प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 26 April 2019

माझी मुलगी नऊ वर्षांची आहे. तिच्या एका गालावर दोन महिन्यांपासून पांढरा चट्टा दिसतो आहे. लहानपणापासून मान, बगल येथील त्वचा काळवंडलेली आहे. रोझ ब्युटी तेल लावतो आहोत. कृपया मार्गदर्शन करावे. 

माझी मुलगी नऊ वर्षांची आहे. तिच्या एका गालावर दोन महिन्यांपासून पांढरा चट्टा दिसतो आहे. लहानपणापासून मान, बगल येथील त्वचा काळवंडलेली आहे. रोझ ब्युटी तेल लावतो आहोत. कृपया मार्गदर्शन करावे. 

‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईलच, बरोबरीने आतून रक्‍तशुद्धी होणे गरजेचे आहे. त्यासाठी शतावरी कल्प घालून दूध घेणे, ‘अनंत सॅन’ गोळ्या घेणे चांगले. लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे पांढरट डाग किंवा चट्टे हे पोटात जंत असल्याचे निदर्शक असतात. तेव्हा मुलीला दर तीन महिन्यांनी जंतांचे औषध देणे चांगले. महिन्यातून आठ दिवस सकाळी पाव चमचा वावडिंग चूर्ण मधात मिसळून देण्याचा, काही दिवस सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन बाल हर्बल सिरप’ देण्याचा उपयोग होईल. बेकरी उत्पादने, तळलेले व आंबवलेले पदार्थ, गवार, ढोबळी मिरची, वांगे, दही या गोष्टी आहारातून टाळणे चांगले.

माझ्या पत्नीचे गुडघे दुखतात व गुडघ्यांवर सूजही आलेली आहे. गुडघ्यांमध्ये इंजेक्‍शन घेतले की दुखणे तात्पुरते बंद होते. सध्या इंजेक्‍शन बंद केले आहे. मात्र गुडघे दुखल्यामुळे उठणे, बसणे, चालणे कठीण झालेले आहे. कृपया उपाय सुचवावा.
- माधव मोरे

त्रासाची तीव्रता लक्षात घेता वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन नेमकी औषधे सुरू करणे सर्वांत चांगले. बरोबरीने दिवसातून दोन-तीन वेळा गुडघ्यांवर ‘सॅन वात लेप’ गरम पाण्यात मिसळून लावणे व तीस-चाळीस मिनिटांनी काढून टाकणे, ‘संतुलन वातबल गोळ्या’, रास्नादी गुग्गुळ, ‘संतुलन संदेश’ आसव घेणे हे उपाय सुरू करता येतील. दिवसभर प्यायचे पाणी अगोदर उकळून घेतलेले व थर्मासमध्ये भरून ठेवून गरम असताना पिणेसुद्धा चांगले. तांदूळ, ज्वारी, नाचणी, मूग, वेलीवर येणाऱ्या फळभाज्या, ताजे गोड ताक, घरी बनविलेले साजूक तूप यांचा आहारात समावेश असावा. 

माझा मुलगा झोपेत बऱ्याच वेळा तोंडाने श्वास घेतो. याचे कारण काय असावे? यावर उपाय काय योजावा?
- पाटील 

झोपेत तोंडाने श्वास घ्यावा लागण्यामागे सहसा नाक बंद पडणे हे मुख्य कारण असते. सर्दी नसली तरी असा त्रास होऊ शकतो. यावर उत्तम उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकणे व रोज सकाळी पाच मिनिटांसाठी अनुलोम-विलोम हा प्राणायाम करणे. यामुळे नाकातील अवरोध दूर होण्यास मदत मिळाली की हळूहळू तोंडाने श्वास घेणे बंद होईल. सर्दी होण्याची प्रवृत्ती असली तर ‘ब्राँकोसॅन सिरप’ घेणे, अधून मधून गरम पाण्याचा वाफारा घेणे हे सुद्धा चांगले.

माझे वय ४० वर्षे असून सात-आठ वर्षांपासून रक्‍तदाबाचा व थायरॉइडचा त्रास आहे. सध्या आयुर्वेदिक औषधे घेते आहे, पण चेहरा व दोन्ही हात खूप काळवंडलेले आहेत. सकाळी उठल्यावर हाडे कटकट वाजतात. हाडे व्यवस्थित राहावीत यासाठी काही उपाय सुचवावा. फेमिसॅन तेलाचा घरच्या घरी वापर केला तर चालेल का? किंवा डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा लागेल?
- चंदा कोकटनूर

कमी वयात त्रास सुरू झाले आहेत. आयुर्वेदिक औषधे घेणे चांगलेच आहे. योग्य निदान करून प्रकृतीनुरूप आयुर्वेदिक औषधे घेण्याने क्रमाक्रमाने उच्च रक्‍तदाब व थायरॉइडच्या गोळ्या कमी करता येतात असा अनुभव आहे.

‘फेमिसॅन तेल’ घरच्या घरी वापरता येते. यामुळे चेहरा व हातांवरचा काळपटपणा कमी होण्यासाठी मदत मिळेल. बरोबरीने सकाळ-संध्याकाळ पंचतिक्‍त घृत घेता येईल. हाडांचा कटकट आवाज येतो त्यासाठी तसेच हाडांच्या एकंदर आरोग्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण अंगाला ‘संतुलन अभ्यंग (तीळ) सिद्ध तेल’लावण्याचा आणि सकाळ-संध्याकाळ ‘कॅल्सिसॅन गोळ्या’ घेण्याचा उपयोग होईल. स्त्रीसंतुलन, तसेच एकंदर रक्‍तदाब, थायरॉइड वगैरे तक्रारींवर नियमित ज्योतिध्यान करण्याचा, तसेच ‘सोम’ध्यान करण्याचाही उत्तम गुण येतो असा अनुभव आहे.

‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीमधील लेखांमधून खूप मार्गदर्शन होते. ‘प्रश्नोत्तर’ सदरातील उत्तरांनी अनेक शंकांचे निरसन होते व आरोग्य चांगले राहते हा आमचा अनुभव आहे. माझा मुलगा १४ वर्षांचा आहे. सध्या त्याच्या दोन्ही हातांची बोटे खूप भगभग करतात. गेल्या वर्षी चिरा पडून त्यातून रक्‍तही आले होते. त्याला थंडीतही गरम होते. कृपया यावर उपाय सुचवावा. हातांच्या जळजळीमुळे तो फार बेचैन होतो.
- मंगल

रक्‍तामध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे या प्रकारचा त्रास होऊ शकतो. मुलाला तळहातांना आलटून पालटून तूप लावून काशाच्या वाटीने चोळण्याचा उपयोग होईल. साध्या तुपाऐवजी ‘संतुलन पादाभ्यंग घृत’ किंवा वैद्यांच्या सल्ल्याने मधुरम्‌ घृत वापरणे अधिक चांगले. ‘संतुलन पित्तशांती’, ‘अनंत सॅन’ गोळ्या घेणे, आहारात चार-पाच चमचे साजूक तुपाचा समावेश करणे चांगले. वांगे, गवार, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, चिंच, टोमॅटो, आंबट फळे, दही, तळलेले पदार्थ आहारातून वर्ज्य करणे श्रेयस्कर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question Answer