तातडीचा उपचार

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 8 June 2018

आयुर्वेदात इमर्जन्सीसाठी तातडीचे उपचार आहेत. बऱ्याच वेळा वस्तुस्थितीकडे किंवा रोगाकडे वेळच्या वेळी लक्ष न दिल्यामुळे अचानक इमर्जन्सी तयार होते, पण इमर्जन्सी त्याच्यावर करण्यात येणाऱ्या तातडीच्या उपचारासाठी उद्युक्त करणारी असल्यामुळे त्याच्या कारणाची जास्त चर्चा करणे आवश्‍यक वाटत नाही. अगदी आपण घरच्या घरीही काही उपचार करू शकतो. 

वेळ न दवडता लागलीच करायचे उपचार म्हणजे इमर्जन्सी उपचार. इमर्जन्सी या शब्दात ‘अर्जन्सी म्हणजे तातडीचे’ हा शब्द आलेलाच आहे. सध्या हा शब्द लहान मोठ्यांच्या तोंडी बसलेला दिसतो व तो मराठी असल्यासारखाच सर्व जण वापरतात. धावपळीच्या जीवनात आणि वाढणाऱ्या रोगराईमुळे साध्या व दीर्घकालीन चालणाऱ्या रोगाबरोबरच इमर्जन्सी म्हणावी लागेल, असे अनेक रोग पसरत आहेत. काही शारीरिक दुखापत किंवा आजारपणासंबंधीच इमर्जन्सी असते असे नाही. कोठल्याही प्रकारची घटना, की जी लक्ष न दिल्यास आवाक्‍याबाहेर जाऊन धोकादायक ठरू शकते, त्या प्रसंगाला इमर्जन्सी म्हटले जाते व त्या ठिकाणी तातडीने लक्ष घालण्याची आवश्‍यकता निर्माण झालेली असते. 

अनेक प्रकारचे इमर्जन्सी प्रसंग जरी येऊ शकत असले, तरी त्यातल्या त्यात रोगामुळे किंवा अपघातामुळे येणाऱ्या इमर्जन्सीच्या प्रसंगांचीच चर्चा अधिक होते. बऱ्याच वेळा वस्तुस्थितीकडे किंवा रोगाकडे वेळच्या वेळी लक्ष न दिल्यामुळे अचानक इमर्जन्सी तयार होते, पण इमर्जन्सी त्याच्यावर करण्यात येणाऱ्या तातडीच्या उपचारासाठी उद्युक्त करणारी असल्यामुळे त्याच्या कारणाची जास्त चर्चा करणे आवश्‍यक वाटत नाही.

आयुर्वेदाचा हेतू रोगाला मुळातून काढण्याचा असतो. त्यात योजलेले उपचार अत्यंत सोपे, त्यापासून काही अन्य त्रास उत्पन्न न होणारे असल्यामुळे आयुर्वेदामध्ये लगेच गुणकारी ठरतील असे अनेक उपाय सुचविलेले आहेत. प्रत्येक अवयवागणिक काय करावे, कान दुखल्यास काय करावे, नाकातून पाणी गळत असल्यास काय करावे, सुरीने कापले तर काय करावे, गवताच्या पात्याने कापले तर काय करावे, उंदीर, कुत्रा वगैरे चावल्यास, मधमाशी वगैरे कीटक, किडा चावला तर लागलीच काय उपाय करावेत, ते आयुर्वेदात सांगितलेले आहेत.

आयुर्वेदाने छोट्या छोट्या व अगदी हाताशी असणाऱ्या वस्तूंचा उपयोग करून घेऊन त्यातून मार्ग दाखविलेला असतो. अगदी कणकेचे पोटीस बांधण्यापर्यंतचे साधे सोपे उपचार दिलेले असतात. रस्त्याच्या कडेला, बागेत, जंगलात, शेताच्या बांधावर अशी सगळीकडे सापडणाऱ्या रुईच्या पानांनी छाती शेकल्यास प्रथमावस्थेतला सर्दी- खोकला बरा होतो, असेही सोपे व प्रभावी उपचार दिलेले आहेत. 

इलाज करताना तो अगदी सेफ पाहिजे म्हणजे अशा उपचारांपासून काडीचेही नुकसान होणार नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे. त्या उपचारापासून फायदा पन्नास टक्के होवो किंवा शंभर टक्के होवो, पण नुकसान मात्र मुळीच होऊ नये याची काळजी घेऊनच त्या गोष्टी तातडीने करावयाच्या उपचारात समाविष्ट करता येतात. 

लहान मुले असलेल्या घरात पडणे, खरचटणे, कापणे हात मुरगळणे असे प्रकार घडतच असतात. यावर खरे पाहता घरच्या घरी तातडीने उपचार करणे हाच सहसा खरा इलाज असतो. ऊठसूट डॉक्‍टरांकडे धाव घ्यायची गरजच नसते. अशा तऱ्हेच्या सर्व पद्धती आयुर्वेदात विकसित केलेल्या सापडतात. भाजलेल्या ठिकाणी कोरफडीच्या ताज्या गरामध्ये थोडे तूप व मध मिसळून तयार केलेले मिश्रण लावण्याने आग तर कमी होतेच, पण फोड वगैरे न येता त्वचा पूर्णपणे पूर्ववत होते. मधमाशी वगैरे चावली तर त्या ठिकाणीसुद्धा कोरफडीचा ताजा गर किंवा लिंबाचा रस लावण्याने बरे वाटते.  

खरे पाहता खेडोपाडी अगदी आदिवासींना, कातकऱ्यांना असलेल्या वनस्पतींची वा अशा प्रकारच्या उपायांची, माहितीची सुसूत्रीकरण करून लोकांना उपलब्ध करून दिली, तर अनेक मोठे रोग टळू शकतील व सर्वांचे स्वास्थ्य चांगले राहील. फक्‍त गरज आहे अशा सर्व प्रकारच्या व्यवस्थापनाची. 

‘स्टिच इन टाइम सेव्हज्‌ नाइन’ असे म्हटलेले आहे. वेळच्या वेळी केलेला छोटा व योग्य उपचार एखाद्या मोठ्या रोगापासून किंवा एखाद्या शस्त्रक्रियेपासून वाचवू शकतो त्याचप्रमाणे तो दीर्घकाळपर्यंत चालणाऱ्या रोगाला किंवा दीर्घकाळाच्या रोगामुळे होणाऱ्या खर्चापासूनही वाचवू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health message Emergency treatment