मनोविकार जाणून घेण्यासाठी... 

डॉ. विद्याधर वाटवे 
Friday, 20 January 2017

"मनकल्लोळ' या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक मनोविकार आणि त्यांचे उपचार यावर आधारित असले, तरी सध्याच्या स्पर्धेच्या, गुंतागुंतीच्या जगण्यात ते समजून घेणे समाजातल्या सर्व स्तरातल्या, विविध व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी गरजेचे आहे. 

"मनकल्लोळ' या अपार मेहनत घेऊन लिहिलेल्या पुस्तकाचे दोन्ही भाग अत्यंत वाचनीय आहेत. बारा विभागांतल्या सुमारे सत्तर मनोविकारांच्या टेस्ट केसेसपासून त्यांची कारणं, लक्षणं, उपचार याबद्दल यात अतिशय तंत्रशुद्ध आणि अचूक माहिती आहेच; पण या मनोविकारांवरचं साहित्य आणि त्यावरचे चित्रपट यांच्याविषयी रंजक माहिती असल्यामुळे हे पुस्तक वाचकाला जागीच खिळवून ठेवेल यात शंकाच नाही. पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणात प्रसिद्ध व्यक्तींना कोणते मनोविकार होते याची उदाहरणं दिल्यामुळे मनोविकार या विषयाची व्याप्ती कळायला मदत होते.

मानसशास्त्र हा विषय अभ्यासक्रमात असलेल्या विशेषतः बी.ए./ एम.ए.च्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक गरजेचं आहे. सायकिऍट्री हा विषय घेऊन डॉक्‍टर होणाऱ्या आणि झालेल्या सर्वांनाही हे पुस्तक उपयोगी आहे. खरं तर नुसत्याच सायकिऍट्री नव्हे, तर सर्व वैद्यकीय शाखांच्या कुठल्याही शाखेतील डॉक्‍टरांसाठी हे पुस्तक गरजेचं आहे. सर्व फॅमिली डॉक्‍टर्स आणि कन्सल्टंट्‌स यांनी ही पुस्तकं जरूर वाचावीत. 

याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मानसोपचार विभागात प्रत्यक्ष काम करून मनोरुग्णांना तपासण्याची आणि वरिष्ठांच्या देखरेखीखाली औषधोपचार देण्याची संधी केवळ पंधरा दिवसांपुरतीच मिळते. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी मनोविकार या विषयावर एम.डी. करायचं ठरवलं, तरच त्यांना मनोविकार या विषयावर तीन वर्षे थिअरी आणि प्रॅक्‍टिकल असं वैद्यकीय शिक्षण घेता येतं. तसेच रेसिडेन्सी प्रोग्रॅममध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची थोडीफार संधी मिळते. मात्र नंतरच्या आयुष्यात सर्व डॉक्‍टर्सचा रुग्णांशी जेव्हा संबंध येतो, तेव्हा त्यांना मनोव्यापार आणि मनोविकार यांच्याबद्दल माहिती असणं हे अत्यंत जरुरीचं असतं. रुग्णावर उपचार करताना त्याच्या मनात डॉक्‍टरांबद्दल विश्‍वास निर्माण होणं गरजेचं असतं. यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी "मनकल्लोळ'मध्ये सविस्तरपणे मांडल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि डॉक्‍टर्सना मनोविकारांच्या इतिहासापासून मनोविकारांवरच्या भविष्यापर्यंत समग्र माहिती सोप्या भाषेत देणारं "मनकल्लोळ' खूपच उपयोगी ठरेल. 
मनोविकारांपैकी नैराश्‍य (डीप्रेशन), चिंतेमुळे होणारे मनोविकार (अँक्‍झायटी), स्किझोफ्रेनिया आणि ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) हे मनोविकार सर्व डॉक्‍टर्सना सुपरिचित आहेत. मात्र नव्यानं निर्माण झालेले व्यसनाधीनतेचे - बिहेविअरल ऍडिक्‍शन्ससारखे विकार आणि व्यक्‍तिमत्त्वाचे विकार (पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स) या गोष्टी सविस्तर जाणून घेण्याची गरज "मनकल्लोळ' हे पुस्तक पूर्ण करतं. आजच्या काळात भेडसावणारे नैराश्‍य, बायपोलार डिसऑर्डर, चिंतेमुळे आणि ताणामुळे होणारे मनोविकार या विकारांच्या इतर सविस्तर माहितीबरोबरच त्यामागची सामाजिक कारणं शोधायचाही या पुस्तकातल्या त्या त्या प्रकरणांमध्ये प्रयत्न केला आहे. "दिसणं' या गोष्टीला आलेल्या अवास्तव महत्त्वामुळे ईटिंग डिसऑर्डर्सचे विविध प्रकार आजकाल सातत्यानं सामोरे येत असतात. त्याबद्दलही पुस्तकात खूपच चांगल्या पद्धतीत विश्‍लेषण वाचायला मिळतं. 

कायद्याच्या अभ्यासक्रमात आणि नंतर वकिलीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही अनेकदा मनोरुग्ण आणि मनोविकार या विषयाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्यांनाही हे पुस्तक गरजेचं आहे, असं मला वाटतं. 

स्त्री-पुरुष संबंध, त्यातल्या लैंगिक समस्या याविषयी आपल्या समाजात बरेच समज-गैरसमज आढळतात. त्याबद्दल बोलायला कोणीच धजत नाही, त्यामुळे त्या समस्या वाढीला लागतात. अनेक संसार त्यातून उद्‌ध्वस्त होत असतात. लैंगिक समस्यांबद्दल या पुस्तकात सविस्तर आणि अचूक माहिती आहे. लैंगिक विकृती, होमोसेक्‍युऍलिटी आणि जेंडर आयडेंटिटी डिसऑर्डरचं सडेतोड विवेचनही यात केलेलं आहे. लहान मुलांमधल्या विविध मानसिक समस्यांबद्दल न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑडर्समध्ये वाचायला मिळतं. या समस्यांचं ओघवत्या भाषेतलं वर्णन पालकांना खूपच उपयुक्त ठरेल. वृद्धापकाळातील मेंदूचे अल्झायमरसारखे विकार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावनिक तसेच वर्तनाच्या समस्या न्यूरोकॉग्निटिव्ह डिसऑर्डर्समध्ये सविस्तर मांडल्या आहेत. वृद्धांची सेवा करणाऱ्या संस्था आणि वृद्धांचे नातेवाईक यांना त्या विकारांची उत्तम जाण या प्रकरणातून होईल. 

एकूण "मनकल्लोळ' या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक मनोविकार आणि त्यांचे उपचार यावर आधारित असले, तरी सध्याच्या स्पर्धेच्या, गुंतागुंतीच्या जगण्यात ते समजून घेणे समाजातल्या सर्व स्तरातल्या, विविध व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी गरजेचे आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mental health