प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 3 January 2020

माझे वय 40 वर्षे असून दोन वर्षांपासून माझ्या शरीरावर पुरळ येते, त्यावर खूप खाज सुटते व सूज येते. ऍलोपॅथीचे औषध घेईपर्यंत बरे वाटते,पण पुन्हा त्रास होतो. डॉक्‍टरांनी फंगल इन्फेक्‍शन आहे असे सांगितलेले आहे. कृपया उपाय सुचवावा. 
..... संजय पाटील 

माझे वय 40 वर्षे असून दोन वर्षांपासून माझ्या शरीरावर पुरळ येते, त्यावर खूप खाज सुटते व सूज येते. ऍलोपॅथीचे औषध घेईपर्यंत बरे वाटते,पण पुन्हा त्रास होतो. डॉक्‍टरांनी फंगल इन्फेक्‍शन आहे असे सांगितलेले आहे. कृपया उपाय सुचवावा. 
..... संजय पाटील 
    या प्रकारच्या पुरळावर किंवा फंगल इन्फेक्‍शनवर रक्‍तशुद्धी करण्याची व प्रतिकारशक्‍ती सुधारण्याची गरज असते. यासाठी रक्‍तशुद्धिकर द्रव्यांची बस्ती, शास्त्रशुद्ध पद्धतीने विरेचन घेणे सर्वोत्तम होय. बरोबरीने पंचतिक्‍त घृत घेण्याचा, 'संतुलन मंजिसार' आसव, "मंजिष्ठासॅन' गोळ्या तसेच अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण पाण्याबरोबर घेण्याचा उपयोग होईल. सकाळ-संध्याकाळ चमचाभर "सॅनरोझ' घेण्याचाही उपयोग होईल. स्नानाच्या वेळी साबण न वापरता मसुराच्या पीठ, "सॅन मसाज पावडर', कडू जिऱ्याची पूड व गोमूत्र मिसळून लावण्याचा उपयोग होईल. गहू, तळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ काही दिवस आहारातून वर्ज्य करणे श्रेयस्कर.  

 

 "फॅमिली डॉक्‍टर" ही पुरवणी मी नियमित वाचतो. यातील माहिती खूप उपयुक्‍त असते. माझी गेल्या दहा वर्षांत तोंडाच्या कर्करोगाची तीन शस्त्रकर्मे करावी लागली. डॉक्‍टर म्हणतात, एवढी काळजी घेऊन, नियमित तपासण्या करून सुद्धा कर्करोगाच्या पेशी पुन्हा पुन्हा कशा येतात हे समजत नाही. माझा प्रश्न असा आहे की, असे पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी काही उपाय करता येतील का? कृपया मार्गदर्शन करावे. 
..... मंगेश 
    कर्करोग हा शरीरातील आकाशतत्त्वाशी, अग्नितत्त्वाशी तसेच मन, भावना वगैरे इतर सूक्ष्म तत्त्वांशी संबंधित विकार असतो, आणि त्यामुळेच तो अवघड प्रकारात मोजला जातो. त्यामुळे व आजपर्यंतच्या अनुभवानुसार त्यावर उपचार सुद्धा सर्व बाजूंनी करावे लागतात. विशेषतः पुन्हा पुन्हा कर्करोगाची लागण होऊ नये यासाठी शास्त्रशुद्ध परंतु प्रकृतीची व शक्‍तीची काळजी घेऊन पंचकर्म करणे, प्रकृतीनुरूप आहार-आचरणात बदल करणे, योग, अनुलोम-विलोम, ॐकार ऐकणे किंवा म्हणणे, राशीनुरूप धूप करणे, स्वास्थ्यसंगीत हे शरीरातील आकाशतत्त्वावर काम करणारे असल्याने ते ऐकणे या उपायांचा उत्तम उपयोग होताना दिसतो. च्यवनप्राश, धात्री रसायनसारखे रसायन, गुळवेल सत्त्व, "समसॅन" गोळ्या वगैरे आयुर्वेदातील शक्‍तिवर्धक, वातशामक औषधे, तसेच पादाभ्यंग, अभ्यंगादी उपचारांचा उपयोग होताना दिसतो. मुखाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आयुर्वेदाने कवल-गंडूष उपचार सुचवलेले आहेत तेव्हा "संतुलन सुमुख तेल' दहा मिनिटांसाठी तोंडात धरून ठेवण्याचाही उपयोग होईल. 

 

"फॅमिली डॉक्‍टर"मधील मार्गदर्शन बहुमोल असते. मी रोज सकाळी पंचामृत घेतो. पंचामृत घेतल्यानंतर किती वेळाने नाश्‍ता घ्यावा? एखाद्या दिवशी दही नसेल तर त्याऐवजी काही वेगळे टाकता येते का? 
...... सावंत 
    रोज सकाळी पंचामृत घेता आहात ते उत्तम आहे. पंचामृताचे अमृतासारखे फायदे मिळण्यासाठी त्यात पाचही घटकद्रव्ये असणे आवश्‍यक आहे. त्यांना पर्याय सांगता येणार नाही. एखाद्या दिवशी दही नसले तर उरलेल्या चार गोष्टी एकत्र करून घेता येतील, मात्र त्यामुळे दह्यातील प्रो-बायोटिक स्वरूपाचा उपयोग होणार नाही. पंचामृत घेतल्यावर साधारण दहा-पंधरा मिनिटांनी नाश्‍ता करता येतो. 

 

 "फॅमिली डॉक्‍टर' वाचण्याचा मला आजपर्यंत खूप फायदा झालेला आहे. माझी मुलगी 21 वर्षांची आहे, ती शिक्षणानिमित्ताने वसतिगृहात राहते. त्यामुळे जेवण बाहेरचे खाते. तिला पाळी दर 23 ते 28 दिवसांनी येते आणि अकराव्या दिवसापासून ते सोळाव्या दिवसापर्यंत एखादा थेंब रक्‍तस्राव होतो. डॉक्‍टरांना विचारले असता ओव्ह्यूलेशनमुळे असे होते असे सांगितले. यावर काय उपचार घ्यावेत? 
...... दर्शना 
     पाळी 28 दिवसांपेक्षा लवकर येणे आणि मधे मधे रक्‍तस्राव होणे हे स्त्रीच्या ताकदीच्या दृष्टीने फारसे चांगले नाही, तसेच ते गर्भाशयाच्या अशक्‍ततेतही एक निदर्शक लक्षण असते. यासाठी मुलीला काही दिवस अशोक-ऍलो सॅन' या गोळ्या, शतावरी कल्प घालून दूध, धात्री रसायन देणे चांगले. अशोकारिष्ट व "संतुलन फेमिफिट सिरप' नियमित घेण्यानेही हा त्रास दूर होईल. "फेमिसॅन तेला'चा पिचू वापरण्याने गर्भाशयाची शक्‍ती सुधारली की उत्तम गुण येईल. वसतिगृहात राहताना बाहेरच्या खाण्याला पर्याय नसला तरी उदा. गवार, ढोबळी मिरची, वांगे, कोबी, फ्लॉवर, चणे, चवळी, वाटाणा, राजमा वगैरे अगदीच वातूळ भाज्या खाणे टाळता येईल. त्याऐवजी अधून मधून तूप-साखर-पोळी घेण्याचा उपयोग होईल. 

 

माझी बहीण 23 वर्षांची आहे. तिला दोन वर्षांपूर्वी आजारपणामुळे सलाईन लावावे लागले होते. सध्या तिच्या दोन्ही हातांवर मनगटापासून ते कोपरापर्यंत गाठी झालेल्या आहेत. भीतीचे कारण नाही असे डॉक्‍टरांनी सांगितलेले आहे. तिला त्रास असा काही होत नाही. तरी यावर काही मार्गदर्शन करावे. 
..... महेश पाटील 
    या प्रकारच्या गाठींवर नियमित अभ्यंग करण्याचा उपयोग होताना दिसतो. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी हातांना खालून वर या दिशेने "संतुलन अभ्यंग तीळ सिद्ध तेल' जिरविण्याचा उपयोग होईल. स्नानाच्या वेळी कुळीथ पीठ, "सॅन मसाज पावडर' व लिंबाचा रस एकत्र करून तयार केलेले मिश्रण हातांवर चोळून लावण्याचा, पाच-दहा मिनिटांसाठी ठेवून नंतर धुवून टाकण्याचा उपयोग होईल. बरोबरीने सूर्यनमस्कारासारखा व्यायाम करण्याचा उपयोग होईल. त्रिफळा, गुग्गुळ, मेदपाचक वटी घेण्याचा उपयोग होईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question and Answer article written by Dr Shree Balaji Tambe