ना आवरे झोप रे! 

संतोष शेणई
Friday, 11 October 2019

वेळीच व पुरेशी झोप व्हायला हवी. अपूर्ण झोप तुमचे कामाचे, मनाचे, तनाचे वेळापत्रकच बिघडवते. झोपेवरचे नियंत्रण गमावणे हा आजार असू शकतो. 

वेळीच व पुरेशी झोप व्हायला हवी. अपूर्ण झोप तुमचे कामाचे, मनाचे, तनाचे वेळापत्रकच बिघडवते. झोपेवरचे नियंत्रण गमावणे हा आजार असू शकतो. 

प्रत्येकाला पुरेशी व वेळच्या वेळी झोप मिळायलाच हवी. सहा तासांपेक्षा कमी झोप घेऊ नये, तसेच आठ तासांपेक्षा अधिकही झोपू नये. याचाच अर्थ असा की, सहा ते आठ तासांत झोप पूर्ण व्हायला हवी. आपणहून जाग येणे, उठल्यावर तन-मन ताजेतवाने असणे, ही तुमची झोप पूर्ण झाल्याची लक्षणे आहेत. सर्वसाधारणपणे आपल्या झोपेच्या वेळा ठरलेल्या असतात. एखाद्या कारणाने जरी झोपेचे वेळापत्रक गडबडले, तरी काही दिवसांतच ते पूर्वपदावर येत असते. म्हणजे, अचानक काही काम जादा करावे लागल्याने रात्री उशिरा झोपून सकाळी नेहमीच्या वेळीच उठावे लागणे, परदेशांतून प्रवास करून आल्यानंतर झोपेचे घड्याळ बिघडणे, असे होते. पण, असे बिघडलेले झोपेचे वेळापत्रक लगेच जाग्यावर येते. मात्र, जेव्हा झोपेचे वेळापत्रक अचानक बिघडते, झोप अपूर्ण होते, तेव्हा त्याचा होणारा त्रास आपल्याला अस्वस्थ करणारा असतो, थकवा येतो. मानसिक तणाव वाढतो. काही वेळा खूप चिडचिडही होते. झोपेचे वेळापत्रक पूर्वपदावर येण्याची वाट पाहावी लागते. तोवरचा त्रास सहन करावा लागतो. जेव्हा केव्हा झोपेचे घड्याळ शरीरातील घड्याळाशी जुळते तेव्हा शरीराला मिळणारी आठ तासांची विश्रांती सर्व थकवा दूर करणारी आणि शरीरामध्ये चैतन्य निर्माण करणारी ठरते. म्हणूनच, शरीराचे आरोग्य जपायचे तर योग्य आहार आणि नियमित व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच विश्रांतीही आवश्यक आहे. त्यासाठी झोपेच्या वेळा नियमित असायला हव्यात. ज्या वेळी झोपेवरचे नियंत्रण जाते तेव्हा ‘नार्कोलेप्सी’ हा आजार झाला असण्याची खूप शक्यता असते. 
 

या आजाराची काही लक्षणे आहेत. 
काही जणांना सर्वसाधारण लोकांसारखी सहा ते आठ तासांची झोप या व्यक्तींना पुरत नाही. म्हणजे ते रात्री झोपतात. पण, जणू काही ते रात्रभर झोपलेच नव्हते, असे त्यांना वाटत राहते. मग दिवसाही वेळी-अवेळी त्यांना झोप येऊ लागते. मग काम करताना, एखाद्या बैठकीत बसलेले असताना, कार्यक्रम ऐकत असताना हे लोक पेंगत असलेले दिसतात. ही अवेळीच्या आणि सतत येणाऱ्या झोपेवर या माणसांचे नियंत्रण राहू शकत नाही. असे होत असेल तर हा एक प्रकारचा आजार आहे, हे जाणावे. नार्कोलेप्सी या आजाराचे हे एक लक्षण आहे. या रुग्णांना आपल्या झोपेवर नियंत्रण ठेवता येणे अशक्य असते. त्यामुळे या व्यक्ती कधीही, कुठेही झोपतात. तसेच दिवसांतून या व्यक्ती अनेकदा झोपी जातात. या आजारामध्ये रुग्णाला झोप अनावर होतेच. पण, त्याशिवाय ज्या वेळी झोप येत असते, त्या वेळी या व्यक्तींचे वर्तनही नेहमीपेक्षा वेगळे असते. 

 

हा केवळ शारीरिक आजार नाही, तर एक प्रकारचा मानसिक आजारही आहे. साहजिकच, नार्कोलेप्सी बरा होण्यासाठी दीर्घ काळ उपचार घ्यावे लागतात. दिवसभर वारंवार झोप येणे, मन एकाग्र करणे अशक्य होणे, अचानक गाढ झोप लागण्याचा प्रकार वारंवार होणे, अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात. याशिवाय या रुग्णांमध्ये ‘स्लीप पॅरालिसिस’ही आढळून येतो. हा आजाराचा प्रकार तर आणखीनच अवघड अवस्था निर्माण करणारा आहे. या आजाराच्या अवस्थेत झोपलेली व्यक्ती जागी झाल्यानंतर काही काळ बोलू शकत नाही किंवा शरीराची इतर कोणत्याही प्रकारची हालचाल करू शकत नाही. तसेच, असा रुग्ण झोपेमध्येही अस्वस्थ असतो आणि त्याला वारंवार चित्र-विचित्र स्वप्ने पडत असतात. 
 

शरीरातील रासायनिक घटकांतील बदलांमुळे, संप्रेरकांच्या अनावश्यक सक्रियेतेमुळे किंवा निष्क्रियतेमुळे नार्कोलेप्सीचा त्रास संभवू शकतो. शरीरामध्ये हायपोक्रिटीन हार्मोन किंवा ऑरेक्झिन हार्मोन यांची सक्रियता उणावली, तर हा आजार उद्भविण्याची मोठी शक्यता असते. ही संप्रेरके मेंदूला जागृतावस्थेमध्ये ठेवण्याचे काम करतात. शरीराची प्रतिरोध क्षमता जेव्हा हे संप्रेरक निर्माण करणाऱ्या कोशिकांना प्रभावित करते, तेव्हा हा विकार उद्भवू शकतो. संप्रेरकातील असंतुलनामुळे हा विकार सुरू झाला असल्यास तो संपूर्णपणे बरा होण्याची शक्यता नसते. मात्र, औषधोपचारांनी याची तीव्रता कमी करता येते. तसेच, या रुग्णांना दिवसाकाठी ठरावीक काळामध्ये झोपण्याचा सराव करण्यास सांगूनही या विकाराची तीव्रता नियंत्रित ठेवता येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narcolepsy article written by Santosh Shenai