प्रश्नोत्तरे

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
शुक्रवार, 19 मे 2017

माझ्या मुलीचे हिमोग्लोबिन कमी आहे, त्यामुळे तिला अशक्‍तपणा जाणवतो. यावर काय उपाय करावा?.....श्री. नंद टंडन 

माझ्या मुलीचे हिमोग्लोबिन कमी आहे, त्यामुळे तिला अशक्‍तपणा जाणवतो. यावर काय उपाय करावा?.....श्री. नंद टंडन 
उत्तर - स्त्रियांचे हिमोग्लोबिन, आयर्न चांगले राहावे यासाठी कायमच प्रयत्नशील राहणे आवश्‍यक असते. आयुर्वेदात रक्‍तशुद्धी, रक्‍तसंपन्नतेचे म्हणून जे उपाय सुचवले आहेत ते यासाठी उपयोगी पडताना दिसतात. मुलीला रोज सकाळ-संध्याकाळ 1-1 चमचा धात्री रसायन किंवा "सॅनरोझ' देणे चांगले. दुधातून शतावरी कल्प किंवा "संतुलन शतानंत कल्प' देणे, "संतुलन लोहित प्लस' गोळ्या घेणे हे सुद्धा चांगले. रोजच्या आहारात काळ्या मनुका, खजूर, डाळिंब, सफरचंद, केशर, गूळ-तूप यांचा समावेश करणेही उत्तम. स्वयंपाक करताना लोखंडी पळी, लोखंडी कढई, लोखंडी तवा वगैरे उपकरणांची वापर करण्यानेही शरीरातील लोहतत्त्व संतुलित राहण्यास मदत मिळते असा अनुभव आहे. या उपायांचा फायदा होईलच, तरीही हिमोग्लोबिन कमी होण्यामागचे नेमके कारण समजण्यासाठी आणि त्यावर योग्य उपचार सुचविण्यासाठी एकदा तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे सर्वांत चांगले. 

मी आपले सर्व लेख तसेच सर्व कार्यक्रम पाहते व त्यानुसार उपाययोजना करते. मला 16 वर्षांपासून ऍलर्जिक दम्याचा त्रास आहे. आपल्या मार्गदर्शनानुसार मी मध-तुपामधून सितोपलादी चूर्ण घेते, त्यामुळे सततची सर्दी, खोकला येणे थांबले, दमा सुद्धा खूपच आटोक्‍यात आहे. परंतु मला वारंवार ताप येत असतो. रक्‍ताची तपासणी केली तर टायफॉईड असल्याचे निदान होते. औषधे घेतली की ताप बरा होतो, परंतु थोडे श्रम झाले की थकवा येतो आणि ताप येतो. कृपया मार्गदर्शन करावे....श्रीमती माया फिरके 
उत्तर - तापाच्या मुळावर उपचार करण्यासाठी खरे तर वैद्यांच्या सल्ल्याने औषधे घेण्याची आवश्‍यकता आहे. तत्पूर्वी काही दिवस रोज अर्धा बेहडा, बोटाएवढी ज्येष्ठमधाची काडी, आणि एक पिकलेले अडुळशाचे पान यांचा चार कप पाण्यात एक कप होईपर्यंत उकळून तयार केलेला काढा घेण्याचा उपयोग होईल. चांगल्या प्रतीचे गुळवेळ सत्त्व मिळाल्यास रोज एक अष्टमांश चमचा गुळवेल सत्त्व दुधासह घेण्याचाही फायदा होईल. नियमित पादाभ्यंग करणे, प्यायचे पाणी उकळून घेणे, उकळताना त्यात दोन चिमूट "जलसंतुलन' चूर्ण टाकणे, घरात सकाळ-संध्याकाळ "संतुलन प्युरिफायर धूप' करणे या उपायांचाही फायदा होईल. वैद्यांच्या सल्ल्याने काही दिवस श्वासकुठार तसेच "सॅन अमृत' गोळ्या घेण्यानेही बरे वाटेल. 

मी 21 वर्षांची आहे. मला दोन वर्षांपासून टॉन्सिलायटिसचा त्रास आहे. त्यामुळे मला श्वास घेताना तसेच बोलताना त्रास होतो. घसा नेहमी ब्लॉक झाल्यासारखा वाटतो. यावर उपाय सुचवावा....कु. ऐश्वर्या 
उत्तर - टॉन्सिलायटिसवर सितोपलादी चूर्ण उत्तम गुणकारी असते. सकाळ-संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा संतुलन सितोपलादी चूर्ण मधाबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर घेण्याचा फायदा होईल. काही दिवस "ब्रॉंकोसॅन सिरप' घेण्याचाही उपयोग होईल. शक्‍य तेव्हा उकळून घेतलेले गरम पाणी पिणे हे सुद्धा चांगले. घशात कफ साठून राहिल्यासारखे वाटते ते कमी होण्यासाठी गंडुष करण्याचा उपयोग होत असतो. यादृष्टीने सकाळी उठल्यावर मध-पाण्यात चमचाभर इरिमेदादी तेल किंवा "संतुलन सुमुख तेल' मिसळून ते पाणी तोंडात 8-10 मिनिटांसाठी धरून ठेवणे व नंतर टाकून देणे हा उपाय करता येईल. दही, श्रीखंड, फणस, सीताफळ, तळलेले पदार्थ आहारातून टाळणे चांगले. या उपचारांनी बरे वाटेलच परंतु दोन वर्षांपासून टॉन्सिल्सला सूज आहे त्यादृष्टीने एकदा तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे चांगले होय. 

माझे वय 25 वर्षे आहे. मी काहीही गोड पदार्थ किंवा दुधाचे पदार्थ खाल्ले की मला कफाचा त्रास होतो, तसेच माझे वजनही कमी आहे. यावर काही मार्गदर्शन करावे ही विनंती.....श्री. हरेश 
उत्तर - आपण जे अन्न सेवन करतो त्याचे योग्य पचन झाले की त्यातून शक्‍ती तयार होते, सातही धातूंचे पोषण होत राहते. मात्र पचन नीट होत नसले तर धातूंचे पोषण होण्याऐवजी, शक्‍ती तयार होण्याऐवजी दोषस्वरूप कफ दोष तयार होतो. गोड पदार्थ तसेच दुधापासून बनविलेले पदार्थ कफकारकही असतात, त्यामुळे काही दिवस यांचे प्रमाण कमी करून बरोबरीने पचनशक्‍ती सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आहारात आल्याचा वापर करणे, जेवणापूर्वी छोटा आल्याचा तुकडा सैंधव मिठासोबत खाणे, प्यायचे पाणी उकळून घेणे, जेवताना शक्‍यतो कोमट-गरम पाणी पिणे हे पचन सुधारण्यास मदत करणारे उपाय होत. जेवणानंतर "संतुलन अन्नयोग' गोळ्या घेण्याचाही फायदा होईल. आहारात गूळ, मिरी, दालचिनी, लवंग, तमालपत्र, जिरे, सुंठ वगैरे कफशामक आणि पचनास मदत करणारे मसाल्याचे पदार्थ अंतर्भूत करणे, मिठाया व दुधापासून बनविलेले पदार्थ सूर्यास्तानंतर खाणे टाळणे हे सुद्धा श्रेयस्कर होय. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question & answer