प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Wednesday, 5 June 2019

मला गेल्या दोन वर्षांपासून सर्दी झाली आहे, दोन नाकपुड्यांपैकी एकच चालू असते. सहसा डावी नाकपुडी बंद असते. तसेच माझा अजून एक प्रश्न आहे की, आजकाल माझी जीभ, गाल, ओठ, काही खाताना आतून चावला जातो. तरी या दोन्ही समस्यांवर उपाय सुचवावा. 
... मोहोळकर

मला गेल्या दोन वर्षांपासून सर्दी झाली आहे, दोन नाकपुड्यांपैकी एकच चालू असते. सहसा डावी नाकपुडी बंद असते. तसेच माझा अजून एक प्रश्न आहे की, आजकाल माझी जीभ, गाल, ओठ, काही खाताना आतून चावला जातो. तरी या दोन्ही समस्यांवर उपाय सुचवावा. 
... मोहोळकर

उत्तर - सामान्य अवस्थेतही दोन नाकपुड्यांपैकी कोणत्या तरी एकाच नाकपुडीतून आलटून-पालटून श्वासोच्छ्वास सुरू असतो. नाकाजवळ बोट नेले तर उच्छ्वासाच्या बोटाला होणाऱ्या स्पर्शावरून कोणती नाकपुडी चालू आहे हे समजू शकते. हा दोष समजला जात नाही. मात्र सर्दी झाल्यामुळे नाक बंद होते तेव्हा प्रयत्न करूनही एका नाकपुडीतून श्वास घेतला-सोडला जात नाही, हा दोष असतो व त्यावर उपचार करणे आवश्‍यक असते. या दृष्टीने रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृता’चे तीन-तीन थेंब टाकण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा उकळत्या पाण्यात गवती चहा, पुदिना, तुळशी, आले, ओवा यापैकी मिळतील त्या वनस्पती टाकून त्याचा वाफारा घेण्याचाही उपयोग होईल. घास चावताना जीभ, गाल वगैरे चावले जाऊ नये यासाठी मुखाची अंतस्वचा प्राकृत राहणे गरजेचे असते. यासाठी ‘संतुलन सुमुख तेला’चा गंडुष म्हणजे अर्धा-पाऊण चमचा सुमुुख तेल तोंडात दहा मिनिटांसाठी धरून ठेवणे, अधूनमधून खुळखुळवणे हा उपचार करण्याचा उपयोग होईल. 

‘फॅमिली डॉक्‍टर’मधील मार्गदर्शन अनमोल असते, मी या साप्ताहिक पुरवणीची नियमित वाचक आहे. माझे वय २४ वर्षे असून, माझ्या लग्नाला अडीच वर्षे झाली. आम्हा उभयतांचे रिपोर्टस नॉर्मल आहेत. माझ्या दोन्ही बीजवाहिन्या उत्तम आहेत. मासिक पाळीसुद्धा नियमित येते. गर्भधारणा होण्यासाठी उपाय सुचवावा. 
... हितांश्री

उत्तर - गर्भधारणा होण्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. उभयतांचे रिपोर्टस नॉर्मल आहेत हे उत्तमच आहे. बरोबरीने स्त्रीबीज, पुरुषबीज यांची शक्‍ती वाढावी म्हणून तुम्ही शतावरी कल्प, ‘सॅनरोझ’ तर, यजमानांनी ‘संतुलन चैतन्य कल्प’, ‘संतुलन आत्मप्राश’ सुरू करणे चांगले. दोघांनाही सकाळी पंचामृत, बदाम घेण्याचा उपयोग होईल. गर्भाशयाच्या सशक्‍ततेसाठी, तसेच गर्भाधारणेला अनुकूल परिस्थिती तयार होण्यासाठी ‘फेमिसॅन तेला’चा पिचू वापरण्याचा उपयोग होईल. एकंदर स्त्रीसंतुलनाला मदत मिळण्यासाठी ‘स्त्री संतुलन’ ही संगीतरचना ऐकता येईल. हे उपाय यश देतीलच, बरोबरीने तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे उत्तम. 

मला रात्री असंबद्ध स्वप्ने पडतात, जाग आली की लघवीला जावे लागते. यामुळे झोप मोडते, कमी होते. डोकेही अधूनमधून दुखते. कृपया यावर, मुख्यतः स्वप्ने पडू नयेत यासाठी उपाय सुचवावा. प्रोस्टेटची औषधे सुरू आहेत.
... विचारे

उत्तर - असंबद्ध स्वप्ने पडण्यामागे सहसा मनाची अशांतता कारणीभूत असते. यासाठी सकाळ-संध्याकाळ पाच मिनिटांसाठी ज्योतिध्यान करणे, ॐकार म्हणणे किंवा ऐकणे हे उत्तम होय. बरोबरीने रात्री झोपताना ‘निद्रासॅन’ गोळ्या, नाकात साजूक तुपाचे दोन-तीन थेंब, टाळूवर ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’ लावणे हे उपाय योजता येतील. मनातील, मेंदूतील दोष कमी करण्यासाठी ‘संतुलन ब्रह्मलीन घृता’चाही उत्तम उपयोग होताना दिसतो. रात्री झोपण्यापूर्वी पादाभ्यंग करणेही चांगले. 

गेल्या दोन-तीन वर्षांपासून अंगाला खाज येते, प्रामुख्याने मांड्या व पाठीला खाज येते. खाजवल्यावर पुरळ, लालसर रेषा उठतात. कृपया उपाय सांगावा, पथ्ये सुचवावीत. बऱ्याच वेळा शौचाला साफ होत नाही.
.... अशोक

उत्तर - सहसा असा त्रास रक्‍तदोषाशी संबंधित असतो. रक्‍तदोष वाढू नये यासाठी शौचाला साफ होणे व आहारात पथ्य सांभाळणे महत्त्वाचे असते. शौचाला साफ होण्यासाठी दोन्ही जेवणांनंतर ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचा, तसेच कपभर कोमट पाण्यात दोन चमचे साजूक तूप टाकून घेण्याचा उपयोग होईल. रक्‍तशुद्धीसाठी एक-एक चमचा पंचतिक्‍त घृत घेणे, ‘संतुलन पित्तशांती’ या गोळ्या घेणे, महामंजिष्ठादी काढा घेणे हे उपाय योजता येतील. पथ्यामध्ये वेळेवर जेवणे व जागरणे टाळणे हे महत्त्वाचे आहारात तांदूळ, ज्वारी, मूग, नाचणी, वेलीवर्गीय फळभाज्या, फोडणीसाठी साजूक तूप या गोष्टी समाविष्ट करणे चांगले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question answer