#FamilyDoctor नोटांवर असतात उपद्रवी जीवाणू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 September 2018

‘सबसे बडा रुपय्या’ असे म्हटले जाते. पण याच चलनी नोटांवर आरोग्यास हानिकारक असलेले जीवाणू आढळले आहेत. नोटा अनेकांच्या हातातून जात असतात, त्यामुळे वेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्याकडील जीवाणू नोटांवर सोडतात आणि नोटांवरचे जीवाणू स्वीकारतातही. विशेषतः भारतात पाच, दहा, वीस, पन्नास आणि शंभरसह व्यवहारात अनेकजणांकडून सर्रास हाताळल्या जाणाऱ्या सर्वच नोटा जीवाणूबाधित असल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. 

रोज कित्येक वेळा आपण अशाप्रकारे पैशाच्या नोटा हाताळत असतो. मात्र याच नोटा तुमच्या जीवावर उठू शकतात, अशी माहिती फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडून देण्यात आली आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ डेंटल क्‍लिनिकने भारतातील भाजी मंडई, दूध डेअरी, बॅंक, पेट्रोल पंप अशा ठिकाणांवरून या नोटा गोळा केल्या होत्या. ज्यावेळी या नोटांची सूक्ष्मदर्शकाखाली पाहणी करण्यात आली, त्यावेळी समजले की, या सर्वच्या सर्व नोटा जीवाणूंनी बाधित आहेत. या बाधित नोटा सर्वसामान्यांच्या संपर्कात आल्याने विविध आजारांशी गाठ पडणे अगदी साहजिक आहे. अशा नोटांवर ई-कोलायसारखे घातक जीवाणूही असू शकतात. नोटा हाताळल्यानंतर हे जीवाणू खाण्या-पिण्यातून आपल्या शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे हात नीट धुणे हा चांगला पर्याय आहे. 

भारतीय चलनी नोटांविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका विशेष अभ्यासात सध्या चलनात असलेल्या या नोटांवर जीवाणू (बॅक्‍टेरिया) आणि विषाणू (व्हायरस) आढळून आले आहेत. यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. हा अभ्यास ’काउंसिल ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रियल रिसर्च’च्या सहकार्यातून ‘इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्‍स आणि इंटीग्रेटिव्ह बायोलॉजी’च्या शास्त्रज्ञांनी केला आहे. चलनी नोटांवर आढळलेली बुरशी आणि आदिजीवसंघाच्या संक्रमणातून व्यक्तीला जीवघेणा संसर्ग (इन्फेक्‍शन) होऊ शकतो, असा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे. या पाहणीत भारतीय नोटांवर ७८ जीवाणू आणि १८ जीन्स आढळले आहेत. सापडलेले जीन्स आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. हे जीन्स रोगप्रतिकारक क्षमता कमी करतात. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा अहवाल ‘प्लॉस वन’च्या अंकात प्रकाशित झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical Research bacteria that are on the notes