प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Monday, 4 March 2019

माझ्या आईला चालताना व उभे राहताना खूप त्रास होतो. तिचे वय ६५ वर्षे आहे. कृपया मार्गदर्शन करावे. 
...भूपेंद्र चौधरी 

माझ्या आईला चालताना व उभे राहताना खूप त्रास होतो. तिचे वय ६५ वर्षे आहे. कृपया मार्गदर्शन करावे. 
...भूपेंद्र चौधरी 
उत्तर -
 पाय-गुडघे दुखत असल्यास त्यावर वात संतुलन करणारे उपचार योजणे आवश्‍यक होय. या दृष्टीने रोज स्नानापूर्वी व रात्री झोपण्यापूर्वी पायांना ‘संतुलन अभ्यंग (तीळ) सिद्ध तेल’ आणि गुडघ्यांना ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ जिरवून लावण्याचा उपयोग होईल. पायात ताकद येण्यासाठी खारीक पूड टाकून उकळवलेले दूध, डिंकाचे लाडू, ‘मॅरोसॅन’ घेता येईल. ‘संतुलन वातबल’ गोळ्या, प्रवाळपंचामृत घेण्यानेही सध्या होत असलेला त्रास कमी होईल. वाताशी संबंधित कोणताही त्रास असला, तर त्यावर लवकरात लवकर व योग्य ते उपाय करणे आवश्‍यक होय. त्या दृष्टीने तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे, त्यांच्या मार्गदर्शनानुसार वातशामक द्रव्यांनी संस्कारित तेलाच्या बस्ती घेणे सुद्धा श्रेयस्कर.

आपण ‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये सुचविल्यानुसार मला आठवड्यातून एकदा एरंडेल तेल घ्यायचे आहे. हे तेल कोणत्या वेळी, किती प्रमाणात आणि कशाबरोबर घ्यावे? तेल घेतल्यानंतर जुलाब होईपर्यंत काही खावे की नाही? कृपया योग्य माहिती द्यावी.
... श्रीनिवास 
उत्तर -
 आठवड्यातून एकदा एरंडेल तेल घेणे सहसा प्रकृतीला मानवणारे असते. त्रिफळा हा पोट साफ करणारा असला, तरी रुक्ष स्वभावाचा असतो, त्यामुळे तो नुसता घेण्याऐवजी तूप मिसळलेल्या पाण्याबरोबर घेणे चांगले असते. एरंडेल किंवा इतर कोणतेही पोट साफ करणारे औषध रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचे असते. याचे प्रमाण प्रकृतीनुसार थोडे फार बदलते; मात्र पहिल्या वेळी एरंडेल घेताना दीड-दोन चमचे हे प्रमाण ठेवून दुसऱ्या दिवशी दोन-तीन जुलाब होतात का याकडे लक्ष ठेवणे चांगले. कमी जुलाब झाल्यास पुढच्या वेळी अर्धा चमचा प्रमाण वाढविणे आणि जास्ती जुलाब झाल्यास अर्धा चमचा प्रमाण कमी करणे चांगले. एरंडेल रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी घ्यायचे असल्याने त्यानंतर भूक लागण्याची, काही खाण्याची गरज लागण्याची शक्‍यता नसते. तरीही गरज पडलीच तर साळीच्या लाह्या खाता येतील.

आमचे बाळ एक महिन्याचे आहे. आम्ही संतुलनचा बेबी केअर किट वापरतो आहोत. यातील बाल हर्बल सिरप हे बाळाला कधीपासून द्यावे आणि पुढे किती दिवसांपर्यंत चालू ठेवावे? कृपया मार्गदर्शन करावे.
.... सुरेखा 
उत्तर -
 ‘संतुलन बाल हर्बल सिरप’मध्ये पचनाला मदत करण्यासाठी, भूक व्यवस्थित लागण्यासाठी, जंत न होण्यासाठी आणि एकंदर बाळाच्या नाजूक पचनसंस्थेला क्रमाक्रमाने सशक्‍त बनविण्यासाठी अनेक वनस्पतींचा समावेश आहे. त्यामुळे हे सिरप नियमित देणे चांगले. एक महिन्याच्या बाळाला अष्टमांश चमचा, तीन महिन्याच्या बाळाला चतुर्थांश चमचा, सहा महिन्याच्या बाळाला अर्धा चमचा आणि दोन वर्षांच्या बाळाला एक एक चमचा या प्रमाणे सिरपचे प्रमाण वाढविता येते.

माझ्या आईला पाच वर्षांपासून चक्कर येण्याचा त्रास आहे. रक्‍तदाब तपासला असता तो वाढलेला आढळला. सध्या गोळी घेते आहे. तरी चक्कर येणे कमी झालेले नाही. तरी उपाय सुचवावा.
... मीरा भिसे 
उत्तर -
 चक्कर येण्यामागे अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी वाढलेला रक्‍तदाब हे एक मुख्य कारण. गोळी घेण्याने रक्‍तदाब कमी झाला तरी रक्‍तदाबाची संप्राप्ती म्हणजे रक्‍तदाब वाढण्यामागे कारणीभूत असलेले असंतुलन दूर होण्यासाठी वेगळे आणि नेमके प्रयत्न करणे आवश्‍यक असते. या दृष्टीने वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे चांगले. बरोबरीने पाठीच्या कण्याला व मानेला ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावणे, नाकात ‘नस्यसॅन घृता’चे किंवा घरच्या साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकणे, टाळूवर ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’ लावणे हे उपाय सुरू करता येतील. सकाळ-संध्याकाळ कामदुधा, ‘संतुलन पित्तशांती’, ‘ब्राह्मी सॅन’ गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल.

माझे वय ४८ वर्षे आहे. सहा महिन्यांपासून माझ्या पोटात फार गुडगुड आवाज येतो, गॅसेसही फार होतात. मला पाच वर्षांपासून मधुमेह आहे. माझे वजन लहानपणापासून कधी वाढले नाही, उलट आता अजूनच कमी झाले आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
.... मंजुश्री
उत्तर -
 मधुमेहावर प्रकृतीचे विरार करून आयुर्वेदानुसार नेमके उपचार घेतले तर त्याचा उत्तम गुण येतो असा अनुभव आहे, यामुळे साखर नियंत्रणात राहते, पण बरोबरीने वजन कमी होणे, शक्‍ती कमी होणे, डोळे-नसा यांची शक्‍ती कमी होणे यासारखे त्रासही टाळता येतात. तत्पूर्वी दिवसभर उकळलेले गरम पाणी पिणे, वीस-पंचवीस मिनिटांसाठी चालायला जाणे, सकाळी अनुलोम-विलोम करणे हे उपाय सुरू करता येतील. जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग गोळ्या’ घेण्यानेही गॅसेस, गुडगुड आवाज येणे हे त्रास कमी होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question answer