जळजळ उन्हाळी

प्रा. डॉ. सुरेश पाटणकर, संतोष शेणई
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

उन्हाळ्यात उष्णता वाढते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. साहजिकच लघवीचे प्रमाणही कमी होते. त्याचा परिणाम म्हणून मूत्रदाह होतो. स्त्रियांमध्ये उन्हाळीचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक असते.

परत परत होणारा मूत्रदाह उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त दिसतो. त्याला ‘उन्हाळी’ असे म्हटले जाते. गरम हवामानाच्या दिवसात, म्हणजे साधारणतः सप्टेंबर, ऑक्‍टोबर किंवा मार्च ते जून या महिन्यांमध्ये उन्हाळीचा त्रास होतो. उन्हाळ्यात उष्णता वाढते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. साहजिकच लघवीचे प्रमाणही कमी होते. त्याचा परिणाम म्हणून मूत्रदाह होतो. लघवीच्या वेळी आग होते आणि गरमपणा जाणवतो. हे लक्षण शरीरातील उष्णता वाढल्याचे आहे. स्त्रियांमध्ये उन्हाळीचे प्रमाण अधिक आढळते. साधारणपणे वीस ते चाळीस या वयोगटात २४  ते ३० टक्के स्त्रियांमध्ये याचा प्रादुर्भाव होतो. स्त्रिया मुळातच फार संकोची असल्याने ही गोष्ट मोकळेपणाने सांगणे टाळतात. असे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार करून घेणे महत्त्वाचे ठरते. अशा उन्हाळीचा त्रास होणाऱ्या रुग्णांत मूत्रविसर्जन करताना दुखणे, जळजळ होणे अशी लक्षणे दिसतात. हा त्रास काही कालावधीनंतर वरचेवर होत असतो.  
काही स्त्रियांमध्ये शरीरसंबंधांनंतर उन्हाळीच्या त्रासाला सुरवात होते. काहींना रजोनिवृत्तीच्या आसपास हा त्रास सुरू होतो. उन्हाळीच्या विकारात मूत्रमार्ग रचनेत कोणताही दोष नसतो. स्त्रियांमध्ये मूत्रमार्गाची लांबी कमी असते. त्याचबरोबर मूत्रमार्ग आणि जननमार्ग एकाच ठिकाणी उघडतात. गुदमार्गातील जीवाणू जननमार्गात प्रवेश करत असतात. तिथून हे जीवाणू मूत्रमार्गात जातात आणि मूत्रदाह निर्माण करतात. ज्या रुग्णात स्थानिक प्रतिबंधक शक्ती कमी असते, त्यांना हा त्रास होतो. काही रुग्णांमध्ये जननमार्गाचे काही आजार असतील, तर त्यामुळेही उन्हाळीचा त्रास होऊ शकतो. अशा उन्हाळी झालेल्या रुग्णांमध्ये प्रतिजैविकांचा फायदा लगेच दिसून येतो. हा त्रास वरचेवर होत असल्यास हीच औषधे कमी प्रमाणात अधिक काळ सुरू ठेवावी. स्त्रियांना या कारणाने होणाऱ्या उन्हाळीच्या त्रासाचा विचार पुढच्या लेखात केला जाणार आहे. 

या लेखात प्रामुख्याने उन्हाळ्यात शरीरात कमी प्रमाणात पाणी गेल्याने उद्भवणाऱ्या उन्हाळीचा विचार करीत आहोत. 

कामांच्या व्यापात असताना किंवा बाहेर जाताना पाणी बरोबर नेले नाही तर कित्येक तास पाणी पोटात जात नाही; मात्र त्या काळात घामावाटे शरीरातील पाणी बाहेर जाते आणि श्रमामुळे शक्तीही खर्च होते. कार्यालयात असताना पाणी पिण्याची व्यवस्था जरा दूर असेल तर कामावरून उठून पाणी पिण्याचा कंटाळा केला जातो. हा आळस त्रासदायक ठरतो. शिवाय बाहेर अस्वच्छ ठिकाणी लघवीसाठी गेल्यास त्यातून जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता स्त्रियांमध्ये अधिक असते. आहारात ठेचा, हिरवी मिरची, तळलेले पदार्थ, बाहेरचे पदार्थ, मेथी, आंबट दही वारंवार घेतल्यास शरीरातील उष्णता वाढते आणि लघवीला आग होते. बऱ्याचदा आतील कपडे घामाने दमट होतात आणि त्यामुळे तेथील नाजूक त्वचा लालसर होते व खाजही येते. अशावेळी जंतुसंसर्ग असेलच असे नाही, पण वारंवार घाम पुसणे व घट्ट कपडे न घालणे हे पथ्य जरूर पाळले पाहिजे.

 काय कराल?
तिखट, तेलकट, तूपकट व खारट पदार्थ खाणे टाळावे.
उन्हात फिरणे टाळावे.
चंदनाचे खोड उगाळून त्याचा अर्धा चमचा गंध थंड पाण्यात घालून प्यावा. त्रास असेपर्यंत दररोज असे करावे.
भरपूर पाणी प्यावे. विशेषत: वाळा घातलेले पाणी जरूर घ्यावे.
त्याचबरोबर उसाचा रस, नारळाचे पाणी, कोकम सरबत, आवळा सरबत अशी सरबते प्यावीत.
आहारात कलिंगड, द्राक्षे, आंबा अशी फळे; तसेच काकडीचा समावेश करावा.
स्त्रियांनी धने उकळून ते पाणी प्यावे. यामुळे आग कमी होते. लघवी कमी होत असेल तर गोखरू पावडर आणि धने एकत्र करून पाण्यात उकळून हे पाणी दोन-तीन वेळा घ्यावे.
पळसाची फुले उपलब्ध झाल्यास ती ग्लासभर पाण्यात भिजत घालून ७८ तासांनी ते पाणी गाळून प्यावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof. dr. suresh patankar, santosh shenai article