esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com

‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीचे आम्ही नियमित वाचक आहोत. यातील लेखांचा भरपूर फायदा होत असतो. आपले ‘निवडक फॅमिली डॉक्‍टर’ हे पुस्तकही संग्रही आहे. मला पाळीच्या आधी आठवडाभर जिभेवर चट्टे येतात. तिखटाचा स्पर्शही चालत नाही. जीभ वेगळ्या प्रकारे संवेदनशील होते. पाळी सुरू झाली की सदर त्रास क्रमाक्रमाने बरा होतो. कृपया मार्गदर्शन करावे.
... क्षमा

उत्तर - पाळी येण्याच्या आधी शरीरात अतिरिक्‍त उष्णता वाढत असल्याचे हे एक निदर्शक लक्षण आहे. यावर ‘फेमिसॅन सिद्ध तेला’चा पिचू नियमितपणे वापरण्याचा उपयोग होईल. सकाळ-संध्याकाळ दोन-दोन ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेणे हेसुद्धा चांगले. आठवड्यात दोन-तीन वेळा पादाभ्यंग करणे, सकाळी खात्रीचा शुद्ध गुलकंद, मोरावळा किंवा धात्री रसायन यांसारखे शीतल गुणधर्माचे रसायन घेणे, आहारात घरी बनविलेले साजूक तूप, शतावरी कल्प घालून दूध, ताजे लोणी व खडीसाखर, रात्रभर पाण्यात भिजविलेले बदाम, मनुका, साळीच्या लाह्या वगैरे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत करणारे पदार्थ समाविष्ट करणे चांगले. वांगे, ढोबळी मिरची, दही, गवार, शीतपेये, अंडी, मांसाहार आहारातून टाळणे हेसुद्धा चांगले. 

*********************************************

‘फॅमिली डॉक्‍टर’मधील आपले मार्गदर्शन बहुमोल आहे. माझे वय ३५ वर्षे असून मी दर शनिवारी सुटीच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर एक तास झोपतो. मात्र उठल्यानंतर मान, पाठ, कंबर, हाताची बोटे, पोटऱ्या या ठिकाणी प्रचंड वेदना जाणवतात, काय करावे?
.... सावंत

उत्तर - ‘निदानं परिवर्जनम्‌’ म्हणजे ज्यामुळे त्रास होतो ते कारण टाळणे हे सर्वांत महत्त्वाचे असल्याने दुपारी झोपणे टाळावे हे श्रेयस्कर. आयुर्वेदात तरुण वयात दुपारची झोप अप्रशस्त सांगितलेली आहे. दुपारी झोपल्याने शरीरातील सर्व स्रोतसांमध्ये अडथळा उत्पन्न होतो, कफदोष वाढतो आणि यामुळे वाताच्या हलनचलनाला अडथळा आल्याने वातदोष प्रकुपित झाल्याने वेदना होतात, अंग जडावते. तेव्हा दुपारी न झोपणेच चांगले. मात्र सुटीच्या निमित्ताने विश्रांती घ्यायची असेल तर आरामखुर्चीत बसल्याबसल्या डुलकी घ्यायला हरकत नाही. बसलेल्या स्थितीत गाढ झोप लागली तरी नंतर असा त्रास होत नाही हा अनेकांचा अनुभव आहे. 

*********************************************

मी ‘फॅमिली डॉक्‍टर’मधील ‘प्रश्नोत्तरे’ नियमित वाचतो. मला पूर्वी टीबीचा आजार होता. सतत दोन वर्षे उपचार घेऊन आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. परंतु गेल्या वर्षापासून दर तीन-चार महिन्यांनी मला खोकल्यावर किंवा ठसका लागल्यावर थुंकीतून थोडेसे रक्‍त पडते. फुफ्फुसे कमजोर झाल्याने असा त्रास होतो, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. कृपया मार्गदर्शन करावे.. माझे वय ४० वर्षे आहे.
.... धानके

उत्तर - शरीरातून कुठूनही रक्‍तस्राव होणे हे लक्षण चांगले नाही व त्यावर योग्य उपचार व्हायलाच हवेत. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढावी यासाठी नियमितपणे ‘संतुलन सितोपलादी चूर्ण’ घेण्याचा उपयोग होईल. सदर चूर्ण दिवसातून दोन वेळा अर्धा-अर्धा चमचा या प्रमाणात मधाबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर घेता येईल. रात्री झोपण्यापूर्वी छाती व पाठीला हलक्‍या हाताने ‘संतुलन अभ्यंग सिद्ध तेल’ जिरविण्याचाही फायदा होईल. सकाळच्या वेळी दीर्घश्वसन, अनुलोम-विलोम करणे, शुद्ध मोकळ्या हवेत चालायला जाणे, घरात ‘संतुलन प्युरिफायर’सारखा हवा शुद्ध होण्यास मदत करणारा धूप करणे सुद्धा चांगले. दिवसातून एकदा अडुळशाच्या ताज्या पानांचा एक चमचा रस व खडीसाखर अर्धा चमचा हे मिश्रण घेण्याचाही उपयोग होईल. या सर्व उपायांचा फायदा होईलच, तरीही रोगाचा इतिहास लक्षात घेता एकदा तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे श्रेयस्कर होय.