प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे
Monday, 1 July 2019

मी  ४७ वर्षांची शिक्षिका असून, चाळिसाव्या वर्षी रजोनिवृत्ती झाली. माझी हाडे फार दुखतात. अर्धा तास बसून उठले की चालताना त्रास होतो. गुडघे फार दुखतात. झोपही गाढ लागत नाही. कृपया काय करू ते सुचवावे.
.....श्रीमती अस्मिता

मी  ४७ वर्षांची शिक्षिका असून, चाळिसाव्या वर्षी रजोनिवृत्ती झाली. माझी हाडे फार दुखतात. अर्धा तास बसून उठले की चालताना त्रास होतो. गुडघे फार दुखतात. झोपही गाढ लागत नाही. कृपया काय करू ते सुचवावे.
.....श्रीमती अस्मिता
उत्तर -
रजोनिवृत्ती लवकर होणे, हाडांमध्ये-सांध्यांमध्ये वेदना होणे ही सर्वच लक्षणे वात असंतुलनाशी संबंधित असतात. यावर रोज रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण अंगाला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’, गुडघ्यांना ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. नियमित अभ्यंगाने शांत झोप लागण्यासही मदत मिळेल. वातसंतुलनासाठी ‘संतुलन वातबल’ गोळ्या, ‘कॅल्सिसॅन’, प्रवाळपंचामृत गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. रोज सकाळी ‘मॅरोसॅन’ घेणे, कपभर दुधात चमचाभर खारीक पूड टाकून उकळलेले दूध घेणे, डिंकाचा लाडू खाणे याचाही उपयोग होईल. सकाळ-संध्याकाळ तूप-साखरेसह प्रशांत चूर्ण घेणेही श्रेयस्कर.

आम्ही सर्व कुटुंबीय आपले ‘फॅमिली डॉक्‍टर’मधील लेख व प्रश्नोत्तरे नियमित वाचतो. यातील मार्गदर्शनाचा आम्हाला खूप उपयोग होतो. माझा मुलगा ३४ वर्षांचा आहे. त्याला गेल्या महिन्यापासून जेवणानंतर किंवा पाणी प्यायल्यानंतर खूप ढेकर येतात. पोट जड वाटते, रात्री जाग आल्यास तेव्हाही हा त्रास जाणवतो व त्यामुळे पुढे झोप येत नाही. घरच्या घरी आले-लिंबू घेऊन पाहिले, पण उपयोग नाही. कृपया आपण उपाय सुचवावा.
..... कुलकर्णी
उत्तर -
दिवसभर प्यायचे पाणी अगोदर उकळलेले व गरम असताना पिणे चांगले. अर्ध्या लिंबावर दोन चिमूट जिरे पूड, एक चिमूट हळद, एक चिमूट ओव्याची पूड, थोडासा हिंग आणि चवीनुसार सैंधव मीठ भुरभुरवून ते लिंबू छोट्या कढईत किंवा पळीत मंद आचेवर गरम करावे, खदखदू लागले की उष्णता देणे बंद करून त्याचा रस काढावा व ते जेवणाच्या अगोदर घ्यायला द्यावे. यामुळे बरे वाटेल. जेवणानंतर ताकामध्ये अर्धा चमचा लवणभास्कर चूर्ण व ‘संतुलन अन्नयोग गोळ्या’ देण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर ‘सॅनकूल’ चूर्ण घेणे, पोटावर तेल लावून गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे या उपायांचाही फायदा होईल. रोज चालायला जाणे, सूर्यनमस्कार करणे उत्तम. हा त्रास पूर्ण बंद होईपर्यंत तेल, गहू, बाहेरचे पदार्थ आहारातून वर्ज्य करणेसुद्धा उत्तम.

मला गेल्या वीस वर्षांपासून आम्लपित्ताचा त्रास आहे. काहीही खाल्ले तरी त्याचे पोटात आम्लात रूपांतर होते, छातीत अतिशय जळजळते. अँटासिड घेतली की तात्पुरते छान वाटते. त्रास कायमस्वरूपी नष्ट होण्यासाठी उपाय सुचवावा.
..... जयेंद्र शिंदे
उत्तर -
रोगाची तीव्रता आणि दीर्घता लक्षात घेता यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने विरेचन व बस्ती हे उपचार करून घेणे सर्वांत चांगले. कारण आमाशय, ग्रहणी, लहान आतड्याच्या भिंतींमध्ये साठून राहिलेले पित्त जोपर्यंत निघून जात नाही, तोपर्यंत पूर्ण बरे वाटणार नाही, बरोबरीने रोज दिवसातून दोन-तीन वेळा मूठभर लाह्या खाण्याचा उपयोग होईल. सकाळी उठल्यावर ‘संतुलन पित्तशांती’च्या दोन गोळ्या व जेवणानंतर कामदुधा, प्रवाळपंचामृत या गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. काही दिवस तेल, गहू, आंबट पदार्थ, तिखट पदार्थ आहारातून पूर्ण टाळण्याचा उपयोग होईल. विरेचन, बस्तीनंतर दर पंधरा दिवसांनी एरंडेल घेऊन पोट साफ करण्याचाही फायदा होईल. 

माझे वय २५ वर्षे असून, मला वर्षभर घाम येतो. तसेच माझ्या डोक्‍यावरचे केस विरळ होऊ लागले आहेत. घामाशी याचा संबंध असतो का?
...... नीलेश
उत्तर -
वर्षभर घाम येणे आणि कमी वयात केस विरळ होणे या दोन्ही गोष्टी शरीरात उष्णता जास्त असण्याशी संबंधित असतात. ही उष्णता कमी करण्यासाठी रोज सकाळी गुलकंद किंवा मोरावळा घेण्याचा उपयोग होतो. सकाळ-संध्याकाळ  ‘संतुलन पित्तशांती’ या गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. स्नानाच्या वेळी अंगाला साबणाऐवजी ‘सॅन मसाज पावडर’ व कुळीथ पीठ यांचे समभाग मिश्रण लावण्यानेही घामाचे प्रमाण कमी होईल. आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करणे, केसांना ‘व्हिलेज हेअर सिद्ध तेल’ लावणे, ढोबळी मिरची, दही, टोमॅटो, गवार, वांगे, आंबवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ या गोष्टी आहारातून टाळणे श्रेयस्कर. 

माझे वय ६२ वर्षे आहे. मधुमेह असून, त्यासाठी गोळी चालू आहे. माझा उजवा खांदा आणि दंड खूप दुखतो आहे. हाताची हालचाल करताना खूप वेदना होतात. फ्रोजन शोल्डर आहे, असे डॉक्‍टर म्हणतात. कृपया वेदना कमी होण्यासाठी उपाय सुचवावा.
.... जाधव
उत्तर -
मधुमेह फक्‍त गोळ्यांनी नियंत्रणात ठेवणे पुरेसे नसते, कारण त्यामुळे साखर नियंत्रित राहिली, तरी आतल्या आत मधुमेह शरीर पोखरत असतो, परिणामी शरीरात वातदोष वाढत जातो. त्यामुळे मूळ मधुमेहावर वैद्यांच्या सल्ल्याने योग्य औषधे सुरू करणे आवश्‍यक. बरोबरीने मान, दोन्ही खांदे व दंड या भागावर दिवसातून दोन-तीन वेळा ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा घरच्या घरी दशमूळ तेलाची बस्ती घेण्याचाही चांगला उपयोग होईल. काही दिवस ‘संतुलन वातबल गोळ्या’, योगराज गुग्गुळ गोळ्या घेणेही चांगले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question answer