प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 21 April 2017

माझ्या बहिणीला युरिक ऍसिड वाढण्याचा त्रास आहे. त्यामुळे तिचे दोन्ही पाय सुजतात. चालताना त्रास होतो. तरी कृपया आपण मार्गदर्शन करावे. 
.... अमृता 

माझ्या बहिणीला युरिक ऍसिड वाढण्याचा त्रास आहे. त्यामुळे तिचे दोन्ही पाय सुजतात. चालताना त्रास होतो. तरी कृपया आपण मार्गदर्शन करावे. 
.... अमृता 

उत्तर - युरिक ऍसिड कमी करण्यासाठी आहार आणि औषधोपचार यांची सांगड घालणे आवश्‍यक असते. शरीरात वाढलेले युरिक ऍसिड कमी करण्यासाठी तसेच शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी पुनर्नवासव, गोक्षुरादी गुग्गुळ, "संतुलन पित्तशांती गोळ्या' घेण्याचा उपयोग होईल. पुनर्नवाघनवटी घेण्याचा तसेच पाण्यात रात्रभर धणे, वाळा, अनंतमूळ, ज्येष्ठमध यापैकी मिळतील ती द्रव्ये भिजत घालून सकाळी गाळून घेतलेले पाणी पिण्याचाही उपयोग होईल. नियमित पादाभ्यंग करणे, पाय मीठ मिसळलेल्या कोमट पाण्यात दहा-पंधरा मिनिटांसाठी बुडवून ठेवणे हे सुद्धा चांगले. तेल, कच्चे मीठ, आंबट फळे, आंबवलेले पदार्थ, वांगे, ढोबळी मिरची, गवार, फ्लॉवर या गोष्टी आहारातून वर्ज्य करणे हे सुद्धा आवश्‍यक. या उपायांचा फायदा होईलच, बरोबरीने तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन, बस्ती घेणेसुद्धा उत्तम होय. 

मी "फॅमिली डॉक्‍टर' नियमित वाचते. आपले मार्गदर्शन फार आवडते व मला त्याचा उपयोगही होतो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून माझे अंग खूप खाजते. सर्व अंग कोरडे पडल्यासारखे झाले आहे. दुपारी झोपू नये असे सांगतात, पण दुपारी झोपले नाही तर डोळे, हात, पाय खूपच जळजळतात. हातापायांतून वाफा निघाल्यासारखे वाटते. या सर्वांचा माझ्या उत्साहावर, कामावर फार परिणाम झाला आहे. कृपया मार्गदर्शन करावे. मी रोज साबण वापरते. ते योग्य आहे का? .... अर्चना 
उत्तर - एकंदर सर्व वर्णनावरून शरीरात उष्णता व कोरडेपणा वाढला आहे असे दिसते. हा कमी होण्यासाठी रोज पंचामृत, रात्री पाण्यात भिजवलेले बदाम, घरी बनविलेले साजूक तूप, शतावरी कल्प टाकून दूध या गोष्टी रोजच्या आहारात समाविष्ट करण्याचा फायदा होईल. रात्री झोपण्यापूर्वी अंगाला अभ्यंग आणि तळपायांना पादाभ्यंग करण्याचाही उपयोग होईल. स्त्रियांच्या बाबतीत शरीरातील एकंदर उष्णता व कोरडेपणा कमी होण्यासाठी योनीपिचू हा एक उत्तम उपाय असतो. यादृष्टीने रोज "फेमिसॅन सिद्ध तेला'चा पिचू वापरणे चांगले. खाज हे लक्षण शरीरात कफ आणि पित्तदोष वाढल्याचे निदर्शक असते आणि दुपारी झोपल्याने कफ-पित्त हे दोन्ही दोष वाढतात. तेव्हा दुपारी विश्रांती घ्यायची झाली तर ती आरामखुर्चीत बसल्या बसल्या डुलकी घेण्याइतपत घेणे चांगले. दुपारी गादीवर पूर्ण आडवे होऊन गाढ झोपणे टाळणेच श्रेयस्कर. साबणापेक्षा उटणे लावून स्नान करणे अधिक चांगले. सर्व रक्‍तशुद्धिकर आणि त्वचेला पोषक द्रव्यांनी बनविलेली "सॅन मसाज पावडर' आणि मसूर पीठ हे मिश्रण वापरता येईल. काही दिवस रक्‍तशुद्धीसाठी "मंजिष्ठासॅन', "संतुलन प्रशांत चूर्ण' घेण्याचाही उपयोग होईल. 

सकाळी नाश्‍त्याच्या अगोदर पंचामृत घेण्यास सांगितले जाते, त्याचा काय फायदा होतो? तसेच त्यात साखरेऐवजी गूळ टाकला तर चालतो का? कृपया मार्गदर्शन करावे. ..... आनंद करंदीकर 
उत्तर - पंचामृत हे घरच्या घरी करता येण्याजोगे एक श्रेष्ठ रसायन आहे असे म्हणता येते. नियमित पंचामृत घेण्याने प्रतिकारशक्‍ती चांगली राहते, एकंदर स्टॅमिना, ताकद, उत्साह नीट राहण्यास मदत मिळते. हृदय, मेंदू, पाचही ज्ञानेंद्रिये यांची कार्यक्षमता व्यवस्थित राहण्यासही फायदा होतो. त्वचा सतेज राहण्यासाठी, केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, तसेच बुद्धिजीवी वर्गातील सर्वांसाठी, विद्यार्थ्यांसाठी पंचामृत हे साधे-सोपे व प्रभावी रसायन होय. गूळ व साखर हे दोन्ही पदार्थ गोड असले तरी साखर थंड आणि गूळ उष्ण असतो. म्हणून पंचामृतात साखरेची योजना अधिक सयुक्‍तिक आहे. मात्र साध्या साखरेऐवजी साखरेपासून बनविलेले पण शतावरी, केशर, सुवर्णयुक्‍त "संतुलन अमृतशतकरा' घेण्याने पंचामृताचे फायदे अनेक पटींनी वाढतात असा अनुभव आहे. 

मला बऱ्याच दिवसांपासून दमा आहे, मात्र मी विदर्भात असेपर्यंत तो प्राणायामाने आटोक्‍यात राहतो, पण थंड हवामानाच्या ठिकाणी आल्यास फार सर्दी-पडसे होते. अगदी झोपून राहावे लागते. माझ्या मुलामुलींना व नातवांनासुद्धा मी दम्याचा अत्यंत वाईट वारसा दिलेला आहे. तीन वर्षांच्या एका नातवाला तर दर आठ-पंधरा दिवसांतून त्रास होतो. कृपया मार्गदर्शन करावे. ...... पाटील 
उत्तर - उष्ण हवामानापेक्षा थंड हवामानात सर्दी-खोकला-दम्याचा त्रास वाढणे स्वाभाविक असते, मात्र श्वसनसंस्थेची प्रतिकारशक्‍ती सुधारावी यासाठी प्रयत्न नक्की करता येतात. यादृष्टीने रोज सितोपलादी चूर्ण, "ब्रॉंकोसॅन सिरप' घेण्याचा उपयोग होईल. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली श्वासकुठार, "प्राणसॅन योग' चूर्ण घेण्याचाही फायदा होईल. थंड वातावरणात त्रास होण्याअगोदरच छाती-पोटाला तेल लावून रुईच्या पानांनी शेकण्याचा उपयोग होईल. हे सर्व उपाय छोट्या नातवालाही योजता येतील, पण त्याला दर आठ-पंधरा दिवसांनी त्रास होतो आहे, या दृष्टीने एकदा तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणेही चांगले. मात्र हा दम्याचा वारसा पुढच्या पिढीत जाऊ नये यासाठी वेळीच गर्भसंस्कारांची योजना करणे श्रेयस्कर होय. गर्भधारणेपूर्वी योग्य उपचार घेतले, विशेषतः शरीरशुद्धी करून घेतली तर अशा केसेसमध्ये उत्तम गुण येताना दिसतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question & answer