स्वास्थ्य व स्वत्वदाता श्री गणेश

Lord Ganesh For Health
Lord Ganesh For Health


श्री गणपती ही देवता कलियुगाची आहे असे म्हटले जाते. सध्या मेंदूचे विकार वाढत आहेत, तसेच इंद्रियव्यापारासंबंधित विकार वाढत आहेत, मनाशी संबंधी असलेले विकार वाढत आहेत व प्रसन्नत्व हरवलेले दिसते आहे. म्हणून सध्या श्री गणेश उपासना उपयोगी ठरावी. 

`श्री गुरुदत्ता, जय भगवंता, ते मन निष्ठुर न करी आता', हेच आज श्री गजाननांनाही सांगण्याची वेळ आलेली आहे. जय देवा गजानना, आता व्हा प्रसन्न. जोपर्यंत नुसती रोगराई वाढलेली होती तोपर्यंत जरा धीर होता. आता निसर्गही कोपून ठिकठिकाणी दुष्काळ, महापूर, आगीचे तांडव असे निसर्गाचे रोग पसरत असल्यामुळे आता आपण कृपा करावी असे साकडे घालण्याची वेळ आलेली आहे. या वर्षी श्री गणेशोत्सवाचे निमित्त घेऊन प्रार्थना करणे आवश्‍यक आहे. पिंडात म्हणजे शरीरात असलेल्या श्री गणेशांशी म्हणजेच पर्यायाने मेंदूशी संपर्क करून मेंदूचे, शरीराचे व पर्यायाने पर्यावरणाचे आरोग्य सांभाळण्याची प्रार्थना करण्याची ही वेळ आहे. 

 

गणेशोत्सवासारखे पारंपरिक उत्सव, आध्यात्मिक प्रार्थना, तंत्र, मंत्र करण्याएवढी सध्या श्रद्धा किंवा तयारी आहे का? हजारो वर्षांपासून असलेल्या वाङ्मयावरून, पौराणिक व इतर वाङ्मयावरून त्या काळी झालेल्या युद्धामध्ये अत्यंत प्रगत तांत्रिक ज्ञानाचा, शस्त्रात्रांचा वापर केलेला दिसतो, तसेच त्या काळी आध्यात्मिक शक्‍तींचाही प्रभाव दिसत होता. म्हणजे त्या काळीही मनुष्यमात्राच्या मेंदूची उत्क्रांती किंवा प्रगती झालेली होती. आजच्या आधुनिक मानवाने गाठलेली तांत्रिक प्रगती अचंबित करणारी आहे, मग ती औषधोपचार योजनेत असेल, तपासण्या करणाऱ्या यंत्रांबाबत असेल, दैनंदिन व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या संगणक, टेलिफोन वगैरे यंत्रसामग्रीबाबत असेल किंवा अवकाशतंत्रज्ञानाबाबत असेल. या सर्वांमध्ये कमालीची प्रगती झालेली असली तरी ही सर्व प्रगती बाह्य विश्वात म्हणजेच जड विश्वात झालेली दिसते. याचबरोबरीने आज आर्टिफिशियल इंटलिजन्समार्फत (ए. आय.) म्हणजे मनुष्याने तयार केलेल्या संगणकामार्फत निर्णय घेण्याचे काम वा कृती होताना दिसते आहे. 
म्हणजे आज एकूण मेंदूची प्रगती झालेली आहे, तर मग मनुष्याची आध्यात्मिक क्षेत्रात किंवा स्वप्रेरित नैसर्गिक बुद्धिमत्तेत प्रगती होणार नाही असे कसे? नैसर्गिक इंटलिजन्स म्हणजे मनुष्याची नैसर्गिक प्रगल्भता किंवा त्याची संकल्पना राबविण्याची पद्धत किंवा आत्मशक्‍ती प्रगत का झाली नाही? 

 

याचे कारण असे दिसते आहे की हेतुपुरस्सर असो, वा अनवधानाने असो, मनुष्याचे आत्मशक्‍ती प्रगत करणे या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले. आध्यात्मिक क्षेत्र, संस्कार व संस्कृती या सर्व गोष्टी जुनाट आहेत, त्यांचा व्यवहारात उपयोग नाही अशी एक कल्पना रूढ झाली. आता मनुष्य चंद्रावर पोहोचला आहे तेव्हा ज्योतिषशास्त्रातील चंद्राचा विचार करण्याची आवश्‍यकता नाही किंवा आपल्याला जे दिसत नाही ते अस्तित्वात नाही अशी विचारधारा बळावू लागली. म्हणजे एकूणच श्रद्धा हा विषय दुर्लक्षित झाला. श्रद्धा जोपासण्याची व स्वप्रेरित नैसर्गिक (एन. आय.) बुद्धिमत्ता पुन्हा विकसित करण्याची वेळ आज आलेली आहे. 
 

बाह्य विश्वात जी शक्‍ती ब्रह्मणस्पती, गणपती या देवतेच्या नावाने रूढ झालेली आहे त्याचे भौतिक स्तरावरचे रूप आहे पार्थिव गणेश. भाद्रपदात पार्थिव गणेशाचा उत्सव केला जातो, उपासना केली जाते. पिंड पातळीवर ब्रह्मांडाचे चालणारे अंशात्मक कार्य प्रत्येक व्यक्‍तीतून घडत असते. पिंड पातळीवर कार्य चालण्यासाठी मेंदूची योजना केलेली असते. या मेंदूचा विकास करण्याची आवश्‍यकता आहे. म्हणून एका बाजूने मेंदूचे आरोग्य कसे राखावे, मेंदू ताण-तणावरहित कसा ठेवावा, सुखे निद्रा कशी घ्यावी, यासाठी अभ्यास करणे आवश्‍यक आहे, तर दुसऱ्या बाजूने मेंदूचा विकास होण्यासाठी त्याला पुरविले जाणारे शक्‍तितरंग, मंत्र-ध्वनी-संगीतामार्फत कसे पोहोचवावेत, त्याचे भौतिक अस्तित्व नीट राहण्यासाठी कुठल्या प्रकारचे अन्न-रसायने सेवन करावीत याकडे लक्ष देणे भाग आहे. 
 

संस्कार, संस्कृती, सणवार, प्रार्थना, योगसाधना, ध्यानधारणा यांचाही वापर करून मेंदूच्या मार्फत नैसर्गिक इंटलिजन्स वाढविण्याची आवश्‍यकता आहे. कारण आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या मदतीने सर्व भौतिक सुखांमध्ये वाढ केली, भौतिकात चमत्कार घडवून आणले तरी मनुष्याला आंतरिक शांती, समाधान, यश किंवा मैत्री-प्रेम यांचे अनुभव नैसर्गिक इंटलिजन्सशिवाय मिळणार नाहीत. म्हणजेच वैयक्‍तिक पातळीवर तसेच बाह्य वातावरणाद्वारे संतुलन सुख मिळणार नाही. 
 

म्हणून श्री गजाननाच्या या उत्सवाचे व उपासनेचे महत्त्व. कलियुगात श्री गजाननांची उपासना करावी असे जे म्हटले आहे त्याचा हाच संदर्भ असावा. म्हणून "जय देवा गजानना, आता व्हा प्रसन्न' असे म्हणून आपल्याला विशेष तयारी व अभ्यास करावाच लागेल. 
 

प्रसन्नात्मेन्द्रियमनः ही आयुर्वेदाची आरोग्यसंकल्पना. इंद्रिये म्हटली की साहजिकच शरीर आणि शरीराचे दोष, मल, अग्नी हे सर्व आलेच. मन हे इंद्रियांकडून आत्म्याला प्रसन्न करण्यासाठी किंवा आत्म्याच्या आनंदासाठी काम करून घेण्यासाठी एक मॅनेजर, एक संकल्पना किंवा प्रोग्रॅम. विश्वाचा मालक म्हणजेच परमात्मा यानेच केवळ खूश व्हावे हा उद्देश नसून शरीर, मन व आत्मा या तिघांनाही आनंद व्हावा. आनंदामध्ये फायदा-तोटा नसतो, आनंदामध्ये कमी-जास्त काही नसते. आनंदामध्ये असते समत्व आणि श्रेयस. या सर्व संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी सर्व इंद्रियांचा गोषवारा असलेला मेंदू तसेच मेंदूत सर्वांना एकमेकांशी संपर्कात आणून काम करून घेणारे मन व त्यापलीकडे असणारी परमात्मजाणीव असल्यामुळे मनुष्याच्या मेंदूचे आरोग्य म्हणजेच व्यक्‍तीचे आरोग्य असे म्हणायला हरकत नाही. 
 

श्री गणपती ही देवता कलियुगाची आहे असे म्हटले जाते. सध्या मेंदूचे विकार वाढत आहेत, तसेच इंद्रियव्यापारासंबंधित विकार वाढत आहेत, मनाशी संबंधी असलेले विकार वाढत आहेत व प्रसन्नत्व हरवलेले दिसते आहे. म्हणून सध्या श्री गणेश उपासना उपयोगी ठरावी. 
 

भाद्रपदात प्रत्यक्ष श्री गणेशाचे दर्शन देणाऱ्या पार्थिव गणपतीला समोर ठेवून दहा दिवस उत्सव केला जातो. त्या निमित्ताने श्री गणेशाला आवडणारी कमळे, फुले, दूर्वा, वेगवेगळ्या वनस्पती, मोदक, संगीत, प्रवचने अशा विविध माध्यमांद्वारा मेंदूचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो. वेदवाङ्मयाने तसेच आपल्या पूर्वजांनी भारतीय संस्कारांमध्ये सिद्ध केलेले मंत्र, स्तोत्र यांच्या नादस्पंदनांनी हे काम पूर्णत्वाला नेता येते हे जाणून घेतले. या स्तोत्र-मंत्रांची योजना अमलात आणली तर सध्या मनुष्यमात्रात पसरणारा विषार, संशय, दुःख किंवा अराजकता, भ्रष्टाचार, आततायीपणा तसेच मेंदूला येणारे झटके, मेंदूला होणारे विकार या सगळ्यांवर उत्तम इलाज होऊ शकतो. म्हणून या उत्सवाचे महत्त्व. 
 

आदिशक्‍ती पार्वतीने विशिष्ट उटण्यापासून, तेही अत्यंत शुद्ध व सुगंधित असे, ज्याला आपण स्फटिक चूर्ण म्हणू, मूर्ती तयार केली व ती स्वतः आदिशक्‍ती असल्याने त्या मूर्तीला शक्‍तीचा स्पर्श देऊन श्री गणपती सशरीर झाले. संपूर्ण रचनेतील उणीव दूर करण्यासाठी वेगळ्या संस्कारांची आणि संकल्पनेची आवश्‍यकता भासली. म्हणून मग त्या वेळी मोठे मस्तक असलेले गजानन अस्तित्वात आले. 
 

वाणीवरती सर्व जगाचा व्यवहार अवलंबून असतो. कारण आपण एकटे नाही आहोत, तर संपूर्ण जग आपल्याबरोबर आहे हे केवळ संभाषणातूनच किंवा एकमेकांशी संपर्कातूनच माणसांना कळत असते. या संभाषणाचा, संपर्काचा आनंद अवर्णनीय असतो. यासाठी सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे माध्यम आहे आवाज, शब्द आणि भाषा. लेखन हेपण आवाजाचेच चित्रीकरण असते, म्हणूनच श्री गणपती हा जसा वाचस्पती आहे तसाच तो महाभारत लिहिणारा उत्तम लेखनिकही आहे. 
 

मेंदूमध्ये बोलण्यासाठी एक केंद्र असते. मेंदूत साठवलेली माहिती व अनुभव गोळा करून संभाषण करणे, पाहिलेल्या वस्तूंचे शब्दात रूपांतर करणे, आजूबाजूची मंडळी काय बोलतात याचा विचार करून हा नाद शब्दरूपाने पुन्हा स्मृतीत साठवणे हे सर्व काम या केंद्रामार्फत चालते. या केंद्राची संकल्पना, या केंद्राची शक्‍ती, या केंद्राचा अधिपती म्हणजेच वाचस्पती-गणपती. मेंदूतील इतर केंद्रे, स्मृती केंद्रे तसेच हृदयाचे धडधडणे, श्वासोच्छ्वास, बोलणे, चालणे वगैरे सर्व हालचालींचे नियंत्रण परमेश्वराच्या किंवा मनुष्याच्या विचारांवर अवलंबून असते. विचार हेसुद्धा शब्दरूपच असतात. विचार करताना तसेच बोलताना एकचित्त होणे व एकाग्र होणे खूप गरजेचे असते. सर्व विचारांना योग्य जागी घेऊन जाण्याचे काम मन करत असते. पण मन हे वाहन आहे, ते विचारांना इकडे तिकडे फिरवते. निर्णय घेण्यासाठी विवेकाची म्हणजे एका ठिकाणी स्थिर होण्याची आवश्‍यकता असते. एकाग्रता, निश्चलता आणि मुख्य म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे विवेकबुद्धी. 
 

श्री गणपती या देवतेसाठी व त्यांच्या संपर्कासाठी, त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी जी योजना केलेली आहे, जे मंत्र लिहिलेले आहेत, त्यातील एक आहे अथर्वशीर्ष. 
नुसती आरास, सजावट व करमणुकीचे कार्यक्रम यांच्यावर भर न देता, सद्य परिस्थितीत उपासनेवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. असाध्य व मेंदूच्या विकारांवर श्री गणेश हेच मोठे औषध आहे. रोज दिवा लावून श्रीगणेश स्तोत्र, श्री अथर्वशीर्ष किंवा "ॐ गॅं गणपतये नमः' वगैरे शास्त्रशुद्ध पद्धतीने गाणे, सामाजिक व सामुदायिक एकात्मतेसाठी प्रयत्न करणे तसेच गरजवंतांना मदत करणे हे व्रत उपयोगी पडेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com