प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

baby cold and cough

प्रश्नोत्तरे

प्रश्र्न १ - माझे वय ३६ वर्षे असून मला साडेचार वर्षांची एक मुलगी आहे. आता आम्हाला दुसरे बाळ हवे आहे, पण डॉक्टरांनी तपासण्या करून मेनोपॉझ लवकर आल्याचे सांगितले आहे. इतकी वर्षे मला पाळी नियमित येत होती. गेल्या तीन महिन्यांपासून पाळी आलेली नाही. सध्या माझे वजनही जास्त आहे. पाळीची तारीख असताना मला छातीत जडपणा, पोटदुखी, कंबरदुखीचा त्रास होतो. पाळी मात्र येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे?

- राजेश्र्वरी अंधारे

उत्तर - वयाचा विचार करता हा स्त्रीसंतुलनातील बिघाड आहे असे म्हणता येईल. आणि यावर योग्य उपचार घेतले तर पुन्हा नियमित पाळी येणे साध्य करता येऊ शकेल. बाळ हवे आहे या दृष्टीने लवकरात लवकर पंचकर्माच्या मदतीने शरीरशुद्धी आणि स्त्रीसंतुलनासाठी उत्तरबस्ती हे उपचार करणे आवश्यक होय. तत्पूर्वी रोज सकाळी ताज्या कोरफडीचा एक चमचा गर घेणे, सूर्यनमस्कार करणे व २०-२५ मिनिटे चालायला जाणे हे सुरू करण्याचा उपयोग होईल. फेमिसॅन तेलाचा पिचू, रात्री झोपण्यापूर्वी अंगाला संतुलन अभ्यंग एस्. सिद्ध तेल लावणे, जेवणानंतर संतुलन फेमिनाइन बॅलन्स आसव घेणे याचाही उपयोग होईल. पाळी नियमित येऊ लागली, पंचकर्मानंतर वजन कमी झाले आणि शरीरशुद्धी, गर्भाशयशुद्धी होऊन स्त्रीसंतुलन प्रस्थापित झाल्याची खात्री झाला की मग बाळासाठी प्रयत्न करणे योग्य ठरेल.

प्रश्र्न २ - मी २५ वर्षांचा असून मला वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. कामामुळे एसीत बसावे लागते; पण त्यामुळे वारंवार सर्दी होते. सर्दी-खोकल्याची औषधे घेतली की पोट बिघडते, ॲसिडिटी होते. कृपया प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय सांगावे.

- अमोघ कदम

उत्तर - वारंवार आजारी पडणाऱ्यांसाठी आयुर्वेदातील ‘रसायने’ खूप मदत करणारी असतात. यादृष्टीने रोज सकाळी चमचाभर च्यवनप्राश घेणे, दिवसातून दोन वेळा मधात मिसळून सीतोपलादी चूर्ण घेणे आणि रात्री झोपताना अभ्यंग करणे उत्तम होय. प्यायचे पाणी अगोदर उकळलेले व शक्य असेल तेव्हा गरम असताना पिणे, घरात प्युरिफायर, सुरक्षा यासारखा धूप करणे, अनुलोम-विलोम, दीर्घश्र्वसन, सूर्यनमस्कार करणे हेसुद्धा उपयुक्त ठरेल. सर्दी-खोकल्याची सुरुवात झाल्या झाल्या छातीवर संतुलन अभ्यंग एस्. सिद्ध तेल लावून वरून तापलेल्या तव्यावर गरम केलेल्या रुईच्या पानांनी शेक केला तर सहसा डॉक्टरांची औषधे घेण्याची गरज पडत नाही असा अनुभव आहे.