प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 11 October 2019

मला "फॅमिली डॉक्‍टर"मधील मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला आहे. मला त्रास इतकाच आहे की, लघवीचे तापमान फारच गरम असल्याचे जाणवते. बाकी जळजळ वगैरे काही त्रास नाही. कृपया यावर उपाय सुचवावा. 
... के. हरिचंद्र 

मला "फॅमिली डॉक्‍टर"मधील मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला आहे. मला त्रास इतकाच आहे की, लघवीचे तापमान फारच गरम असल्याचे जाणवते. बाकी जळजळ वगैरे काही त्रास नाही. कृपया यावर उपाय सुचवावा. 
... के. हरिचंद्र 

लघवी ही थोड्या प्रमाणात गरम असणे स्वाभाविक असते, मात्र लघवीची उष्णता जाणवत असली तर त्यावर काही उपाययोजना करणे आवश्‍यक होय. जेवणानंतर दोन-दोन चमचे उशिरासव दोन चमचे पाण्यात मिसळून घेण्याचा उपयोग होईल. रात्री ग्लासभर पाण्यात मूठभर लाह्या भिजत घालून ते पाणी सकाळी गाळून घेऊन पिणे, आठवड्यातून दोन-तीन वेळा शहाळ्याचे पाणी पिणे, चोपचिन्यादी चूर्ण किंवा "संतुलन यू. सी. चूर्ण' पाण्याबरोबर घेणे या उपायांचा गुण येईल. आहारातून तेलकट, तिखट, अंडी, मांसाहार वर्ज्य करणे; मूग, तांदूळ, ज्वारी यांचा अधिकाधिक प्रमाणात वापर करणे हे सुद्धा चांगले. 

 माझ्या मुलीचे वय १७ वर्षे असून तिच्या चेहऱ्यावर, विशेषतः कपाळावर, खूप तारुण्यपीटिका आल्या आहेत. त्यांचे डागही आहेत. तिचा एकंदर चेहरा निस्तेज दिसतो. कृपया उपाय सुचवावा. 
... गायकवाड 

 तारुण्यपीटिका व निस्तेजता हो दोन्ही त्रास दूर होण्यासाठी आतून व बाहेरून असे दोन्ही तऱ्हेचे उपचार करण्याची आवश्‍यकता आहे. रक्‍तशुद्धी तसेच रक्‍तप्रसादन यासाठी "संतुलन अनंत कल्प' घालून दूध व "सॅन रोझ' हे रसायन घेण्याचा उपयोग होईल. सकाळ-संध्याकाळ "मंजिष्ठासॅन' या गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. चेहऱ्याला तसेच एकंदर संपूर्ण अंगाला साबणाऐवजी "सॅन मसाज पावडर'सारखे रक्‍तशुद्धिकर द्रव्यांपासून व कांतिवर्धक द्रव्यांपासून तयार केलेले उटणे लावून स्नान करणे, आठवड्यातून दोन वेळा कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून वाफारा घेणे व नंतर चंदन, अनंतमूळ, ज्येष्ठमध, दालचिनी यांचा उगाळून केलेला लेप किंवा तयार "सॅन पित्त फेस पॅक' चेहऱ्यावर लावणे याचाही उपयोग होईल. रक्‍तशुद्धीसाठी आठ-दहा दिवसांतून एकदा त्रिफळा चूर्ण किंवा गंधर्वहरीतकी घेऊन पोट साफ होऊ देणेसुद्धा चांगले. रात्री झोपण्यापूर्वी "संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल' चेहऱ्यावर जिरवून लावण्याने त्वचा तेजस्वी होण्यास व डाग निघून जाण्यास मदत होईल. 

मी व आमच्या घरातील सर्व जण "फॅमिली डॉक्‍टर'चे नियमित वाचक आहोत. माझी नात साडेदहा वर्षांची आहे. तिला ताप येऊन गेल्यावर दोन-तीन दिवसांनी चक्कर येते. न्यूरॉलॉजिस्टला दाखवले, पण काही दोष आढळून आला नाही. एका डॉक्‍टरांनी सांगितले, की तिच्या मनावर कशाचेही दडपण येणार नाही याची काळजी घ्या, पण त्याचाही उपयोग झाला नाही. घरातील वातावरण एरवीसुद्धा चांगलेच असते. कृपया मार्गदर्शन करावे. 
..... शकुंतला 

ताप येऊन गेल्यावरच फक्‍त चक्कर येते आहे, तेव्हा याचा संबंध पित्तदोषाच्या असंतुलनाशी असावा असे वाटते. तज्ज्ञ वैद्यांकडून नाडीपरीक्षण करून घेतले तर याची खात्री करून घेता येईल. मुळात वारंवार ताप येऊ नये यासाठी तिला नियमित "सॅन रोझ', शतावरी कल्पासारखे रसायन देण्याचा उपयोग होईल. प्यायचे पाणी सुवर्ण सिद्ध करून घेतल्यास प्रतिकारशक्‍ती सुधारण्यास मदत मिळते असा अनुभव आहे. नातीला नियमित पादाभ्यंग करण्याचा, तसेच झोपण्यापूर्वी नाकात "नस्यसॅन घृता'चे किंवा घरी बनविलेल्या साजूक तुपाचे थेंब टाकण्याचा फायदा होईल. मानेला तसेच टाळूला "संतुलन अभ्यंग खोबरेल सिद्ध तेल" लावण्याचाही उपयोग होईल. सकाळ-संध्याकाळ "संतुलन पित्तशांती' वा कामदुधा या गोळ्या घेण्याचाही फायदा होईल. तरीही एकदा तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे श्रेयस्कर. 

मला रक्‍तदाबाचा त्रास आहे, त्यासाठी गोळ्या चालू आहेत, माझ्या पायांना घोट्याजवळ व तळपायांना खूप सूज आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने बऱ्याच तपासण्या केल्या पण निदान होत नाही. पुनर्नवासव घेऊन पाहिले, त्याचाही उपयोग होत नाही. कृपया औषधोपचार सुचवावा. 
.... गादिया 

रक्‍तदाबाचा त्रास आहे तेव्हा रक्‍ताभिसरण व्यवस्थित होते आहे की नाही यासाठी तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे चांगले. तत्पूर्वी रोज संपूर्ण अंगाला नियमित अभ्यंग करण्याचा उपयोग होईल. अगोदर तेल लावून नंतर मीठ मिसळलेल्या कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवण्याचा उपयोग होईल. पुनर्नवासवाच्या बरोबरीने चंद्रप्रभावटी, गोक्षुरादी गुग्गुळ घेण्याचा उपयोग होईल. रोज थोडा वेळ चालणे, झोपताना पायाखाली उशी घेणे, खुर्चीवर बसल्यावर स्टूल वगैरे ठेवून पाय सरळ करण्याचा प्रयत्न करणे हेसुद्धा श्रेयस्कर. काही दिवसांसाठी आहारातून तेल व गहू वर्ज्य करून सुजेत फरक पडतो आहे ते पाहणे. दिवसभर प्यायचे पाणी उकळलेले व शक्‍यतो गरम असताना पिणे सुद्धा श्रेयस्कर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question and Answer article written by Dr Shree Balaji Tambe