेकवेळा येऊ शकतो. झटका येऊन गेल्यावर थोडा काळ तेथे तुलनेने सौम्य संवेदना जाणवत राहू शकते. या आजारावर चांगली परिणामकारक औषधे (कार्बामेझापिन, ट्रिप्टोमर ) उपलब्ध आहेत. क्वचित शस्त्रक्रिया करतात.

डोकेदुखीचे काही प्रकार गंभीर असू शकतात. त्यात महत्त्वाचे कारण म्हणजे कवटीच्या आत दाब वाढणे हा होय. मेंदूच्या बाजूला असणाऱ्या द्रव पदार्थाच्या अभिसरणात अडथळा येण्याने असे होते. मेंदूत गाठ होणे या आजारात डोके दुखणे हे एक प्रमुख लक्षण असू शकते. मेंदूत गाठ झालेल्या रुग्णाच्या डोकेदुखीच्या इतर तक्रारीदेखील होतात. वाचेचा वापर किंवा लिहिणे नीट होईनासे होऊ लागते. सामान्यतः संपूर्ण मस्तक दुखू लागते. हातापायात मुंग्या येतात. कमजोरी भासते. कौशल्याची कामे नीट करता येत नाहीत. (उदाहरणार्थ सुईच्या डोळ्यात दोरा ओवणे), सकाळी झोपेतून जागे होताना डोके जास्त दुखणे. रुग्ण उभा राहिला की वेदनेची तीव्रता कमी होते. खोकताना, शिंकताना किंवा कुंथताना वेदना वाढते. पुढं वाकले तर डोके दुखी अधिक तीव्र जाणवते. सकाळी उठल्या उठल्या उलटी होण्याचा त्रास अनेकांना होतो. जसे दिवस किंवा आठवडे जातील तसे डोके दुखणे अधिकाधिक तीव्र होते. काही आजारांत (उदाहरणार्थ हायड्रोकॅफॅलस) डोकेदुखी झपाट्याने वाढते, तर मेंदूत गाठ झालेली असली तर डोकेदुखीत वाढ फार झपाट्याने होणे अपेक्षित नसते.

मेंदूच्या सभोवताली एकावर एक तीन अभ्रे असतात. त्यांत कधी कधी रक्तस्राव होतो. डोके अकस्मात आणि अत्यंतिक तीव्रतेने दुखू लागते. रुग्णाची मान ताठ होते. काही रुग्ण बेशुद्ध होतात. हा एक गंभीर आजार आहे. त्याच्या उपचाराकरता अनुभवी तज्ज्ञ, निष्णात न्युरोसर्जनची गरज असते. मेंदूच्या अभ्रयात जीवाणूंचा संसर्ग होणे हीदेखील एक गंभीर अवस्था होय. मान अवघडते, उजेड सहन होत नाही. रुग्णाला ताप येतो, काहींना त्वचेवर रॅश येतो.

डोकेदुखी सौम्य असो किंवा तीव्र, नुकतीच सुरू झालेली असो, अथवाकाही वेळ चालू असो, त्या स्थितीला जबाबदार असणाऱ्या आजाराचे निदान लवकरात लवकर केलेच पाहिजे. या करता अनेकदा पाठीतून पाणी काढणे, स्कॅन करणे असे तपास आवश्‍यक असतात. अशा सोयी या रुग्णालयात असतील तेथेच रुग्णाला दाखल करावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: h-v-sardesai article Headache