esakal | मानेचा मानापमान 
sakal

बोलून बातमी शोधा

Neck problems

मानेचा मानापमान 

sakal_logo
By
डॉ. शरद हर्डीकर, डॉ. सचिन नागापूरकर

पूर्वी वयाच्या पंचेचाळीस, पन्नास वयाला येणारी ही मानदुखी आज वयाच्या पंचवीस, तीस वयोगटातील लोकांना होत आहे. आज बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये मानदुखीचे रुग्ण हे साधारणपणे वीस टक्के असतात. त्यातील दहा टक्के रुग्णांना शस्त्रक्रिया करावी लागते. 

मनुष्य हा आयुष्यात स्वतःच्या मानापमानाचा खूप विचार करतो. ठरावीक वयानंतर जर मानापमान झाला, तर त्याच्या जास्त जिव्हारी लागतो. पण, मनुष्य जसा मानापमान होऊ नये म्हणून काळजी घेतो, तशी तो स्वतःच्या मानेची काळजी घेत नाही. 
चेहरा काळा होऊ नये म्हणून काळजी घेणारे मानेकडे मात्र दुर्लक्ष करतात. अत्यंत महत्त्वाचा असा हा शरीराचा भाग मान... पण, बहुतांश वेळा दुर्लक्षित राहतो. परिणामी, मानदुखीची कहाणी सुरू होते. 

पूर्वी वयाच्या पंचेचाळीस, पन्नास वयाला येणारी ही मानदुखी आज वयाच्या पंचवीस, तीस वयोगटातील लोकांना होत आहे. आज बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये मानदुखीचे रुग्ण हे साधारणपणे वीस टक्के असतात. त्यातील दहा टक्के रुग्णांना शस्त्रक्रिया करावी लागते. 

संगणक जगात काम करत असताना किंवा आज भ्रमणध्वनीच्या वापरामुळे तरुण वयात मानदुखीचे प्रमाण वाढते आहे. 

सततचा होणारा भ्रमणध्वनीचा वापर व संगणकावरील काम, यामुळे मान जास्त प्रमाणात व जास्त कालावधीसाठी खाली वाकलेली असते. परिणामी, मानदुखी व मानेतील नसा दाबल्या गेल्यामुळे होणारा त्रास, यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. जसे आपला मानापमान झाला, तर संपूर्ण शरीराला त्रास होतो, आपली चिडचिड होते; तसाच मानेला जर त्रास झाला, तर त्याचा परिणाम शरीरातील इतर भागांवर होतो. 

मानेमध्ये जर नस दाबली गेली असेल, तर त्यामुळे त्या वेदना खांद्याला, कोपऱ्याला, हाताला, तळहाताला, बोटांना होतात. हातामधील ताकद कमी होते. काम करण्यासाठी लागणारी ताकद कमी पडते. त्यामुळे जर मानदुखीचा त्रास सुरू झाला, तर लवकरात लवकर डॉक्‍टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. 

मानदुखीची कारणे 
 - सतत संगणकावर बसून काम करणे. 
- काम करताना संगणक व आपल्या मानेला पडणारा ताण म्हणजे खूप उंचावर असणारा संगणक किंवा खाली असलेला संगणक. 
- भ्रमणध्वनीचा अतिवापर; ज्यामुळे सारखी मान वाकलेल्या स्थितीमध्ये राहणे. 
- आज शहरात काम करणारी व स्वतः वाहन चालवून कामाला जाणारी तरुण वयात असणारी युवापिढी. कामात संगणकावर काम करून मानेला तर त्रास आहेच, त्यासोबत शहरात असणारी वाहतुकीची कोंडी व राहते घर ते कामाचे ठिकाण, यामध्ये असणारे अंतर; ज्यामुळे वाहतुकीदरम्यान येणारा मानेवरचा ताण खूप प्रमाणात वाढत आहे. रस्त्यावर असलेले खड्डे, त्यामुळेसुद्धा मानेला खूप हादरे बसतात. परिणामी, मानदुखीचे प्रमाण वाढते आहे. 

निदान 
प्रामुख्याने रुग्णासोबत चर्चा करून त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवरून मानदुखीचे निदान सहज करता येऊ शकते. काही वेळा रुग्णाला असणाऱ्या त्रासानुसार, गरजेनुसार एक्‍सरे, एमआयआरची तपासणी करून मानेच्या मणक्‍याच्या हाडांची झीज झाली आहे का, ते कळू शकते. एमआयआरमध्ये हाडांच्या सोबतच मानेतील नसा दाबल्यामुळे काही त्रास होत आहे का, ते कळू शकते. काही रुग्णांना ईएमजीएनसीव्ही नावाची तपासणी करणे गरजेचे पडू शकते. ज्यामध्ये नसा दाबल्यामुळे हातातील अथवा पायातील स्नायू कमजोर आहेत का, हे समजू शकते. मानदुखीमुळे हातातील तर दुखणे वाढते; पण पायातील वेदना, पायामध्ये कमजोरी येऊ शकते. त्यामुळे योग्य ती तपासणी तज्ज्ञ डॉक्‍टरांमार्फत करून घ्यावी. 

उपाय
- मानेला त्रास होईल अशी कामे करताना उदा. संगणकावर कामे करणारी, वाकून काम करणारी मंडळी, सतत लेखन-वाचन करणारी मंडळी यांनी आपली मान जास्त काळ एकाच  पद्धतीमध्ये राहणार नाही, याची काळजी घ्यावी. 
- वाकून काम करताना साधारणपणे एका तासात वाकलेली मान किमान दहावेळा तरी वर करावी. भ्रमणध्वनीचा वापर गरजेनुसार करावा. किमान दिवसभरात दहा मिनिटे सकाळी व दहा मिनिटे संध्याकाळी मान मागे, वर, खाली, उजवीकडे, डावीकडे करण्याचा व्यायाम करावा. 
- संगणकावर काम करणारी मंडळी यांनी आपला संगणक ठरावीक पद्धतीने, ठरावीक उंचीवर आहे ना, याची खात्री करून घ्यावी. म्हणजे, काम करताना मान जास्त वर अथवा खाली वाकलेली राहत नाही ना, याची खात्री करून घ्यावी. 
- आणि जर मानदुखीचा त्रास सहन होत नसेल, तर त्याची सुरुवात असेल तर लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. 
- रोजच्या जीवनात लागणारी उशी पण महत्त्वाची आहे. चुकीच्या उशीमुळे पण बऱ्याच जणांना मानदुखीचा त्रास होतो. 
- वारंवरा प्रवास करणाऱ्या मंडळींनी तर प्रवासात मानेची काळजी घेणे आवश्‍यक आहे. चला तर मग, आपल्या मानापमानासोबतच मानेचा योग्य तो मान आपण ठेवूयात.