प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
सोमवार, 25 जून 2018

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. माझे चार महिन्यांपूर्वी बाळंतपण झाले. तरीही पाठ, कंबर, खुब्याचा सांधा, तळपाय, टाचा, गुडघे वगैरे फार दुखतात. कृपया यावर उपाय सुचवावा.
.... शारदा

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे. माझे चार महिन्यांपूर्वी बाळंतपण झाले. तरीही पाठ, कंबर, खुब्याचा सांधा, तळपाय, टाचा, गुडघे वगैरे फार दुखतात. कृपया यावर उपाय सुचवावा.
.... शारदा
उत्तर -
बाळंतपणानंतर शरीरात वाढलेला वातदोष वेळीच नियंत्रणात आणणे हे स्त्रीआरोग्याच्या दृष्टीने फार गरजेचे असते. म्हणून आयुर्वेदात तसेच परंपरागत उपचारांमध्ये बाळ-बाळंतिणीला अभ्यंग, शेक, धुरी वगैरे उपचार सुचविलेले असतात. ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून या विषयांची माहिती वेळोवेळी दिलेली आहे. अजूनही रोज सकाळी स्नानापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण अंगाला संतुलन अभ्यंग तेल, पाठीला संतुलन कुंडलिनी तेल लावण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करण्याचाही फायदा होईल. ‘संतुलन वातबल गोळ्या’, खारीक चूर्णाबरोबर उकळलेले दूध, डिंकाचे लाडू रोज घेण्याचाही उपयोग होईल. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकात दिल्याप्रमाणे बाळंतपरिचर्या पाळण्याचा, पथ्य सांभाळण्याचाही फायदा होईल. तरीही वात अजून बिघडू नये यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे अजून चांगले.

माझी प्रकृती फार उष्ण आहे. माझ्या सर्व अंगाला खूप खाज सुटते, चुणचुणते व आग होते. बरीच औषधे घेतली, मलमही लावले, पण काही उपयोग होत नाही. पोटावर एक-दोन ठिकाणी काळपट डाग पडलेले आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.
... ढमाळ
उत्तर -
उष्ण प्रकृतीच्या व्यक्‍तींसाठी वेळेवर जेवणे, वेळेवर व पुरेसे तास झोपणे हे महत्त्वाचे असते. नियमित पादाभ्यंग करणेही शरीरातील अतिरिक्‍त उष्णता काढून टाकण्यासाठी उत्तम उपचार असतो. रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर अविपत्तिकर चूर्ण, सॅनकूल चूर्ण घेण्याचा उपयोग होईल. अति उष्णतेमुळे आलेला रक्‍तातील दोष कमी करण्यासाठी पंचतिक्‍त घृत घेण्याचा, ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेण्याचा उपयोग होईल. अंगाला खाज सुटेल तेव्हा, तसेच पोटावर डाग आहेत त्या ठिकाणी शतधौत घृत किंवा ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’लावण्याचा उपयोग होईल. ढोबळी मिरची, वांगे, गवार, चिंच, टोमॅटो, दही, अननस यासारख्या उष्ण गुणाच्या व रक्‍तदोष तयार करणाऱ्या गोष्टी आहारातून टाळणे हे सुद्धा आवश्‍यक. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली थंड व रक्‍तशुद्धीकर द्रव्यांनी संस्कारित तेल वा तुपाच्या बस्ती घेण्याचाही उपयोग होईल

माझ्या वडिलांना वीस वर्षांपासून मधुमेहाचा त्रास आहे. त्यांचे वय ५५ वर्षे आहे. त्यांची साखर नियंत्रणात असते. ते नियमित चालायलाही जातात, मात्र, आता त्यांना खूप अशक्‍तपणा जाणवतो. पायांना मुंग्या येतात, कधी कधी बधिरपणा आल्यासारखे वाटते, पायांना पेटके येतात. पायांना तेल लावतात, पण याखेरीज काय उपाय करता येतील? पंचकर्माचा उपयोग होईल का? .
..... मधुगंगा 
उत्तर -
पंचकर्म करणे उत्तम, कारण पंचकर्मामुळे शरीरशुद्धी झाली की शरीरातील प्रत्येक अवयवाचे, प्रत्येक पेशीचे काम चांगल्या प्रकारे होऊ लागते. यामुळे अशक्‍तपणा कमी होतो, मधुमेहाच्या मुळावर काम होऊ लागले की त्यामुळे येणाऱ्या समस्या सुद्धा कमी होतात. तेव्हा शास्त्रशुद्ध पंचकर्म करणे सर्वांत चांगले. बरोबरीने अंगाला नियमितपणे अभ्यंग करणे, तळपायांना पादाभ्यंग करणे, ‘संतुलन वातबल गोळ्या’, ‘संतुलन प्रशांत चूर्ण’ घेण्याचाही चांगला फायदा होईल. मधुमेह असला तरी अर्धा-एक चमचा खडीसाखर घेणे, आहार पचायला सोपा परंतु धातूंचे पोषण करणारा असणे, दिवसभरात पाच-सहा चमचे साजूक तुपाचा समावेश करणे आवश्‍यक असते. आयुर्वेदात मधुमेहाच्या संप्राप्तीवर काम करणारी अनेक औषधे असतात, तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप औषधांची योजना करण्याने मधुमेहाच्या मुळावर काम झाले की मधुमेहातून उद्‌भवणाऱ्या समस्या टाळता येऊ शकतात, असा अनुभव आहे. 

माझी नात दहा वर्षांची असून गेल्या दोन वर्षांपासून तिच्या ओठांना चिरा पडतात. अनेक प्रकारची औषधे, मलम लावून पाहिले, पण तात्पुरता फरक पडतो. इतक्‍यात तिचा ओठ लाल झाला आहे आणि वारंवार तापही येतो आहे. कृपया आपण मार्गदर्शन करावे.
.... रजनी
उत्तर -
ओठांना चिरा, वारंवार ताप, लाल चेहरा ही सर्व लक्षणे शरीरात उष्णता व वातदोष वाढल्याची निदर्शक आहेत. वास्तविक त्रासाची तीव्रता आणि कालावधी लक्षात घेता नातीला तज्ज्ञ वैद्यांना दाखवून नेमके उपचार करणे श्रेयस्कर. बरोबरीने तिच्या आहारात किमान चार चमचे साजूक तुपाचा समावेश करण्याचा उपयोग होईल. झोपण्यापूर्वी नाभीवर दोन-तीन थेंब तूप किंवा ‘संतुलन रोझ ब्यूटी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल.

आठवड्यातून दोन दिवस पादाभ्यंग करण्याचाही उपयोग होईल. ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’, ‘संतुलन अनंत कल्प’ तसेच धात्री रसायन घेणेही चांगले. चांगल्या प्रतीचे व शुद्ध गुळवेल सत्त्व मिळाले तर रोज पाव चमचा सत्त्व दुधाबरोबर घेण्याचा उपयोग होईल किंवा वैद्यांच्या सल्ल्याने ‘सॅन अमृत’ या गोळ्या घेता येतील.

मी ज्येष्ठ नागरिक आहे. मला सहा महिन्यांपासून बहुमूत्रतेचा त्रास आहे, विशेषतः रात्री दर एक तासाने लघवीला जावे लागते. दिवसा तेवढा त्रास होत नाही. डॉक्‍टरांनी तपासण्या केल्या, त्यात प्रोस्टेट व किडनी व्यवस्थित आहे. तरी कृपया उपाय सुचवावा.
... खरे
उत्तर -
तपासण्यांमध्ये प्रोस्टेट, किडनी वगैरे अवयव व्यवस्थित आहेत हे उत्तमच आहे. मात्र, वयानुसार या अवयवांची कार्यक्षमता कमी होऊ नये यासाठी आधीपासूनच उपाय योजणे उत्तम असते. यादृष्टीने प्यायचे पाणी उकळून घेणे, गार फरशीवर अनवाणी उभे राहणे किंवा चालणे टाळणे, चवळी, पावटा, राजमा, दही वगैरे गोष्टी टाळणे चांगले. वारंवार लघवीला जावे लागते, त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हळद, ओवा व तीळ यांचे समभाग चूर्ण (रोज अर्धा चमचा मिश्रण) घेण्याचा उपयोग होईल. रात्रीच्या जेवणानंतर पाणी कमीत कमी घेण्यानेही वारंवार लघवीसाठी उठणे टाळता येईल. एकंदर मूत्रसंस्था, विशेषतः लघवी साठते त्या मूत्राशयाची धारणक्षमता वाढविण्यासाठी काही दिवस दूध-साखरेसह ‘संतुलन यू.सी. चूर्ण’ घेण्याचाही उपयोग होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question answer