
माझ्या उजव्या कानात टेलिफोनच्या तारांप्रमाणे आवाज येतो. मी डॉक्टरांकडून दोन्ही कान तपासून घेतले आहेत, त्यात काहीही दोष आढळला नाही; परंतु आवाज मात्र थांबत नाही. माझे वय ७२ वर्षे आहे. कृपया उपाय सुचवावा.
.... अशोक दीक्षित
कानात आवाज येणे हा वातदोषाशी संबंधित विकार आहे. वयानुसार वातदोष वाढणे स्वाभाविक असले तरी याप्रकारे वात-असंतुलन होऊ नये यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सुचवलेले आहेत. यातीलच एक उपाय म्हणजे कानात औषधांनी संस्कारित केलेले ‘संतुलन श्रुती तेला’सारखे तेल टाकणे. याशिवाय नाकात तुपाचे थेंब टाकणे, संपूर्ण अंगाला अभ्यंग केला तर त्यामुळे वातशमनाला मदत मिळून याप्रकारचे त्रास टाळता येतात किंवा त्यात सुधारणा होऊ शकते. बरोबरीने योगराज गुग्गुळ, ‘संतुलन वातबल’ गोळ्या, तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेण्याचाही चांगला उपयोग होईल. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कर्णपूरण’ हा कानाच्या आरोग्यासाठीचा उपचार करून घेणे श्रेयस्कर.
माझे वय ४७ वर्षे आहे. बऱ्याच वर्षांपासून माझ्या छातीपासून पाठीमागे गोलाकार भाग, तसेच डावा हात दुखतो. दुखणे कधी कधी वाढते, त्या वेळी रक्तदाब वाढलेला आढळतो. दमसुद्धा लागतो. यावर मी उपचार घेतो आहे, मात्र बरे वाटत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
..... संजीव शिंदे
या प्रकारचा त्रास असला तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हृदयाशी संबंधित काही मूलभूत तपासण्या करून घेणे, रक्तदाबावर लक्ष ठेवणे हे गरजेचे होय. यातून नेमके निदान झाले, की उपचारांची नेमकी दिशा ठरविता येऊ शकेल. दर वेळी फक्त लक्षणे कमी करणारी औषधे घेणे पुरेसे ठरणार नाही, तेव्हा लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. बरोबरीने रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण अंगाला, कमीत कमी छाती-पोटाला अभ्यंग तेल जिरवून लावणे, सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन वातबल’ या गोळ्या, ‘संतुलन सुहृदप्राश’ हे रसायन घेणे, वजन वाढणार नाही याकडे लक्ष ठेवणे, रात्रीचे जेवण वेळेवर व हलके असणे हे उत्तम होय. वैद्यांच्या सल्ल्याने ‘कार्डिसॅन प्लस चूर्ण’ मधात मिसळून घेण्यानेही हृदय, रक्ताभिसरणाशी संबंधित त्रासांवर उत्तम परिणाम मिळतात असा अनुभव आहे.
माझ्या कंबरेमध्ये गॅप आहे. त्या ठिकाणी हात लावला की फार असह्य वेदना होतात. झोपताना पाठ-कंबर जमिनीला टेकू देत नाही. रात्रभर झोप येत नाही. संतुलनचे कुंडलिनी तेल लावते आहे. याशिवाय काही उपाय सुचवावा.
.... मंगला शिंदे
दिवसातून दोन-तीन वेळा ‘संतुलन कुंडलिनी तेल’ लावता येते. ज्या ठिकाणी दुखते तेथे एरंड, निर्गुडी, शेवगा, सागरगोटा यापैकी उपलब्ध असतील तेवढी पाने अगोदर वाटून, मग गरम करून त्याचा अर्ध्या तासासाठी एक दिवसाआड लेप करण्याचा फायदा होईल. ‘संतुलन वातबल’ गोळ्या, तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेण्याचा उपयोग होईल. मात्र इतका असह्य त्रास आहे, तेव्हा तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली वातशामक बस्ती, इतर प्रकृतीनुरूप औषधे यांची योजना करणे श्रेयस्कर होय.
मला वारंवार लघवीला जावे लागते व लघवी करताना दुखते. बऱ्याच दिवसांपासून त्रास होतो आहे. कृपया उपाय सुचवावा. तसेच, डोक्यात छोटे- छोटे पुरळ येतात व दाबल्यानंतर दुखतात. त्यावरही काही औषध सुचवावे.
... भोसले
एकदा लघवीची तपासणी करून बस्ती किंवा मूत्रमार्गामध्ये जंतुसंसर्ग नाही ना याची खात्री करून घेणे किंवा प्रोस्टेट ग्रंथी वाढली आहे का हे पाहणे आवश्यक होय, जेणेकरून नेमके उपचार सुचवता येतील. तत्पूर्वी दोन्ही जेवणांनंतर दोन-दोन चमचे पुनर्नवासव घेणे, सकाळ- संध्याकाळ पुनर्नवाघनवटी, तसेच गोक्षुरादि गुग्गुळ घेणे, ‘संतुलन पुरुषम् तेल’ वापरणे हे उपाय सुरू करता येतील. आठवड्यातून दोन वेळा कोमट पाण्याची कटिबस्ती घेण्याचाही उपयोग होईल. डोक्यात पुरळ येते त्यासाठी ‘अनंतसॅन गोळ्या’ घेण्याचा उपयोग होईल. तसेच, रक्तचंदन पाण्यात उगाळून पुरळ येते त्याठिकाणी लावून ठेवण्याचाही उपयोग होईल.
मी ‘फॅमिली डॉक्टर’ ही पुरवणी नियमित वाचतो. मला त्यातील माहितीचा खूप फायदा झालेला आहे. माझे वय ४० वर्षे असून, नुकतेच लग्न झालेले आहे. तपासणीमध्ये शुक्रजंतूंचे प्रमाण कमी असल्याचे लक्षात आले आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
.... भीमाशंकर
शुक्रधातूचे योग्य पोषण झाले की शुक्राणूंची संख्या, प्रत सुधारणे शक्य असते. यासाठी तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप औषध घेणे उत्तम. वयाचा विचार करता बाळासाठी प्रयत्न करण्यापूर्वी शास्त्रशुद्ध पंचकर्म करून घेणेसुद्धा आवश्यक. बरोबरीने रोज सकाळी नाश्त्यापूर्वी पंचामृत घेणे, भिजविलेले चार-पाच बदाम सोलून खाणे, ‘संतुलन चैतन्य कल्प’ घालून दूध घेणे, तूप-साखरेसह एक-एक चमचा ‘संतुलन यू.सी. चूर्ण’ घेणे, ‘मॅरोसॅन’ वा च्यवनप्राशसारखे रसायन घेणे, हे उपाय सुरू करता येतील. वीर्यवृद्धीसाठी ‘अश्वमाह’सारख्या गोळ्याही घेता येतील. आहार पोषक, प्रकृतीला अनुरूप आणि सकस अन्न-धान्याचा वापर करून बनविलेला असणे श्रेयस्कर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.