प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 20 December 2019

मला "फॅमिली डॉक्‍टर'मधील प्रश्नोत्तरे सदराचा खूप फायदा झालेला आहे. माझी बहीण २५ वर्षांची आहे. ती शिक्षिका आहे. तिची उंची चांगली आहे, मात्र वजन कमी आहे. तिच्यासाठी स्थळे बघणे सुरू आहे, त्यामुळे मला तिच्या वजनाची खूप काळजी वाटते. वजन वाढून स्त्रीसुलभ फिगर होण्यासाठी काही करता येईल का? कृपया उत्तर द्यावे. 
..... ठाकरे 

मला "फॅमिली डॉक्‍टर'मधील प्रश्नोत्तरे सदराचा खूप फायदा झालेला आहे. माझी बहीण २५ वर्षांची आहे. ती शिक्षिका आहे. तिची उंची चांगली आहे, मात्र वजन कमी आहे. तिच्यासाठी स्थळे बघणे सुरू आहे, त्यामुळे मला तिच्या वजनाची खूप काळजी वाटते. वजन वाढून स्त्रीसुलभ फिगर होण्यासाठी काही करता येईल का? कृपया उत्तर द्यावे. 
..... ठाकरे 
- वजन कमी असण्यामागे, स्त्रीविशिष्ट विकास हवा तसा न होण्यासाठी सहसा स्त्रीसंतुलनातील दोष कारणीभूत असतो. यादृष्टीने ‘फेमिसॅन सिद्ध तेला'चा पिचू वापरण्याचा, तसेच ‘संतुलन सुहृद सिद्ध तेल' स्तनांवर लावण्याचा उपयोग होईल. शतावरी कल्प किंवा ‘स्त्रीसंतुलन कल्प' घालून दूध घेणे, रोज सकाळी धात्री रसायन किंवा ‘सॅनरोझ'सारखे रसायन घेणे हेसुद्धा चांगले. संस्कारित तीळ तेलाचा नियमित अभ्यंग करण्याने कमी असलेले वजन वाढण्यास मदत होते, तसेच वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दररोज ‘संतुलन अभ्यंग (सी) सिद्ध तेल' जिरवून लावण्याने वजन वाढण्यास, शरीरसौष्ठव मिळण्यास मदत मिळेल. याबरोबरीने सूर्यनमसस्कार, अनुलोम-विलोमसारख्या श्वसनक्रिया नियमित करणे, सकाळी पंचामृत, रात्रभर भिजविलेले बदाम खाणे सुद्धा हितावह होय. 

मी आपली ‘फॅमिली डॉक्‍टर' पुरवणी नियमित वाचतो. सर्व सदरांतून आरोग्यविषयक उत्तम माहिती मिळते. माझा प्रश्न मधुमेहासंबंधित आहे. रक्‍तातील साखरेचे प्रमाण किती असले तर मधुमेहासाठी एलोपॅथीचे औषध घ्यावेच लागते? कारण एलोपॅथीच्या गोळ्या घेतल्या की मला फार थकल्यासारखे होते, चक्कर येते, साखर कमी झाल्यासारखे वाटते. मधुमेहावर आयुर्वेदात औषधे असतात का? 
..... अशोक 
- मधुमेहावर आयुर्वेदात औषधे असतात. प्रकृती पाहून नेमके निदान करून आयुर्वेदाचे औषध सुरू केले तर त्यामुळे मूळ मधुमेहाची संप्राप्ती नष्ट होण्यास मदत मिळतेच, पण बरोबरीने इतर कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि मधुमेहातून पुढे उद्भवणाऱ्या समस्यांनाही प्रतिबंध करता येतो. वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप नेमकी औषधे सुरू करणे सर्वोत्तम. आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार जोपर्यंत जेवणानंतरची शर्करा १७०-१८० पेक्षा कमी असते, तोपर्यंत एलोपॅथीचे औषध न घेता, नियमित चालणे, योगासने करणे, पथ्य सांभाळणे, विशेषतः रात्रीचे जेवण वेळेवर व पचण्यास सोपे, द्रव स्वरूपाचे असणे वगैरेंच्या मदतीने मधुमेहाचे नियोजन करता येते. गोळ्या घेण्याने साखर प्रमाणापेक्षा कमी होत असली तर तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने त्यांचे प्रमाण कमी करणे, रोज दीड-दोन चमचे साखर आहारात समाविष्ट करणे हे चांगले. 

माझे वय ५१ वर्षे आहे. माझे गुडघे खूप दुखत आहेत. चालणे अगदीच असह्य झाले आहे. गुडघे खूप झिजले असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. मी बस्ती, जानुबस्ती, आयुर्वेदिक औषधे घेऊन पाहिली. खारीक चूर्ण दुधात उकळूनही घेतो आहे. कृपया काही मार्ग दाखवा. मी सध्या शांती तेल लावण्यास सुरुवात केली आहे. 
.... सागर 
- वयाच्या मानाने लवकर व खूप जास्ती प्रमाणात गुडघ्यांचा त्रास सुरू झालेला आहे. खारीक-दूध, ‘संतुलन शांती सिद्ध तेल' नियमित वापरणे चांगलेच आहे, मात्र वातदोषावर वेळीच नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करायला हवेत. यासाठी आहारात रोज किमान पाच चमचे साजूक तूप, डिंकाचे लाडू घेणे चांगले. वांगे, गवार, ढोबळी मिरची, मटार, चवळी, वाटाणे वगैरे वातूळ पदार्थ आहारातून टाळणे आवश्‍यक. दुखण्याची तीव्रता जास्ती आहे त्या दृष्टीने शांती तेल दिवसातून दोन-तीन वेळा लावता येईल. निर्गुडी, एरंड, शेवगा यापैकी मिळतील ती पाने घेऊन वाफवून त्याचा गुडघ्यांवर लेप आठवड्यातून दोन-तीन वेळा करण्याचा उपयोग होईल. ‘संतुलन वातबल' गोळ्या, तूप-साखरेसह ‘संतुलन प्रशांत चूर्ण', एक-एक चमचा पंचतिक्‍तघृत घेण्याचाही उपयोग होईल. 

माझे वय ३५ वर्षे आहे. मला सकाळी तीन वेळा शौचाला जावे लागते, भसरट व गॅसेससह होते. एसिडिटी कमी होण्याचे औषध घेतले तर तात्पुरते बरे वाटते. कृपया योग्य उपाय सुचवावा. 
.... तावरे 
- काही दिवस संध्याकाळचे जेवण थोडे लवकर म्हणजे आठ-साडेआठआधी घ्यावे व त्यात मुगाचे कढण, मऊ भात, खिचडी, ज्वारीची भाकरी व साधी फळभाजी अशा पद्धतीने करणे चांगले. दोन्ही जेवणांनंतर अर्धा-अर्धा चमचा लवणभास्कर चूर्ण घेण्याचा, एक-एक चमचा ‘बिल्वसॅन' हा अवलेह घेण्याचाही उपयोग होईल. दुपारच्या जेवणानंतर वाटीभर ताक घेणे, झोपण्यापूर्वी ‘सॅनकूल' चूर्ण घेणे, दिवसातून दोन वेळा नाभीभोवती ‘संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेला'सारखे सहजतेने आत जिरणारे व शीतल वीर्याचे तेल लावणे सुद्धा चांगले. या उपायांनी बरे वाटेलच, तरीही पचन हे आरोग्याचे मूळ असल्याने एकदा तज्ज्ञ वैद्यांना भेटून प्रकृती समजून घेण्याचा, त्यानुसार आहाराचे नियोजन करण्याचाही उपयोग होईल.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question and Answer article written by Dr Shree Balaji Tambe