रंग खेळताय, पण जपून...

- संतोष शेणई 
Friday, 10 March 2017

निसर्गाने आपल्या आसपास रंगांची उधळण केलेली असते. वसंत ऋतू हा तर रंगराज आहे. त्यामुळे रंगात रंगून जाण्याचा स्वभाव असलेल्या माणसांसाठी रंगोत्सव हा आनंद देणारा असतो. जीवनात आनंद आणणाऱ्या या रंगांची उधळण जपून करा, स्वतःबरोबरच दुसऱ्याचीही काळजी घ्या आणि त्याचा आनंद लुटा. 

आनंद, उत्साह, उल्हास यांचा सण म्हणजे होळी. आपल्याकडे धुळवड व रंगपंचमी अशा दोन्ही दिवशी रंगोत्सव साजरा करतात. लाल, पिवळा, हिरवा, निळा अशा रंगांची उधळण करीत रंगांचा उत्सव साजरा केला जातो. जीवनात आनंद देणाऱ्या रंगांना या दिवशी महत्त्व आहे. त्यांची उधळण केलीच पाहिजे, पण जरा जपून. आपली आणि इतरांचीही काळजी घेत रंग उधळले, तर रंगपंचमी नक्कीच आनंददायक होऊ शकेल. 
अलीकडे उत्सवापेक्षा हा सण रंगांच्या वापरामुळे काही अंशी धोकादायक बनला आहे. कित्येक जण रंगांचा वापर करताना अनैसर्गिक रंगांना प्राधान्य देतात. परिणामी त्वचेचे आणि केसांचे नुकसान होते. हे नुकसान कित्येक वेळा दीर्घकाळ राहते. हे रंग आपल्या केसांना व त्वचेला नुकसान पोचवू शकतात. काही वेळा अशा रंगांनी डोळ्यांना इजा पोचली आहे. रंगांमुळे श्वसनसंस्था, पचनसंस्थांनाही इजा होऊ शकते. चांदीसारख्या रंगामुळे कर्करोगाचाही धोका बळावतो. म्हणूनच उत्सवाचा बेरंग होण्याआधी आपल्याला या नुकसानीपासून स्वत:ला वाचवणे आवश्‍यक आहे. 
रंगपंचमी खेळताना लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. कारण रंग खेळल्यावर त्यांच्या नखात अनेकदा रंग अडकून राहतो. त्याच हाताने त्यांनी काही खाल्ल्यास त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. अनेकदा उत्साहात रंगपंचमी खेळताना मुलांच्या तोंडात रंग जातो. त्यामुळेही त्यांच्या घशाला, पोटाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच नखांमध्ये अडकलेला रंग काढण्यासाठी तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नये, हेही विसरता कामा नये. 

कृत्रिम रंगांचा धोका... 
कृत्रिम रंग तयार करताना इंडस्ट्रीयल डाय आणि रसायनांचा वापर केला जातो. हा डाय रंगात मिसळल्यानंतर रक्तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होते. कॉपर सल्फेट, मर्क्‍युरी, सल्फाइट, शिसे असे घातक पदार्थ वापरलेले असू शकतात. रंगांमधल्या चमकणाऱ्या पदार्थांमध्ये सिलिका व मायका असतात. हे पदार्थ डोळ्यात गेल्यास बुब्बुळांना इजा करू शकतात. त्यामुळे बुब्बुळाला जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. 

केसांवर दुष्परिणाम 
साधारणपणे प्रत्येक रंगामध्ये रासायनिक द्रव्ये असतात. काहींमध्ये तर तांबे, शिसे, चांदी, ऍल्युमिनिअम व आयोडिनही असते. अशा रासायनिक रंगांचा वापर केल्यामुळे आपल्या केसांचे मोठे नुकसान होते. या रसायनामुळे आपले केस केवळ पांढरे होत नाहीत, तर केस दुभंगणे, केस तुटणे किंवा गळणे यांसारखे विकारही होऊ शकतात. काही रासायनिक रंग आपल्या केसांवरील आवरणाला (क्‍युटिकल) नुकसान पोचवतात. परिणामी केसांची मुळे कमकुवत बनतात. साहजिकच केस सहजपणे तुटू शकतात. काही जणांसाठी केसांच्या या समस्या दीर्घकाळापर्यंत राहतात. म्हणून शक्‍यतो केसाला तेल लावून रंग खेळायला जा. 

त्वचेला इजा 
केवळ केसच नव्हे तर, ही रसायने टाळूच्या त्वचेलाही नुकसान पोचवू शकतात. केसांबरोबरच त्वचेलाही नुकसान होऊ शकते. रंगातील असुरक्षित, अनैसर्गिक रंगद्रव्यांमुळे त्वचेवर विविध प्रकारचे चट्टे निर्माण होतात किंवा ऍलर्जी होऊन खाजही येते. हे रंग अंघोळीनंतरही निघत नाहीत. हे रंग दीर्घकाळ त्वचेवर राहिल्यामुळे त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ त्वचेवर राहतात. काही विशिष्ट रंग डायमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांनी युक्त असतात. हे आपल्या नाजूक, संवेदनशील त्वचेसाठी फार घातक असतात व ते वापरातही आणू नयेत. 

अयोग्य रंगाच्या वापरामुळे त्वचा लाल होते, पाण्याचे फोड येतात, ऍलर्जी असल्यास त्वचेला खाज सुटते, त्वचेचे पातळ पापुद्रे निघतात, जास्त काळ कपडे ओले राहिल्यास कॅनडिडा होतो. कॅनडिडा म्हणजे शरीरातील ज्या भागांना घडी पडते, त्या भागात हात, पाय अशा ठिकाणी संसर्ग होतो. त्वचेला दाह होऊ शकतो. त्वचा विकारातून कर्करोग उद्‌भवण्याची शक्‍यता बळावते. 

हे लक्षात घेऊन शरीराचा अधिकांश भाग झाकला जाईल, असे सुती कपडे घालून रंगपंचमी खेळा. रंगपंचमी खेळायला जाण्याआधी त्वचेला तेल अथवा क्रीम लावा. तसेच त्वचेचा रंग काढण्यासाठी लिंबू, रॉकेलचा वापर करू नये. त्यामुळे त्वचेला अधिक इजा होऊ शकते. रंग काढण्यासाठी त्वचेवर साबणही घासू नका. दूध, बेसन लावून रंग काढावा. 

डोळे जपा 
डोळ्यात रंग गेला, तर अंधत्वही येऊ शकते. डोळ्यात शुद्ध पाण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही घटक गेल्यास, त्यामुळे हानी होण्याचा धोका अधिक असतो. नैसर्गिक रंगही डोळ्यात गेल्यास त्यामुळे डोळा लाल होणे, डोळ्याला खाज येणे असा त्रास होतो. दर वर्षी रुग्णालयात रंगपंचमीनंतर अशा केसेस येतात. त्यात काही जणांना आपली दृष्टी गमवावी लागते. म्हणून कोणीही चेहऱ्याला रंग लावत असल्यास डोळे बंद करून घ्या. तरीही डोळ्यात रंग गेल्यास, तत्काळ हात धुवून स्वच्छ पाण्याने डोळा धुवा. डोळ्यात कुठल्याही प्रकारचे औषध टाकू नका. डोळ्याला जास्तच त्रास होतोय, असे वाटल्यास डोळ्याच्या डॉक्‍टरकडे जा. पाण्याचा फुगा डोळ्यावर बसल्यास बर्फाने शेका. डोळा दुखायला लागला, लाल झाल्यास तत्काळ डॉक्‍टरकडे जा. कॉन्टॅक्‍ट लेन्स लावून रंगपंचमी खेळायला जाऊ नका. 

रंग खेळताना आणि नंतर... 
- त्वचेसाठी योग्य असे हर्बल, नैसर्गिक रंग किंवा नैसर्गिक उत्पादनांचा वापर करा. अंडी, शेण, घाण पाणी, वॉर्निश, ऑइल पेंट, वंगण, सिल्व्हर कलर, फक्कीसारखे रंग असे त्वचेला हानिकारक पदार्थ वापरू नका. 
- रंग खेळताना मुलांनी साधा चष्मा किंवा गॉगल वापरावा. कॉन्टॅक्‍ट लेन्स लावून रंगपंचमी खेळायला जाऊ नका. 
- रंग लावताना दुसऱ्याच्या डोळ्यात, कानात रंग जाणार नाही, याची काळजी घ्यावी. 
- सिंथेटिक रंग त्वचेवर दाह निर्माण करतात, या रंगांमुळे आंधळेपणाही येतो, म्हणून योग्य काळजी घ्या. 
- ऍलर्जी असल्यास त्वरित योग्य ते उपचार घ्यावेत. 
- रंग डोळ्यांत जाऊ नयेत म्हणून डोळे मिटून घ्यावेत. 
- रंग खेळताना तुमच्या शरीराचा अधिकांश भाग झाकला जाईल, असे सुती कपडे घालावेत. 
- रंग खेळायला जाण्याआधी तुमच्या केसाला व त्वचेला खोबरेल तेल लावावे. 
- रंग खेळायला जाण्याआधी हात, पाय, मान आणि चेहऱ्यावर सनस्क्रीन लोशन लावणे योग्य ठरेल. 
- डोक्‍यावर पाणी घेण्याआधी उडालेला रंग झटकून टाका. 
- रंग काढण्यासाठी त्वचेवर साबण जबरदस्तीने घासू नका. रॉकेलचा वापर करू नका. त्याऐवजी दुधात सोयाबीनचे पीठ किंवा बेसन पीठ घालून ते हात, पाय आणि चेहऱ्याला लावावे. 
- केस कोमट पाण्याने व सौम्य अशा शॉम्पूने धुवावेत. त्यानंतर केसांना कंडिशनर लावा. जेणेकरून कंडिशनर तुमच्या केसांना मऊ बनवेल व रासायनिक रंगामुळे केसांना येणाऱ्या कडकपणापासून केसांचे संरक्षणही होईल. 
- धुतलेल्या केसांना टॉवेलने हलक्‍या हाताने पुसून कोरडे करा, केस कोरडे करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर टाळावाच. 
- रंग काढल्यानंतर लहान मुलांच्या डोळ्यांवर दुधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावेत. 
- प्रवासादरम्यान गाडीच्या काचा शक्‍यतो बंद ठेवा- ओल्या जमिनीवर धावणे किंवा रंग खेळणे टाळा. 
- डोळ्यांना इजा झाली तर लगेच नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 
- डोळ्यांत जळजळ, लालसरपणा वाढला तर सर्वांत प्रथम डोळे पाण्याने धुवून घ्या. 
- पाण्याचा फुगा डोळ्यावर बसल्यास बर्फाने शेका. 

नैसर्गिक रंग कसे तयार कराल? 
होळी खेळण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करणे सर्वात उत्तम. त्यामुळे अन्य गोष्टींवर व तुमच्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. गुलाल व अन्य नैसर्गिक पाणीयुक्त रंग तुलनेने आपल्या शरीरासाठी सुरक्षित मानले जातात. रासायनिक रंग, खासकरून पक्के रंग वापरणे टाळायलाच हवे. चंदेरी व चमकणारा हिरवा रंग किंवा गडद सोनेरी रंग, हे रसायनाने बनलेले असतात, म्हणून ते वापरू नका. त्याऐवजी भाज्यांपासून घरी तयार केलेले रंग वापरणे सर्वात सुरक्षित आहे. 
- लालसर चंदन पावडर ही एक उत्तम पर्याय असू शकते. 
- बिटाचे पाणी हाही एक चांगला ओला रंग आहे. 
- पालकाच्या पानाच्या कोरड्या पावडरीपासून सुंदर हिरवा रंग तयार होतो. 
- पिवळी हळदीची पावडरदेखील एक नैसर्गिक सुंदर पिवळा रंग तयार करते. 
- वाळलेली झेंडूची फुले व त्यांची पेस्ट किंवा लाल जास्वंद हीसुद्धा अनैसर्गिक रंगासाठी उत्तम पर्याय आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: holi colors & health