प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 8 November 2019

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ नियमित वाचतो. संतुलनची बरीच औषधे वापरतो. मला मानेचा विकार आहे. स्पॉंडिलोसिस आहे असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे व व्हर्टिन म्हणून एक गोळी दिली आहे. मी फिजिओथेरपीसुद्धा केली आहे, पण गुण येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. 
..... धर्मेश 

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ नियमित वाचतो. संतुलनची बरीच औषधे वापरतो. मला मानेचा विकार आहे. स्पॉंडिलोसिस आहे असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे व व्हर्टिन म्हणून एक गोळी दिली आहे. मी फिजिओथेरपीसुद्धा केली आहे, पण गुण येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. 
..... धर्मेश 
मान व संपूर्ण पाठीच्या कण्याला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेला’सारखे तेल दिवसातून दोन-तीन वेळा लावण्याचा उपयोग होईल. नाकात ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकण्यानेही गुण येईल. बरेच उपचार करूनही अजिबात सुधारणा दिसत नाही तेव्हा लवकरात लवकर पंचकर्म करून पिंडस्वेदन, विशेष लेप वगैरे मान-पाठीचे विशेष उपचार करून घेणे चांगले. तत्पूर्वी तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत’ चूर्ण घेणे, ‘संतुलन वातबल’ गोळ्या घेणे सुरू करता येईल. 

माझा नातू पाच वर्षांचा आहे. त्याला सतत सर्दी-खोकला-ताप येतो. महिन्यातून पंधरा दिवस तो आजारीच असतो. काही खात नाही, हट्टी आहे. ऐकत नाही. दोन-तीन महिन्यांपासून त्याला मानेवर गाठी उठल्या आहेत. अॅलर्जीचे औषध दिले की त्या कमी होतात, पण नंतर पुन्हा येतात. हा माझ्या मुलीचा मुलगा. त्याच्या वडिलांच्या वडिलांना अशाच प्रकारे गाठी उठल्या होत्या व कॅन्सरचे निदान झाले होते. आम्ही खूप घाबरलो आहोत. कृपया मार्गदर्शन करावे. 
.... विलास 
 तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मनातील संशयाचे निराकरण करून घेणे हा सर्वांत योग्य मार्ग होय. मात्र गाठ म्हटली, की प्रत्येक वेळी घाबरून जायची आवश्‍यकता नसते. विशेषतः वारंवार सर्दी, ताप, अॅलर्जी, जंतुसंसर्ग असा त्रास असताना शरीरातील प्रतिकारक्षमतेने केलेले प्रतिकार म्हणूनही ‘लिम्फ नोड’मध्ये सूज येऊन त्या जाणवू शकतात. विशेषतः अॅलर्जीचे औषधे घेतल्याने त्या काही दिवसांसाठी कमी होतात, जंतुसंसर्गाने जोर धरला की पुन्हा सूज वाढते. असे कॅन्सरच्या बाबतीत घडत नाही. एकदा ही संपूर्ण प्रक्रिया तज्ज्ञांकडून समजून घेतली, तर मनातील भीती कमी होईल. बरोबरीने नातवाला मधाबरोबर सीतोपलादी चूर्ण, ‘सॅनरोझ’, ‘ब्रॉंकोसॅन सिरप’ देण्यास सुरवात करणे चांगले. नियमित अभ्यंग करणे, जंतुसंसर्ग टाळू शकणाऱ्या वनस्पतींपासून बनविलेला ‘संतुलन प्युरिफायर धूप’ घरात दिवसातून दोन वेळा करणे, चीज, दही, पनीर वगैरे गोष्टी आहारातून वर्ज्य करून घरी बनविलेल्या साजूक तुपाचा समावेश करणे, आठवड्यातून दोन-तीन वेळा छाती-पाठ रुईच्या पानांनी शेकणे हे उपाय सुरू करता येतील. 

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. याचा आम्हाला खूप फायदा होतो. माझे वय ६३ वर्षे आहे. थोडेही काम केले की खूप थकवा येतो. चेहऱ्यावर कायम थकवा दिसतो. रात्री झोपले की कधी कधी दोन्ही पायांत गोळे येतात, त्या वेळी काही सुचत नाही. पाय हलवताही येत नाही. मालिश केले की हळूहळू गोळे जातात. यामुळे झोपही नीट होत नाही. कृपया उपाय सुचवावा. 
..... विलासिनी 
पायांत गोळे येण्याचा संबंध शरीरात वातदोष वाढण्याशी व पोटाशी संबंधित असतो. थकवा येऊ नये, काम करण्याची क्षमता वाढावी यासाठी सुद्धा वात संतुलन महत्त्वाचे होय. या दृष्टीने रात्री झोपण्यापूर्वी दररोज संपूर्ण अंगाला, विशेषतः पायांना ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ जिरवून लावणे उत्तम होय. बरोबरीने रोज सकाळी शतावरी कल्प घालून दूध, सॅनरोझ, च्यवनप्राशसारखी रसायने घेण्याचा तसेच सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन वातबल’, कॅल्सिसॅन, प्रवाळ पंचामृत या गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा किमान पाच-सहा चमचे या प्रमाणात आहारात समावेश करणे, जेवणाच्या शेवटी लवणभास्कर चूर्ण मिसळून ताजे, गोड ताक घेणे, जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग’ या गोळ्या घेणे हे सुद्धा उत्तम. सध्या बाजारात ताजे आवळे उपलब्ध आहेत. रोज एका आवळ्याचा रस खडीसाखर, तूप व मध मिसळून घेण्यानेही शक्‍ती वाढण्यास, वातदोष कमी होण्यास मदत मिळेल. 

माझ्या आईला अनेक वर्षांपासून मधुमेह, थायरॉइडचा त्रास आहे. या महिन्यात अचानक हृदयविकाराचा झटका येऊन अँजिओप्लास्टी करावी लागली. तरी यासंदर्भात कोणती आयुर्वेदिक औषधे घेता येतील? गेल्या वर्षी गुडघेदुखीसाठी संतुलन केंद्रात उपचार घेतले होते त्याचा चांगला उपयोग झाला होता. 
..... . काळे 
अनेक वर्षांचा मधुमेह अशा प्रकारच्या समस्यांचे आज ना उद्या कारण ठरतोच. त्यामुळे फक्‍त साखर नियंत्रणात ठेवण्यापुरते उपचार न घेता बरोबरीने मधुमेहाच्या संप्राप्तीवर काम करणारे उपचार घेणे, पुन्हा असा त्रास होऊ नये यासाठी उपचार घेणे. थायरॉइडच्या सांप्रत गोळीची मात्रा हळूहळू कमी करता येईल यासाठी उपचार घेणे गरजेचे होय. यासाठी केंद्रातील वैद्यांना प्रत्यक्ष भेटून नेमकी औषधे सुरू करणे सर्वांत चांगले. यात ‘कार्डिसॅन प्लस' हे महत्त्वाचे चूर्ण मधासह घेण्याचा उपयोग होईल. मधुमेह असणाऱ्यांसाठी हृदयाला पोषक असलेले ‘संतुलन सुहृदप्राश’ हे खास रसायन घेणे, नियमित अभ्यंग करणे, नियमित चालणे, अनुलोम-विलोम प्राणायाम करणे, आहाराचे नियोजन प्रकृतीनुरूप करणे, काही दिवस तेल पूर्ण बंद करून घरी बनविलेल्या साजूक तुपात स्वयंपाक करणे, रात्रीच्या जेवणात फक्‍त सूप घेणे चांगले. 
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुन्हा या किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही समस्या उद्‍भवू नयेत यासाठी शास्त्रशुद्ध पंचकर्म व त्यानंतर हृद्‌बस्ती हा उपचार करून घेणे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question and Answer article written by Dr Shree Balaji Tambe