गरोदर माता व संसर्गजन्य आजार 

डॉ. सपना चौधरी
Friday, 20 March 2020

 कोरोनामुळे आपण सारेच खडबडून जागे झालो आहोत. पण एकूण संसर्गजन्य आजारांपासून गरोदर मातांनी स्वतःला अधिक सांभाळले पाहिजे. 
 

 कोरोनामुळे आपण सारेच खडबडून जागे झालो आहोत. पण एकूण संसर्गजन्य आजारांपासून गरोदर मातांनी स्वतःला अधिक सांभाळले पाहिजे. 
 

आजकाल, संसर्गजन्य आजाराने ग्रस्त लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्हणूनच, गर्भवती महिलांना फ्लू आणि विषाणूजन्य आजारांपासून दूर ठेवण्याची गरज आहे. यासाठी सावधगिरी बाळगण्यासाठी काही गोष्टी सांभाळा. संसर्गजन्य आजारामुळे आपल्याला दैनंदिन कामांमध्ये अडथळे येत असतील, श्वसनासंबंधी विकारांमुळे बऱ्याचदा कामावर जाणे टाळत असाल तर तसे न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि काही गोष्टींचे पालन करा. हा संसर्ग थुंकीवाटे, घरातील पाळीव प्राण्यांद्वारे, हवा तसेच अन्नाद्वारे पसरू शकतो. अन्न आणि पाण्याद्वारे विषाणुजन्य आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे खाण्या-पिण्याविषयी विशेष काळजी घ्यावी. 
- हातांची स्वच्छता महत्त्वाची ः संसर्गापासून वाचण्यासाठी सर्वात आधी हातांच्या स्वच्छतेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. जेवणापूर्वी तसेच स्वच्छतागृहाचा वापर केल्यावर स्वच्छ हात धुणे आवश्यक. वर्दळीच्या ठिकाणी गेल्यास विशेष काळजी घ्यावी. हाताला झालेली जखम उघडी ठेवू नका, जेणेकरून या जखमेच्या माध्यमातून जंतू शिरकाव करतील आणि शरीरात आजार पसरू शकेल. 
- मास्कचा वापर करा ः जर आपल्याला खोकला आणि सर्दीची लक्षणे दिसत असतील तर मास्क किंवा रुमालाने तोंड झाकून ठेवा. जर तुम्हाला सर्दी-खोकला झाला असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. इतरांनी वापरलेले हातरुमाल, टॉवेल, कपडे वापरणे टाळा. 
- योग्यरित्या शिजवलेल्या अन्नाचे सेवन करा ः योग्यरित्या शिजलेल्या अन्नाचे सेवन करणे योग्य आहे. त्यामुळे त्या अन्नात कसल्याही प्रकारचे जंतू राहत नाही. तसेच खाण्यापूर्वी भाज्या आणि फळे चांगले धुवा. कच्चे आणि शिजवलेले पदार्थ एकत्र मिसळून त्यांचे सेवन करू नका. या दोन्ही पदार्थांना स्वतंत्रपणे खा. योग्य तापमानातच अन्न शिजवा. रस्त्यावरचे उघडे अन्नपदार्थ सेवन करणे घातक ठरू शकते. 
- पाणी प्या ः शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ देऊ नका. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा. 
- स्वतःच्या मर्जीने औषधांचे सेवन करू नका ः तुम्हाला आरोग्याविषयी काही समस्या भेडसावत असतील तर घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःच्या मर्जीने कोणत्याही प्रकारच्या गोळ्यांचे सेवन करू नका. असे करणे तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. 
- उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळा ः या काळात अन्नशुद्धतेची काळजी घेणे देखील फार गरजेचे आहे. कारण अन्नातून होणाऱ्या अथवा इतर संसर्गाचा थेट तुमच्या बाळावर परिणाम होऊ शकतो. यासाठी बाहेरचे अथवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा. बाहेर जाताना घरातील पाण्याची बाटली सोबत ठेवा. घरात शक्य तितकी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा. 
- गरोदर मातांसाठी लसीकरण आवश्यक ः गरोदर स्त्रीने लसीकरण घेतल्यास तिला लसीकरणाद्वारे प्रतिबंध होऊ शकणाऱ्या संसर्गांपासून थेट संरक्षण मिळते आणि गर्भाचेही संरक्षण होतेच. गरोदरपणात लसीकरण झालेल्या मातांद्वारे प्रादुर्भावाशी लढा देणारी प्रथिने, यांना प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) असे म्हटले जाते, त्यांच्या बाळांपर्यंत पोहोचवली जातात. त्यामुळे बाळाला या जगात आल्यानंतरचे पहिले काही महिने विशिष्ट आजारांपासून अंशत: संरक्षण मिळते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pregnant mother and infectious diseases article written by Dr Sapana Chaudharee