हृदयाची काळजी! 

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 13 October 2017

हृदयात एकदा बिघाड झाला की, तो अगदी शंभर टक्के बरा झाला असे सहसा होत नाही.एकदा हृद्रोग झाल्यावर त्रास होत नसला तरीसुद्धा हृदयाला पोषक औषधे, रसायने, प्रकृतीनुरूप आहार-आचरण याकडे लक्ष द्यायला लागते. यामध्ये पंचकर्मालाही महत्त्वाचे स्थान असते. पंचकर्माने शरीरशुद्धी झाल्यावर हृदयाची कार्यक्षमता वाढायला तर मोठा वाव असतोच, पण पुन्हा पुन्हा हृदयाला धोका उद्भवू नये यासाठीही पंचकर्म मोलाची मदत करते. 

सध्या सर्वांना दीपावलीचे वेध लागलेले आहेत. दीपावलीचा खरा आनंद घ्यायचा असेल तर आरोग्य महत्त्वाचे असते, विशेषतः हृदयासारख्या नाजूक आणि अहर्निश काम करणाऱ्या अवयवाची काळजी कशी घ्यायची हे सर्वांना माहिती असणेही गरजेचे असते. खरे तर हृदय संपूर्ण शरीराला रक्‍ताचा पुरवठा करत असते, पण त्यासाठी त्याला स्वतःला रक्‍त मिळणे सुद्धा आवश्‍यक असते. शरीरातील लहानातील लहान पेशीपर्यंत शुद्ध रक्‍त पोचावे यासाठी हृदयाचे अव्याहतपणे आकुंचन-प्रसरण होत असते. यासाठी हृदयातील मांसपेशींनाही रक्‍तामार्फत ताकद मिळत राहावी लागते. हे काम हृदवाहिन्या करत असतात. चुकीचा आहार-विहार, अनुशासनाचा व व्यायामाचा अभाव यामुळे शरीरात त्रिदोषांचे असंतुलन झाले, विशेषतः वातदोष बिघडला तर हृदयवाहिन्यांमध्ये रुक्षता वाढू लागते, काठिण्य येऊ लागते किंवा त्या संकोच पावू शकतात. असंतुलित पित्तामुळे त्यांची प्राकृत दृढता कमी झाली तर रक्‍ताभिसरणात अडथळा येऊ शकतो व वाढलेल्या कफदोषामुळे त्या जाडसर झाल्यास रक्‍ताभिसरण व्हायला हवे तसे होऊ शकत नाही. 

या प्रकारच्या हृद्रोगात छातीत दुखणे, दाह होणे, जडपणा जाणवणे, अस्वस्थ वाटणे, तोंड कोरडे पडणे, श्वासोच्छ्वासाला त्रास होणे, थोडेही चालले तर दम लागणे, धडधड होणे, मळमळणे वगैरे अनेक प्रकारची लक्षणे असतात. फारच तीव्र लक्षणे असली व वेळेवर योग्य उपचार मिळाले नाहीत, तर प्रसंगी मृत्यू येऊ शकतो. अवरोधजन्य हृद्रोगात बऱ्याचदा आत्ययिक चिकित्सा करण्याची पाळी येते. मात्र लक्षणांची तीव्रता कमी झाल्यावर अवरोध दूर करणारे, पुन्हा पुन्हा नवीन अवरोध तयार होण्यास प्रतिबंध करणारे उपचार करणे शक्‍य असते. प्रकृतीनुरूप उपचारांचे स्वरूप बदलत असले तरी या अवस्थेमध्ये पंचकर्माने शरीरशुद्धी व औषधी घृताची हृद्‌बस्ती यांचा उत्कृष्ट फायदा होऊ शकतो. फक्त हे पंचकर्म शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले असावे, फक्त एक-दोन बस्ती, शिरोधारा, मसाज घेण्याला पंचकर्म म्हणता येत नाही. अवरोध झाल्यावरच नव्हे, तर अवरोध होऊ नये, वातदोषादी संतुलित राहावेत, हृदयाला रक्‍ताचा पुरवठा व्यवस्थित होत राहावा यासाठी मुळात आरोग्य-सवयी लावून घेणे आणि वयाच्या पस्तिशीच्या आसपास शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म करून शरीरशुद्धी करून घेणे योग्य असते. विशेषतः ज्यांच्या घरात हृद्रोगाची आनुवंशिकता आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम असतो.

हृदयाची सामान्य गती सर्वसाधारणपणे दर मिनिटाला ७२ असते. लहान मुलांमध्ये ही स्वभावतःच जलद असते. उत्कंठा, भीती आदी मानसिक बदलांमुळे हृद्‌गती वाढू शकते किंवा ताप वगैरे रोगातही हृद्‌गतीचा वेग वाढतो. मात्र हे बदल तात्पुरते असतात. उत्कंठा, भीती, ताप यासारखे कोणतेही कारण नसतानाही हृद्‌गती वाढणे किंवा खूप कमी होणे हा हृद्रोगाचाच एक प्रकार समजला जातो. हृद्‌गतीमधील नियमितता कमी-जास्ती होणे, हृदयाचा ठोका मध्येच चुकणे हा सुद्धा एक हृद्रोगच असतो. अशा केसेसमध्ये तज्ज्ञांकरवी योग्य निदान करून, गरज असल्यास तपासण्या करून घेऊन योग्य उपचार करावे लागतात.

हृद्रोगाचा अजून एक प्रकार म्हणजे आमवाताचा परिणाम म्हणून होणारा हृद्रोग. ‘आम’ हा अपचनातून तयार होतो. अग्नी मंद झाला की तो अन्नाचे पचन व्यवस्थित करत नाही, त्यातून आम म्हणजे अर्धा कच्चा, अर्धा पक्का असा आहाररस तयार होतो आणि हा आम शरीराला अतिशय त्रासदायक ठरणारा असतो. पचन योग्य झाले की जो आहाररस तयार होतो तो सर्व शरीराला ताकद देतो, सर्व शरीरात सहजपणे सामावला जातो, मात्र आम शरीरात सामावला जात नाही, उलट वातदोषाच्या गतीला अडथळा आणतो. यातून आमवात तयार होतो. आमवातावर वेळेवर आणि योग्य उपचार झाले तर ठीक असते अन्यथा त्याचा परिणाम म्हणून हृद्रोग होऊ शकतो. बऱ्याचदा असेही दिसते की,  लहान वयात आमवातामुळे सांधेदुखीचा त्रास झालेला असतो आणि चाळिशी-पंचेचाळिशीनंतर एकदम हृद्रोग होतो. अशा वेळी पूर्वी झालेला आमवात लक्षात घेऊन उपचार करावे लागतात. या प्रकारच्या हृद्रोगात औषधयोजना करताना हृदयाची ताकद वाढेल, हृदयातील दोष दूर होईल असे उपचार करावे लागतातच, बरोबरीने आमपाचक आणि वातनाशक उपायही योजावे लागतात. यामध्ये वैश्वानर चूर्ण, रास्नापंचक, महारास्नादी काढा, शुण्ठी घृत वगैरे योगांचा समावेश होतो. एका रोगाचा परिणाम म्हणून जेव्हा दुसरा रोग होतो तेव्हा तो बरा करणे अधिक अवघड असते. त्यामुळे आमावातामुळे झालेल्या हृद्रोगावर वेळीच योग्य उपचार करण्याकडे लक्ष द्यायला लागते. 

हृद्‌व्यास - म्हणजेच हृदयाचा आकार वाढणे. आयुर्वेदात हे हृद्रोगाचे केवळ एक लक्षण म्हणून दिलेले आहे. आधुनिक परिभाषेत याला ‘हार्ट एन्लार्जमेंट’ किंवा ‘हायपरट्रॉफी’ असे म्हटलेले आढळते. हृदयाचा आकार वाढतो म्हणजे हृदय ज्या पेशींपासून बनलेले आहे त्यांची लवचिकता, दृढता कमी होते व त्या शिथिल होतात. अर्थातच याचा परिणाम म्हणून हृदयाची कार्यक्षमता लक्षणीय रीत्या घटते, रक्‍ताभिसरणाची प्रक्रिया मंदावते. 

एओर्टिक ॲन्युरिझम - क्वचित काही व्यक्‍तीमध्ये हृदयातून निघणारी मुख्य धमनी (महाधमनी, एओर्टा) विस्तारित पावते. याला ‘एओर्टिक ॲन्युरिझम’ असे म्हटले जाते. हाही हृदयव्यासाचाच एक प्रकार समजावा लागतो. सर्व प्रकारच्या हृद्‌व्यासांवर हृदयाच्या पेशींची ताकद वाढवणे आणि वाताचे शमन करणे या क्रियासूत्रांचा प्रयोग करावा लागतो. दशमूलादि घृत, शतावरी घृत, ‘सुहृदप्राश’सारखे रसायन, नियमित अभ्यंग, शास्त्रोक्‍त शरीरशुद्धी करून घेऊन वातशामक आणि हृदयपोषक द्रव्यांनी संस्कारित केलेल्या तेला-तुपाची हृदबस्ती यासारखे उपाय योजावे लागतात. 

ॲथेरोस्क्‍लेरॉसिस - हृदवाहिनीमध्ये अवरोध तयार झाल्याने हृद्रोग होतो हे आपण पूर्वी पाहिले आहेच. हृदवाहिनी कडक होणे, तिच्यातील लवचिकता कमी होणे, तिची दृढता कमी होणे यामुळेही हृद्रोग होऊ शकतो. तसे पाहता फक्‍त हृदयाच्याच नाही तर शरीरातील कोणत्याही रक्‍तवाहिनीमध्ये या प्रकारचा दोष निर्माण होऊ शकतो आणि त्यातून वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. आधुनिक परिभाषेत याला ‘ॲथेरोस्क्‍लेरॉसिस’ असे म्हटले जाते. आयुर्वेदिक दृष्ट्या विचार केल्यास हे वातदोषामुळे, शरीरात रुक्षता वाढल्याने, आवश्‍यक ती लवचिकता व ताकद कमी झाल्याने असे होऊ शकते. यावरही रक्‍तवाहिनीला पोषक व वातशामक औषधांची योजना करावी लागते. शास्त्रोक्‍त पंचकर्माचाही उत्कृष्ट उपयोग होऊ शकतो. 

हृद्‌ग्रह - म्हणजे हृदय जखडल्यासारखे, हृदयात अडकल्यासारखे वाटणे. हृद्‌ग्रह मुख्यत्वे वातदोषामुळे होतो, यात बरोबरीने छातीत व पाठीत तीव्र वेदना होणे, खोकला येणे, दम लागणे, दातखीळ बसणे, चक्कर येणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणे असतात. हृद्‌ग्रहावर तातडीने उपाययोजना करणे खूप आवश्‍यक असते. वाताला कमी करणारे आणि लवकरात लवकर रक्‍ताभिसरण पूर्ववत होण्यास मदत करणारे उपचार करावे लागतात.

हृदय हा एक असा अवयव आहे, ज्याच्यात एकदा बिघाड झाला की तो अगदी शंभर टक्के बरा झाला असे सहसा होत नाही. जसे पंकप्रक्षालन न्यायाप्रमाणे चिखलाने बरबटलेले वस्त्र कितीही धुतले तरी सुद्धा पुन्हा पहिल्यासारखे होऊ शकत नाही, तसेच एकदा हृद्रोग झाल्यावर त्रास होत नसला तरी सुद्धा हृदयाला पोषक औषधे, रसायने, प्रकृतीनुरूप आहार-आचरण याकडे लक्ष द्यायला लागते. यामध्ये पंचकर्मालाही महत्त्वाचे स्थान असते. पंचकर्माने शरीरशुद्धी झाल्यावर हृदयाची कार्यक्षमता वाढायला तर मोठा वाव असतोच, पण पुन्हा पुन्हा हृदयाला धोका उद्भवू नये यासाठीही पंचकर्म मोलाची मदत करते. हृद्रोगामुळे दहा-बारा पावले चालणेही अवघड वाटत असणाऱ्या अनेक व्यक्‍ती पंचकर्मानंतर औषध-रसायनांच्या सेवनानंतर काहीही त्रास न होता चालणे, जिना चढणे वगैरे गोष्टी करू शकतात असा अनुभव आहे. हृद्रोगावर मुळापासून उपचार करताना आणि पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये यासाठी आहार-आचरणात पुढीलप्रमाणे नियम सांभाळता येतात, 

आहार पचनाकडे लक्ष देणे, प्रकृतीनुरूप व पचण्यास हलके अन्न खाणे, आहारात आले, सुंठ, मिरी, हिंग, जिरे वगैरे दीपक, पाचक द्रव्यांचा समावेश असू देणे. 

आठवड्यातून एक दिवस रात्रीचे लंघन करणे, यामुळे पोटाला विश्रांती मिळते व पचन व्यवस्थित राहण्यास मदत मिळते. 

नियमित चालायला जाणे, प्रकृतीनुरूप आसने करणे. 
अनुलोम-विलोम, ॐकार गूंजन व ध्यानसंगीत यांच्या मदतीने शरीरात प्राणसंचार व्यवस्थित व्हावा व हृदयाला प्राणशक्‍तीचा पुरेसा पुरवठा व्हावा याकडे लक्ष देणे. 
तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने हृदयाची ताकद वाढवणारी, सुहृदप्राश, कार्डिसॅन प्लस वगैरे रसायने नियमित सेवन करणे. 
नियमित अभ्यंग करणे, विशेषतः छाती-पोट व पाठीवर रोजच हलक्‍या हाताने तेल जिरवणे. 
वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्‍त पंचकर्म व त्या मागोमाग औषधांचा संस्कार केलेल्या तुपाची हृद्‌बस्ती घेणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heart care