प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 14 February 2020

माझा नातू पाच वर्षांचा आहे. सर्व गर्भसंस्कार केलेले आहेत, त्याची प्रकृती उत्तम आहे. क्वचित सर्दी-ताप आला तर त्याच्या घशात उजव्या बाजूला लालसर गाठ दिसते. तज्ज्ञांना दाखवले असता सहा-सात वर्षांनंतर ती गाठ आपोआप जाईल असे सांगितले. कधी कधी त्याला गिळताना त्रास होतो किंवा ठसका लागतो. तरी यावर काही उपाय करता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे. 
..... निकम 

माझा नातू पाच वर्षांचा आहे. सर्व गर्भसंस्कार केलेले आहेत, त्याची प्रकृती उत्तम आहे. क्वचित सर्दी-ताप आला तर त्याच्या घशात उजव्या बाजूला लालसर गाठ दिसते. तज्ज्ञांना दाखवले असता सहा-सात वर्षांनंतर ती गाठ आपोआप जाईल असे सांगितले. कधी कधी त्याला गिळताना त्रास होतो किंवा ठसका लागतो. तरी यावर काही उपाय करता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे. 
..... निकम 
    प्रतिकारशक्‍ती चांगली राहण्यासाठी सध्या प्रत्येकालाच प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. लहान मुलांमध्ये तर ते अधिकच गरजेचे असते. प्रतिकारशक्‍ती सुधारली की हा त्रास बरा होईल. या दृष्टीने नातवाला संतुलन सितोपलादी चूर्ण पाव-पाव चमचा या प्रमाणात मधाबरोबर देण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी अर्धा चमचा च्यवनप्राश देण्याचा तसेच सकाळ-संध्याकाळ ‘ब्रॉंकोसॅन सिरप’ देण्याचाही फायदा होईल. 

मी `सकाळ’ची ‘फॅमिली डॉक्‍टर’ ही पुरवणी अनेक वर्षांपासून वाचतो. मी ही पुरवणी वाचल्याशिवाय राहूच शकत नाही. माझा स्वभाव भित्रा आहे. मला बऱ्याचदा चक्कर येते. डॉक्‍टरांकडे जाऊन तपासण्या केल्यास काही सापडत नाही. मला रक्‍तदाब वगैरे काहीही त्रास नाही. सकाळी लवकर उठतो, योग व्यायाम करतो, पण मनात सतत भीती जाणवते. कृपया मार्गदर्शन करावे. 
..... मोरे 
   तपासण्यांमध्ये काही दोष आढळला नाही हे चांगलेच आहे. एकदा तज्ज्ञ वैद्यांकडे जाऊन नाडीपरीक्षण करून घेणेही चांगले, कारण प्रकृतीनुसार आहार, आचरणाची योजना केली तर त्रिदोषांच्या संतुलनाद्वारे चक्कर येणे बंद होऊ शकेल. बरोबरीने पाठीला, मानेला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावणे, रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृता’चे किंवा घरी बनविलेल्या साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकणे, आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करणे हे उपाय सुरू करता येतील. मनाची ताकद वाढविण्यासाठी नियमित योग, अनुलोम-विलोम करणे उत्तम असतेच, बरोबरीने शतावरी कल्प घालून दूध घेणे, सकाळी एक चमचा ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ घेणे, च्यवनप्राश किंवा धात्री रसायनसारखे रसायन घेणे हे सुद्धा उपयोगी पडेल. 

 

वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी गर्भाशयात गाठ असल्यामुळे गर्भाशय काढावे लागले. डॉक्‍टरांनी दिलेली सर्व औषधे घेते आहे, पण तरीही दर तासाने अंगाला दरदरून घाम सुटतो. सोबत कंबरदुखी, गुडघेदुखी, रक्‍तदाब हे त्रास आहेतच. कृपया यावर उपाय सुचवावा. 
.... अरुणा 
   तब्येतीचा विचार करता आपणास शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचकर्म, विशेषतः बस्ती, विरेचन उपचार करून घेण्याची आवश्‍यकता आहे. या उपचारांनी शरीरशुद्धी झाली की शिरोधारा, मेरुदंड बस्ती, जानुबस्ती यासारखे विशेष उपचार करून घेता येतील. तत्पूर्वी ‘फेमिसॅन तेला’चा पिचू, कंबरेवर ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’, गुडघ्यांना ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ लावण्याचा, ‘संतुलन वातबल गोळ्या’, संशमनी वटी, ‘सॅनरोझ’ रसायन घेण्याचा उपयोग होईल. बरोबरीने अनुलोम-विलोम, ‘संतुलन अमृत क्रिया’ करण्याचाही फायदा होईल. 

 

कोरफडीचा रस कोणकोणत्या विकारांवर उपयुक्‍त आहे? पुरुषांनी सुद्धा हा रस घेतला तर चालते का? 
..... रोहिणी 
कोरफडीचा रस म्हणण्यापेक्षा कोरफडाचा गर हा शब्द अधिक सयुक्‍तिक होय. स्त्री व पुरुष या दोघांसाठी एक चमचाभर प्रमाणात, ताज्या कोरफडीच्या पानातून काढलेला गर घेणे चांगले असते. कोरफडीचा ताजा गर यकृताची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतो, भूक चांगली लागावी, पचन व्यवस्थित व्हावे यासाठी साहायक असते. स्त्रियांच्या बाबतीत पाळी वेळेवर यावी, अंगावरून व्यवस्थित जावे यासाठी मदत करणारा असतो. कोरफडीचा गर नुसता खाता येतो किंवा एक-दोन थेंब तुपावर परतून घेऊन त्यावर चिमूटभर हळद टाकूनही घेता येतो. वारंवार शौचाला जावे लागत असेल, जुलाब, ग्रहणीचा त्रास असेल, पाळी लवकर येत असेल, अंगावरून जास्ती जात असेल त्यांनी कोरफडीचा गर टाळणे चांगले. 

 

माझे वय 55 वर्षे आहे. गेल्या सात वर्षांपासून सतत सर्दी होते, शिंका येतात, नाक गच्च होते, दम लागतो. मी सध्या इन्हेलर घेतो आहे. खूप उपचार झाले पण बरे वाटत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. 
..... पाटील 
त्रासाची तीव्रता पाहता यावर व्यवस्थित उपचार घेणे गरजेचे आहे असे वाटते. घरगुती किंवा साध्या उपायांचा हवा तेवढा उपयोग होणार नाही. यादृष्टीने तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन ‘प्राणसॅन योग’, श्वासकुठार, ज्वरांकुश यासारखी औषधे घेण्याचा उपयोग होईल. उकळत्या पाण्यात गवती चहा, ओवा, आले, पुदिना, तुळशी यापैकी उपलब्ध असतील ती द्रव्ये टाकून त्याचा वाफारा घेणे, छातीला अभ्यंग करून वरून रुईच्या पानांनी शेक करणे हे उपाय करता येतील. दिवसभर गरम पाणी पिणे आवश्‍यक. दही, पनीर, चीज, श्रीखंड, सिताफळ, फणस वगैरे पदार्थ आहारातून टाळणे, रोज पोट व्यवस्थित साफ होते आहे याकडे लक्ष देणे हे सुद्धा चांगले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question and Answer article written by Dr Shree Balaji Tambe