दुखणे एकीकडे, लक्षणे दुसरीकडे 

Pain aside, the symptoms on the other article
Pain aside, the symptoms on the other article

मज्जासंस्थेच्या आजारात प्रत्यक्ष आजार एकीकडे आणि लक्षणे दुसरीकडेच दिसतात. त्यामुळेच मज्जासंस्थेच्या आजारांची लक्षणे वेळेत ओळखली जात नाहीत व निदान व्हायला वेळ लागतो. 

मज्जासंस्थेच्या आजारांमध्ये एक जरा नेहमीपेक्षा वेगळी गोष्ट अशी असते, की रुग्णाची लक्षणे, प्रत्यक्ष आजाराच्या जागेपासून शरीरात लांबच्या ठिकाणी असतात. 

गंमत म्हणजे प्रत्यक्ष मेंदूला व मज्जारज्जूला दुखण्याची संवेदना नसते. म्हणजेच शस्त्रक्रिया करताना या अवयवांवर छेद घेतल्यास वेदना होत नाहीत. परंतू त्याचे परिणाम मात्र दूरवर असलेल्या अवयवात बघायला मिळतात. 
ज्या कंबरेच्या मणक्‍यात मज्जारज्जूवर दाब आल्यास पायातील शक्ती कमी होते. मेंदूच्या उजव्या भागातील विशष्ट भागात इजा झाल्यास डाव्या हातातील शक्ती कमी होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. या गोष्टी इतक्‍या वेळा विशद करण्याचे कारण असे, की या कारणांमुळेच मज्जासंस्थेच्या आजारांची लक्षणे वेळेत ओळखली जात नाहीत व निदान व्हायला वेळ लागतो. 

या संदर्भातील एक लक्षणीय घटना मला आठवते आहे आणि ती खरेच अभ्यासण्याजोगी आहे असे मला वाटते. मज्जारज्जू व मणक्‍याच्या आजारातील लक्षणांची ओळख सर्वसामान्य जनतेला होण्याच्या दृष्टीने सुद्धा ही गोष्ट महत्त्वाची ठरावी. 

ही घटना साधारण तीन वर्षापूर्वी घडलेली आहे. यातील रुग्णाचे नाव बदललेले आहे व इतर संबंधित व्यक्तींची नावे देण्याचे टाळले आहे. 
मणक्‍याच्या ज्या आजारात वेळेत शस्त्रक्रिया केली तरच धोके टळू शकतात, त्या आजारात शस्त्रक्रिया टाळण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबणे धोक्‍याचे असते. मणक्‍याच्या ज्या आजारांवर योग्य व्यायामांनी उपचार होऊ शकतो व शस्रक्रियेची गरज नसते, अशा आजारातसुद्धा योग्य व्यायाम शास्त्रीय मार्गाने करणेच उपयुक्त असते. 

थोडक्‍यात विशिष्ठ आजारांचे योग्य निदान व योग्य उपाययोजना होणे महत्त्वाचे ठरते. 

‘‘डॉक्‍टर, तुमचे ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती’’, स्वप्ना माझ्यासमोर क्‍लिनिकमध्ये बसली होती. स्वप्ना व अशोक हे दोघेही सुशिक्षित. पुण्याच्या मध्यवर्ती भागात, शास्त्रीय शिक्षण झालेल्या समाजात राहणारे. साधारण सहा-सात महिन्यांपूर्वी अशोक माझ्याकडे आला होता. त्यावेळी त्याच्या दोन्ही हाताच्या बोटामध्ये कमकुवतपणा आला होता. आणि मुंग्या येत होत्या. मानेचा भाग कधीकधी दुखायचा. पण फार विशेष अशी मानदुखी नव्हती. चालताना अगदी क्वचित तोल गेल्यासारखे वाटायचे. पण बघणाऱ्याला त्याच्यात फार दोष आहे हे जाणवायचे नाही. ही सगळी लक्षणे हळूहळू वाढत गेलेली होती. आणि काहीतरी गडबड आहे हे त्याच्या लक्षात आले होते. 

अशोकला मी जेव्हा तपासले तेव्हा त्याच्या मानेतील स्पायनल कॉर्ड दाबली गेल्याची स्पष्ट लक्षणे दिसत होती. अशोकच्या दोन्ही हाताच्या बोटातील शक्ती कमी झाली होती. त्याला दोन बोटांच्या चिमटीत कागद धरता येत नव्हता. एका हाताने शर्टाचे बटन काढायला सांगितले तर बोटांमध्ये सुसूत्रता नव्हती. याला न्युरोसर्जरीच्या भाषेत ‘स्मॉल मसल वीकनेस’ म्हणतात व याचे कारण बहुतांशी वेळेला मानेच्या मज्जारज्जूत असते. अशोकला डोळे बंद करुन ताठ उभे राहायला सांगितले, तर त्याचा तोल जात होता. त्याला ‘ऱ्हॉंबर्ग साईन’ म्हणतात. मानेच्या मज्जारज्जूवर दाब असेल, तर पायाकडून मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना गडबडतात. त्यामुळे पाय कुठे आहेत व जमीन कुठे आहे याची प्रत्येक क्षणाला मेंदूला माहिती मिळत नाही. डोळ्यांनी जमिनीकडे बघितले तरच ही माहिती मेंदूला मिळते. पण डोळे बंद केले किंवा अंधारात चालायची वेळ आली, तर तोल जायला लागतो. 

अशोकच्या हातापायाच्या ‘रिफ्लेक्‍’ची तपासणी केल्यावर मला खात्री पटली की याच्या मानेच्या मज्जारज्जूवर दाब आलेला दिसतो आहे. आता काळजीपूर्वक तपासणी नंतर जर आम्हाला अशी शंका आली तर पुढची पायरी म्हणजे त्या भागाचा फोटो काढून आत नेमके काय झालेले आहे हे बघणे. हा फोटो एक्‍सरे असून चालत नाही. कारण त्यात फक्त हाडे दिसतात. मणक्‍याच्या आतील मज्जारज्जू, जसा वगैरे गोष्टी दिसत नाहीत. त्यामुळे अशोकच्या मणक्‍याचा एमआरआय करण्याचे ठरले. 

‘‘स्वप्ना, एमआरआय करण्याआधी खात्री करुन घे की ते एमआरआय मशिन चांगले आहे.’’ माझ्या प्रत्येक रुग्णाला मी हे वाक्‍य ऐकवतो. याचे कारण म्हणजे एमआरआय मशिनची कुवत चांगली असणे गरजेचे असते. 
‘‘डॉक्‍टर, चांगले एमआरआय म्हणजे? सर्व एमआरआयची मशिन सारखी नसतात?’’ हा प्रश्‍नही मला अपेक्षितच. आपल्या देशात रुग्णांना वैद्यकीय चाचण्या व उपचार याबद्दल इतकी कमी माहिती असते की अगदी सुशिक्षित लोकांनाही सावध करावे लागते. 
‘‘स्वप्ना, एमआरआयची मशिन वेगवेगळ्या दर्जाची (क्वालिटीची) असतात. या मशीनची कुवत ‘टेस्ला’ या युनिटमध्ये मोजतात. 0.25 पासून सुरु होऊन 0.5, 1.00, 1.5 वगैरे टेस्लाची मशिन असतात. 0.25 टेस्लाच्या एमआरआयमध्ये शरीराच्या आतील अवयव व रोगांचे जे चित्रण दिसते त्यापेक्षा कित्येक पटीने सुस्पष्ट चित्रण 1.5 टेस्लाच्या मशिनवर केलेल्या एमआरआयमध्ये दिसते. आतील अवयवांचे बारकावेसुद्धा 1.5 टेस्ला मशिनच्या एमआरआयवर अत्यंत परिणामकारकरित्या दिसतात. गंमत म्हणजे सर्व एमआरआय मशिनवर फोटो काढण्यास तेवढाच खर्च घेतात. अर्थात मेंदू व मणक्‍याच्या बाबतीत खर्चापेक्षा योग्य निदान होणे महत्त्वाचे असते, ही गोष्ट वेगळी. 

एमआरआय व टेस्ला या संदर्भात शक्‍य तितकी माहिती मी एका दमातच देऊन टाकली. 

पण माझे अशोकला तपासणे, निष्कर्ष काढणे व एमआरआयचा सल्ला देणे या गोष्टी चालू असताना अशोकच्या चेहऱ्यावर माझे सांगणे फार पटल्यासारखे भाव नव्हते. 
‘‘डॉक्‍टर, माझ्या हाताला फक्त मुंग्या येत आहेत. त्यासाठी एवढे सगळे करणे गरजेचे आहे का?’’ 
अशोक बऱ्याच वेळाने हळूच हे वाक्‍य बोलला. रुग्णांच्या मानसिकतेची एक गंमत असते. ती म्हणजे त्यांना स्वतःच्या आजाराबद्दल जे वाटते तेच डॉक्‍टरांच्या तोंडून बाहेर पडावे असे वाटत असते. त्यांची ही इच्छा पूर्ण करणारी समजूतदार व्यक्ती भेटेपर्यंत त्यांची ‘डॉक्‍टर - एक खोज’ चालू रहाते. 
‘शोधा म्हणजे सापडेल’ या न्यायाप्रमाणे लवकरच असा एखादा समजूतदार तर त्यांना भेटतोच. शिवाय आपल्या देशात फुकट मिळणारी एकच गोष्ट ती म्हणजे सल्ला. सल्ला तर कोणीही देऊ शकतो. त्याला न्यूरोसर्जन असण्याची गरज नाही. एवढेच नव्हे तर मणक्‍याच्या शस्त्रक्रियेचा यत्किंचितही अनुभव नसलेला कोणताही डॉक्‍टर किंवा नॉन डॉक्‍टरही पुरतोच की. 
दैव दुर्विलासाने या दांपत्याला लवकरच असा डॉक्‍टर भेटला. ‘‘अहो, मणक्‍याच्या आजारात लगेच एवढी घाई कशाला? त्यापेक्षा काही दिवस अमुक अमुक व्यक्तीला भेटा. ती व्यक्ती तर कुणालाच शस्त्रक्रियेचा सल्ला देत नाही. फक्त व्यायाम कुठला करायचा हे सांगतील ते. त्या कागदावर लिहिल्याप्रमाणे घरी रोज व्यायाम करायचा.’’ 

या घटनेनंतर सहा महिन्यानंतर स्वप्ना व अशोक परत माझ्याकडे आले. अशोकने सहा महिन्यापूर्वी मानेचे व्यायाम सुरु केले होते. मान परत उलटी करणे व गोल फिरवणे इत्यादी व्यायाम तो नेटाने करत होता. तीन महिन्यांपासून हळूहळू करत त्याच्या हाताच्या बोटातील शक्ती आणखी कमी होत गेली होती आणि पंधरा दिवसांपासून तो अडखळत चालत होता. त्यांच्या नशिबाने मी एमआरआय करण्यासाठी दिलेली चिठ्ठी त्यांच्याकडे होती. स्वप्नाने आग्रह धरुनच अशोकला एमआरआय करण्यासाठी नेले होते. 
आणि आज स्वप्ना तो एमआरआय घेऊन माझ्याकडे आली होती. अशोकच्या मानेच्या मज्जारज्जूवर खूपच दाब असल्याचे त्यात स्पष्टपणे दिसत होते. मज्जारज्जूच्या आतल्या भागात त्या दाबामुळे इजा झाल्याचे दिसत होते. (याला ‘इंट्रा मेड्युलरी हायपरइंटेन्सिटी’ म्हणतात.) 

‘‘हे बघ स्वप्ना, तू फार वाईट वाटून घेऊ नकोस. कारण त्याचा आता काही उपयोग नाही. अशोकला सहा महिन्यांपूर्वीच शस्त्रक्रियेची गरज होती. मणक्‍याच्या आजारात व्यायामाचे महत्त्व काय हे न कळण्याइतका काही मी दुधखुळा नाही. किंबहुना आमच्या मणक्‍याच्या क्‍लिनिकला येणाऱ्या रुग्णांपैकी जवळजवळ ऐंशी टक्के लोकांना शस्त्रक्रियेची गरज नसते. त्यांना त्यांच्या आजाराप्रमाणे योग्य व्यायामाचे मार्गदर्शन आम्ही करतच असतो. त्यातही प्रत्येक रुग्णाला वेगळ्या व्यायामाची गरज असते. अतिशय चांगल्या आणि प्रशिक्षित फिजिओ थेरपिस्ट किंवा फिजिॲट्रीस्टने हे व्यायाम नीट कळेपर्यंत रुग्णांना शिकवण्याची गरज असते. व्यायामाने आजार बरा करणे हे सुद्धा एक शास्त्र आहे. व्यायामाचे प्रकार रुग्णाच्या गरजेप्रमाणे प्लॅन करणे हे न्यूरोसर्जनचे काम आहे. ते नीट करुन घेणे, सर्जनला रुग्णाच्या प्रगतीबद्दल वेळोवेळी माहिती देणे, त्यात स्वतःच्या सुधारणा सुचवणे हे चांगल्या फिजिओ थेरपिस्टचे काम आहे. मणक्‍याचे व्यायाम असे कागदावरच्या आकृत्या बघून घरी करायचे नसतात. असो. मी स्पष्ट बोलतो आहे त्याबद्दल माफ कर. पण रुग्णाला आवडेल असा, पण चुकीचा सल्ला देणे योग्य आहे का? अशोकला जेव्हा मी तपासले, तेव्हाच त्या तपासणीवरुन त्याच्या मानेच्या मज्जारज्जूवर दाब आलेला स्पष्ट दिसत होता. तो नेमका कशामुळे आला आहे व कुठल्या ‘लेव्हल’ला आहे. हे कळण्यासाठी या एमआरआयची गरज होती. आता नीट समजून घे. या एमआरआयमध्ये मानेच्या पाचव्या व सहाव्या मणक्‍यामध्ये मज्जारज्जू दाबला गेलेला तुला दिसतो आहे का?’’ मी तिला एमआरआयच्या फिल्मवर योग्य ठिकाणी पेन्सिल ठेवत विचारले. 

अशोकच्या एमआरआयमध्ये मज्जारज्जूचा दाब अगदी स्पष्ट दिसत होता. त्यामुळे स्वप्नाला ते समजावून देणे मला सोपे गेले. 
‘‘पाच व सहा नंबरच्या मणक्‍याच्या मध्ये जी डिस्क असते, तेथे चोचीसारखे हाड वाढलेले आहे. याला ‘ऑस्टिओफाईट’ म्हणतात. या हाडामुळे मज्जारज्जूवर पुढून दाब आलेला आहे. तसेच मागच्या बाजूला सुद्धा जादा कॅल्शियम जमा झालेले दिसते आहे.’’ 
‘‘ खरोच डॉक्‍टर, हा मज्जारज्जू एखाद्या चिमटीत पकडल्या सारखा दिसतो आहे.’’ स्वप्ना डोळे विस्फारुन एमआरआयकडे बघत होती. 

‘‘अगदी बरोबर! ‘चिमटीत पकडल्यासारखा’ हा शब्दप्रयोग अगदी चपखल आहे. न्यूरोसर्जरीत याला ‘पिन्सर कॉम्प्रेशन’ (खेकड्याच्या नांगीमध्ये पकडल्याप्रमाणे) म्हणतात. अशा प्रकारच्या दाबात मानेचे जोरात व्यायाम करणे धोक्‍याचे असते. प्रत्येक मानेच्या वाकण्याबरोबर मज्जारज्जू या हाडांच्या कचाट्यात सापडून दाबला जातो व प्रत्येक वेळेला त्याच्या आतील पेशींवर दाब येतो. काही पेशी यामुळे हळूहळू झडतात व त्या कायमच्याच. मज्जारज्जूतील पेशी परत परत तयार होत नाहीत.’’ 

स्वप्ना म्हणाली, ‘‘म्हणजे डॉक्‍टर इतके दिवस अशोक स्वतःच्याच मज्जारज्जूची हानी करुन घेत होता. रोज सकाळ-संध्याकाळ तो मानेचे व्यायाम करायचा.’’ 

‘‘स्वप्ना, घडून गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करुन उपयोग नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. शस्त्रक्रिया करुन हा दाब आपण काढायला हवा. अर्थात सहा महिन्यांपूर्वी जो उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला मिळाला असता, तेवढा कदाचित मिळणार नाही. पण पुढे होणारी हानी मात्र आपण टाळू शकू. ही शस्त्रक्रिया आपण न्यूरो-मायक्रोस्कोप मधून करतो. याला ‘ACDF’ असा इंग्रजी शॉर्टफॉर्म आहे. थोडक्‍यात म्हणजे मज्जारज्जूवरचा पुढच्या बाजूने आलेला दाब काढायचा व तो भाग छोटी ‘टायटॅनियम्‌’ धातुची प्लेट व स्क्रू लावून जोडायचा. तुला माहितीच असेल, की टायटॅनियम या धातुचा गुणधर्म म्हणजे हा अत्यंत हलका पण मजबूत असा धातू आहे. शिवाय हा शरीरात वापरला तरी पुढे मागे एमआरआय करायची वेळ आली तर निर्धोकपणे करता येतो. (स्टील वापरले तर करता येत नाही.)’’ 
 

पुढच्या दोन दिवसांनीच अशोकचे ऑपरेशन आम्ही केले. एमआरआयमध्ये दिसल्याप्रमाणेच मज्जारज्जूवर खूपच दाब होता. पण एक तासाच्या मायक्रोस्कोपिक ड्रिलिंगने हा दाब पूर्णपणे निघून गेला. 
अशोकला ऑपरेशननंतर पाचव्या दिवशी घरी जाण्याची मी परवानगी दिली. हातात व पायात असलेली लक्षणे पुढच्या तीन महिन्यात जवळजवळ सत्तर टक्के बरी झाली. मला वाईट एकाच गोष्टीचे वाटले की, सहा महिने आधी जर हा दाब मी काढू शकलो असतो तर अशोक जवळजवळ शंभर टक्के सुधारला असता. 
मानेच्या मज्जारज्जूवरील दाबात जेव्हा रुग्णाला हातापायात त्रास व्हायला लागतो, तेव्हा ती रोगाची प्राथमिक स्थिती नसते. कारण रोगाच्या प्राथमिक स्थितीत रुग्णाला त्रास होत नसतो. सुरवातीला आपला मज्जारज्जू हा दाब ‘सहन’ करुन व्यवस्थित कार्यरत राहू शकतो. जेव्हा चालताना पाय अडखळणे, हातातली शक्ती कमी व्हायला लागणे अशी लक्षणे दिसू लागतात. त्यावेळी आजाराची पुढची पायरी आलेली असते हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे होय. 


सर्व्हायकल स्पॉंडिलोरिक मायलोपथी (सीएसएम) 

‘स्पॉंडिलीसिस’च्या प्रक्रियेने मानेतील मज्जारज्जूवर दाब येऊन मज्जारज्जूच्या कार्यात आलेला अडथळा असे साधारण भाषांतर सीएसएमचे करता येईल. स्पॉंडिलिसिसच्या प्रक्रियेत मणक्‍याच्या कॅनॉलमध्ये अतिरिक्त कॅल्शियमचा संचय होऊन, ‘डिस्क’पासून हाडांच्या चोचीप्रमाणे ऑस्टिओफाईट तयार होऊन व उतीबंधाची लवचिकता कमी होऊन ‘कॅनॉल’ कसा चिंचोळा होतो हे आपण आधीच पाहिले आहे. तसेच जन्मजातच ज्यांच्या कॅनॉलची ठेवण चिंचोळी असते, त्यांना हा त्रास लवकर का सुरु होतो हे सुद्धा उघडच आहे. ‘सीएसएम’मध्ये मज्जारज्जूतील नसांच्या समूहांचे व मज्जारज्जूतील चेतापेशींचे कार्य गडबडणे व उपचार झाले नाहीत तर त्यांना कायमचीच इजा होण्याची कारणे अनेक आहेत. 
१. मज्जारज्जूवर पुढून व मागून दाब येऊन मानेच्या प्रत्येक हालचाली बरोबर ‘चिमटा’ बसल्या प्रमाणे तो वारंवार दाबला जाणे. 
२. मज्जारज्जूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीवर दाब येऊन वारंवार त्याचा पुरवठा खंडित होणे. 
३. मज्जारज्जूच्या मागच्या भागातल्या उतिबंधातीलत'इलॅस्टिन’चे प्रमाण कमी झाल्याने तो ताणलेला न राहता लुळा पडून त्याच्या घड्या कॅनॉलमध्ये डोकावून मागून दाब येणे. 
४. मज्जारज्जूतून रक्त बाहेर वाहून नेणाऱ्या नीला दाबल्या गेल्याने मज्जारज्जूच्या आत त्या फुगून दाब निर्माण होणे. 
वारंवार होणाऱ्या या आघातामुळे व कायम असलेल्या दाबामुळे मज्जारज्जूचे कार्य गडबडते. पण त्या आधी अनेक महिने मज्जारज्जू हा दाब सहन करुन कार्यरत असतो. यालाच मज्जारज्जूची ‘सहनशिलता’ म्हणतात. त्याच्या या गुणधर्मामुळेच आजाराची बळावलेली स्थिती येईपर्यंत रुग्णाला लक्षणे दिसत नाहीत. म्हणूनच एकदा लक्षणे सुरु झाली व वाढायला लागली, की जितक्‍या लवकर दाब काढला जाईल, तितकी रुग्ण पूर्णपणे सुधारण्याची शक्‍यता वाढते. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com