गोड बोलण्याची वेळ

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 12 January 2018

या वर्षी संक्रांतीचे फल काहीही असले तरी एकूणच मनुष्यमात्रावर, त्यातल्या त्यात स्त्रियांवर आणि गरीब व मध्यमवर्गीयांवर संक्रांतीची वाईट दृष्टी पडत असावी. सर्व जगभरातील अस्थिर राजकारण पाहिले, की पुढचा काळ चांगला जावा म्हणून एकमेकांवर प्रेम करून गोड बोलणे आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी छान योग, ध्यान व नीतिमत्तेचे आचरण करणे अत्यंत आवश्‍यक झालेले दिसते.

आकाशगंगेतील तीस अंशाच्या एका भागास ‘मकर’ असे नाव दिलेले आहे. त्या राशीचा अधिपती शनी आहे, तो थंड व मंद गतीचा असतो. ही राशी सूर्याला असुविधा करणारी असते. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या काळाला संक्रमण काळ असे म्हटले जाते व या काळात उत्पन्न झालेल्या शक्‍तीला ‘संक्रांती’ असे म्हटले जाते. भारतीय ज्योतिष व पंचांग या शास्त्रांमध्ये या संक्रांतीदेवीचे स्वरूप वर्णन करून दाखविलेले असते. संक्रांतीदेवीचा आकार, तिने वापरलेली वस्त्रे, ती कुठल्या दिशेकडून येत आहे, कुठल्या दिशेकडे जात आहे वगैरे सविस्तर वर्णने व त्या शक्‍तीचे फायदे-तोटेही वर्णिलेले असतात. 

या वर्षी रविवार, १४ जानेवारी २०१८ रोजी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. संक्रांत वयाने वृद्ध असून, तिने निळे वस्त्र परिधान केलेले आहे, अळित्याचा टिळा लावला आहे, ती दही भक्षण करत आहे व तिने नील रत्न धारण केलेले आहे वगैरे वर्णने आपल्याला सापडतील. एखाद्यावर काही संकट आल्यास त्याच्यावर ‘संक्रांत आली’ असे म्हटले जाते. या वर्षी संक्रांतीचे फल काहीही असले तरी एकूणच मनुष्यमात्रावर, त्यातल्या त्यात स्त्रियांवर आणि गरीब व मध्यमवर्गीयांवर संक्रांतीची वाईट दृष्टी पडत असावी. सर्व जगभरातील अस्थिर राजकारण पाहिले, की पुढचा काळ चांगला जावा म्हणून एकमेकांवर प्रेम करून गोड बोलणे आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी छान योग, ध्यान व नीतिमत्तेचे आचरण करणे अत्यंत आवश्‍यक झालेले दिसते.

सूर्य सर्व जगाला उष्णता व शक्‍ती देणारा ग्रह असल्याने त्याचा स्वभाव साहजिकच उष्ण व गतिमान आहे. संक्रांत थंडीच्या दिवसांत असल्याने त्या काळात सूर्याची उष्णता मिळत नाही. त्यामुळे या काळात अग्नीचे महत्त्व वाढलेले असते. या काळात उष्णता देणाऱ्या अग्नीबरोबरच आयुर्वेदीय संकल्पनेतील जाठराग्नीवर व इतर शारीरिक क्रिया करण्यास जबाबदार असलेल्या अग्नीवर (म्हणजेच हॉर्मोन्सवर) संक्रांतीचा परिणाम होत असावा. स्त्रियांच्या बाबतीत तर हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे संप्रेरकांचे व पर्यायाने स्त्रीआरोग्याचे असंतुलन अधिक होत असल्यामुळे संक्रांतीच्या काळात स्त्रियांसाठी अनेक व्रते सांगितलेली असतात. काळ्या वस्त्रात सूर्याच्या उष्णतेचे शोषण अधिक प्रमाणात होते म्हणून संक्रांतीला काळी वस्त्रे घालण्याची प्रथा आहे. सकाळच्या वेळी लवकर जेवण्याची प्रथा आहे. ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होण्याच्या दृष्टीने पुरेसा वेळ मिळतो. जेवणात खिचडी, गुळाची पोळी खाण्याचा प्रघात दिसतो. धुंधुर्मास म्हणून सकाळी सूर्योदयाच्या वेळी तूप घालून गरमागरम खिचडी, गूळपोळी, वांग्याचे भरीत वगैरे जेवणात घेण्याचा प्रघात असतो. नाश्‍त्यासाठी भरपूर खावे असे म्हणणाऱ्यांना सकाळच्या वेळी जेवण घेणे नक्कीच आवडेल. आयुर्वेदिक पद्धतीने सिद्ध केलेल्या तिळाच्या तेलाचा अभ्यंग करणे, तीळ वाटून अंगाला लावणे, गूळ व तिळापासून केलेले लाडू खाणे असे अनेक आचार-विचार प्रचारात दिसतात. तसेच या काळात गरम शेगडीवर परात ठेवून तिळावर साखर चढवून हलवा केलेला असतो. अशा रीतीने या दिवसात गरम शेगडीभोवती बसणे, शेकोटी पेटवून त्याभोवती बसणे वगैरे आचरणही सुचविलेले दिसते. शिवाय मानसिक ऊब वाढण्याच्या दृष्टीने आजूबाजूच्या स्त्रियांना आपल्या घरी बोलावून त्यांना काहीतरी भेट वस्तू देणे अशा आचरणातून एकूणच संबंर्धंत गोडवा आणण्याचा प्रयत्न केला जातो. 

घराबाहेर जास्तीत जास्ती राहून सूर्याची शक्‍ती अधिकाधिक मिळावी या हेतूने गच्चीवर, मैदानात वगैरे पतंग उडविण्यासारखी पद्धत रूढ झालेली दिसते. पतंग उडविणे हे एका दृष्टीने आकाशध्यानच आहे. नुसत्या मोकळ्या आकाशाकडे पाहणे तेवढे सोपे नसते. मनालाही फारसे आवडण्यासारखे नसते. त्यामुळे सुंदर रंगीत पतंग आकाशाच्या कपाळावर ठेवून त्यावर त्राटक करण्याची क्रिया म्हणजे पतंग उडविण्याचा खेळ. अर्थात, एकमेकाचे पतंग कापल्याशिवाय आरडाओरडा होत नाही व खेळाला जोशही येत नाही. 

मानवाच्या आरोग्याची प्रत्येक ऋतूशी सांगड घालून किंवा विश्वात घडणाऱ्या घटना व ग्रहमानात होणारे बदल लक्षात घेऊन सांगोपांग व वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून आयुर्वेदाने सर्वसामान्यासाठी निरनिराळे उत्सव, कुळधर्म, कुलाचार निश्‍चित करून ठेवलेले दिसतात. त्यापैकी संक्रांत हा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे. संक्रांतीच्या वर्णनावरून वर्षात पाऊस किती पडेल, धान्य किती पिकेल, मारामाऱ्या होतील का लोक शांततेने जीवन जगतील वगैरे भाकिते करण्याचाही प्रयत्न केलेला दिसतो. 

संक्रांतीच्या निमित्ताने दानधर्म करावा हा प्रघात सामाजिक बांधिलकीसाठी अत्यंत उपयोगी ठरतो. तसेच आपापसांतील संबंधांत वा मैत्रीत आलेला कडूपणा दूर करून ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणून पुन्हा गोड संबंध प्रस्थापित करून प्रेम वाढविणे हा तर या सणाचा सर्वोच्च बिंदू !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Makar Sankranti family doctor