esakal | पावसाळ्यानंतर नाकातून रक्त येते, करा हे उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

Family Doctor

पावसाळ्यानंतर नाकातून रक्त येते, करा हे उपाय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माझ्या मुलाला दरवर्षी पावसाळ्यानंतर नाकातून रक्त येण्याचा त्रास होतो. नंतर तो वर्षभर व्यवस्थित असतो. सध्या त्याचे वय १० वर्षे आहे. आत्तापासूनच काही उपाय योजला तर रक्त येण्यास प्रतिबंध होऊ शकतो का?

- सौ. नंदा काळे

उत्तर - पावसाळ्यानंतर येणाऱ्या शरद ऋतूत, ज्याला बोलीभाषेत ऑक्टोबर हीट म्हटले जाते, पित्तदोषाचा प्रकोप होत असतो. त्यामुळे मुलाला फक्त या काळातच त्रास होतो. आत्तापासूनच पित्तदोष संतुलित ठेवण्यासाठी उपाययोजना केली तर पित्त शरीरात साठणार नाही व पुढे प्रकुपितही होणार नाही. या दृष्टीने मुलाला सकाळ-संध्याकाळ १-१ कामदुधा व १-१ संतुलन पित्तशांती गोळ्या देण्यास सुरुवात करता येईल. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा अविपत्तिकर चूर्ण किंवा सॅनकूल चूर्ण देण्याचाही उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी नाकात नस्यसॅन घृताचे किंवा घरी बनविलेल्या साजूक तुपाचे २-३ थेंब टाकण्याचा तसेच आवड्यातून दोन वेळा पादाभ्यंग करण्याचा उपयोग होईल. आहारात हिरवी मिरची, लसूण, हिंग, टोमॅटो, वांगे, कुळीथ, ढोबळी मिरची, तळलेले पदार्थ, चीज, अंडी, मांसाहार वर्ज्य करणे सुद्धा आवश्यक.

फॅमिली डॉक्टर हे सदर पुन्हा सुरू केल्याने आनंद झाला. यातील लेखांमधून नेहमीच चांगली माहिती मिळते. माझे वय ३० वर्षे आहे. गेल्या पाच महिन्यांपासून मला रोज दिवसातून २-३ वेळा शौचाला जावे लागते. विशेषतः दुपारचे जेवण झाले की थोड्या वेळाच हमखास जावे लागते. जेवणानंतर पोट थोडे फुगते. तिखट खाल्ले तर अनेकदा गुदस्थानी आग होते, नंतर काही वेळ बसण्यास त्रास होतो. कृपया यावर काही उपाय सुचवावा.

उत्तर - पचन व्यवस्थित झाले आणि एका वेळेला पोट व्यवस्थित साफ झाले की असा त्रास होणार नाही. या दृष्टीने जेवणानंतर संतुलन अन्नयोग गोळ्या घेणे, रात्री झोपण्यापूर्वी सॅनकूल चूर्ण घेणे चांगले. बेलाच्या फळांपासून तयार केलेला बिल्वावलेह किंवा बिल्वसॅन दुपारी व रात्रीच्या जेवणानंतर घेण्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत मिळेल. पोट फुगू नये यासाठी जेवताना गरम पाणी पिण्याचा उपयोग होईल. जेवणानंतर ताकात जिरे पूड, ओवा पूड, काळे मीठ मिसळून घेण्याचाही उपयोग होईल. तिखट बेताने खाणेच चांगले. घरी बनविलेले ताजे लोणी, खडीसाखर घेण्याने, आठवड्यातून किंवा दहा दिवसातून एकदा एरंडेल तेल घेऊन पोटातील, आतड्यांतील उष्णता निघून गेली की गुदभागी आग होणे कमी होईल.

loading image
go to top