esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

question answer

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

मला उच्च रक्‍तदाबाचा त्रास आहे, त्यासाठी मी रोज एक गोळी घेतो. मला त्रास म्हणजे डाव्या हाताच्या पंजाला सतत मुंग्या येतात, तसेच डाव्या हाताचा अंगठा दुखतो, तसेच डाव्या डोळ्याची पापणी खाली उतरते. न्यूरॉलॉजिस्टचा सल्ला घेतला असता, नसेवर दाब पडल्यामुळे असे होते असे समजले. मात्र त्यांच्या औषधांमुळे फरक पडला नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
.... यशवंत

उत्तर - रक्‍तदाबासाठी गोळी घेतली आणि रक्‍तदाब नियंत्रणात राहिला म्हणजे सर्व व्यवस्थित चाललेले आहे असे समजणे योग्य नसते. मुळापासून उपचार न झालेला रक्‍तदाब शरीरात कुठे ना कुठे समस्या तयार करत असतो. नसा असोत, हृदय असो किंवा रक्‍तवाहिन्या असोत, त्यांचे काम नीट चालण्यासाठी रक्‍तदाब संतुलित असणे महत्त्वाचे असते. तेव्हा रक्‍तदाबावर खरे उपचार करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे उत्तम. बरोबरीने पाठीचा कणा, मान आणि संपूर्ण डाव्या हाताला दिवसातून दोन-तीन वेळा ‘संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईल. वातशामक तसेच नसांची कार्यक्षमता वाढविणाऱ्या द्रव्यांनी संस्कारित केलेले ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’ एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ घेण्याचाही उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकण्याचा, ‘संतुलन वातबल गोळ्या’ घेण्याचाही उपयोग होईल. नसेवरचा दाब नाहीसा होण्यासाठी जे वातसंतुलन आवश्‍यक आहे, त्यासाठी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली बस्ती, पिंडस्वेदन वगैरे विशेष उपचार करून घेणेही श्रेयस्कर.

आम्हाला जुळ्या मुली असून, त्यातील छोटीची तब्येत नाजूक आहे. तिचे वजनही कमी आहे, तसेच ती वारंवार आजारी पडते. कृपया वजन, उंची वाढण्यासाठी तसेच सुदृढतेसाठी काही उपाय सुचवावेत. मुली नऊ वर्षांच्या आहेत.
... गणेश 

उत्तर - जुळ्या मुलांची, खरे तर गरोदरपणापासून अधिक काळजी घेणे आवश्‍यक असते. दोघींचीही तब्येत चांगली राहावी, सर्व विकास व्यवस्थित व्हावा यासाठी आयुर्वेदातील मार्गदर्शनाचा उपयोग करून घेता येईल. यादृष्टीने दोघींनाही नियमित अभ्यंग करणे चांगले. ‘संतुलन चैतन्य कल्प’ घालून दूध देणे, रोज सकाळी एक चमचाभर च्यवनप्राश, धात्री रसायन देणे हेसुद्धा फायदेशीर. प्रतिकारशक्‍ती चांगली राहावी व वारंवार आजारपण येऊ नये यासाठी लहान मुलांना मधाबरोबर सितोपलादी चूर्ण देण्याचाही उत्तम गुण येताना दिसतो. मात्र सितोपलादी चूर्ण शुद्ध व नैसर्गिक द्रव्यांपासून बनविलेले हवे. बौद्धिक विकासाच्या दृष्टीने दोघांनाही ‘संतुलन अमृतशर्करा’युक्‍त पंचामृत देण्याचा फायदा होईल. बाकी आहार संतुलित, पौष्टिक, सकस असण्याकडे लक्ष देणेही चांगले.

मी  ५० वर्षांची आहे. मला गेल्या दहा वर्षांपासून वाताचा त्रास होतो. सर्व अंग दुखते. अंग दाबून घेतले की जरा बरे वाटते. डाव्या गुडघ्यामधली कूर्चा खूप झिजली आहे असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. इतर सर्व तपासण्या व्यवस्थित आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.
... विनिता

उत्तर - बऱ्याच वर्षांपासून वाताचा त्रास होतो आहे, तेव्हा एकदा तज्ज्ञ वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे उत्तम होय. तत्पूर्वी अंगाला ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’, गुडघ्यांना ‘संतुलन शांती सिद्ध तेल’ लावण्यास सुरवात करता येईल. सांध्यांची झीज भरून आणण्यासाठी आयुर्वेदात चांगले उपाय असतात. विशेषतः वातशामक तेलाची बस्ती घेणे, स्थानिक बस्ती, विशेष लेप लावणे यांचासुद्धा चांगला उपयोग होताना दिसतो. आहारात खारीक, खसखस, डिंकाचा लाडू, दूध यांचा समावेश करणे, खारकेच्या चूर्णाबरोबर उकळळेले दूध घेणे, आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा किमान चार-पाच चमचे या प्रमाणात समावेश करणे चांगले. वातशमनासाठी ‘संतुलन वातबल गोळ्या’, ‘संतुलन प्रशांत चूर्ण’, दशमूलारिष्ट आसव घेण्याचाही फायदा होईल.  

माझे वय ३४ वर्षे आहे. माझा रंग गोरा आहे, मात्र सध्या चेहऱ्यावर काळे डाग आले आहेत. पुष्कळ उपाय केले; परंतु उपयोग झाला नाही. कृपया उपाय सुचवावा.
... पूनम

उत्तर - त्वचेवर, विशेषतः चेहऱ्यावर, काळे डाग येणे हे स्त्री असंतुलनाचे आणि रक्‍तामध्ये दोष असल्याचे एक लक्षण असते. या दोन्ही दोषांवर ‘फेमिसॅन तेला’चा योनी पिचू वापरण्याचा उपयोग होईल. बरोबरीने पंचतिक्‍त घृत घेण्याचा, ‘मंजिष्ठासॅन गोळ्या’ घेण्याचा उपयोग होईल. सहाणेवर हळकुंड, अनंतमूळ, बदाम, चंदन, दालचिनी यापैकी मिळतील ती द्रव्ये उगाळून तयार केलेला लेप चेहऱ्याला लावून ठेवण्याचा किंवा तयार ‘सॅन पित्त फेस पॅक’ लावण्याचा उपयोग होईल. रोज सकाळी चेहऱ्याला मलईमिश्रित ‘सॅन पित्त फेस पॅक’ लावून ‘संतुलन सुमुख सिद्ध तेला’चे कवल, गंडुष करण्याने म्हणजे अर्धा-पाऊण चमचा तेल नुसते किंवा थोड्या पाण्यात मिसळून तोंडात धरून, अधूनमधून खुळखुळवण्याने चेहऱ्याची त्वचा नितळ, सतेज आणि उजळ बनते असा अनुभव आहे.

मी ज्येष्ठ नागरिक आहे. मला अधूनमधून ॲसिडिटीचा त्रास होतो, त्यामुळे चक्कर येते. चक्कर आली की तोल जाऊन पडेन की काय असे वाटते. ॲसिडिटी वाढू नये, यासाठी मी तेलकट-तुपकट वगैरे काही खात नाही. तरी कृपया त्रास होऊ नये यासाठी मार्गदर्शन करावे.
..... उषा

उत्तर - तेलकट-तुपकट न खाणे चांगले आहेच, मात्र ॲसिडिटी वाढण्यामागे अवेळी जेवणे, उपवास करणे, चिंता करणे, झोप शांत नसणे वगैरे बरीच कारणे असू शकतात. आंबट, खारट, तिखट गोष्टी सातत्याने खाण्यानेही ॲसिडिटी वाढू शकते. त्यामुळे नेमके कारण शोधून काढून ते बंद करणे ही उपचाराची पहिली पायरी होय. बरोबरीने दिवसातून दोन-तीन वेळा साळीच्या लाह्या खाणे, सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन पित्तशांती’, कामदुधा या गोळ्या घेणे, आठवड्यातून दोन वेळा पादाभ्यंग करणे, आहारात दूध, गुलकंद, साजूक तूप, मनुका, अंजीर वगैरे पित्तशामक गोष्टींचा समावेश करणे, रात्री झोपण्यापूर्वी टाळू, गुदभाग व नाभीच्या ठिकाणी एक-दोन थेंब एरंडेल तेल लावणे हे उपाय योजले तर पित्ताचा त्रास होणार नाही, पर्यायाने चक्कर वगैरे त्रासांनाही प्रतिबंध होईल.