प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

माझा नातू सहा वर्षांचा आहे. त्याचा शारीरिक, बौद्धिक विकास इतर मुलांच्या तुलनेत कमी आहे. आयुर्वेदिक उपचार सुरू आहेत. सध्या तो चालतो; पण काका, मामा, आजी, आई असे मोजकेच शब्द बोलतो. कधी कधी काय बोलतो ते समजत नाही. तसेच, त्याचे केस फार गळतात. कृपया बोलणे सुधारण्यासाठी व केसांच्या समस्येसाठी उपाय सुचवावा. .... राधाकिसन काळे
उत्तर - लहान मुलांच्या बोलण्याच्या समस्येवर बौद्धिक विकासाला हातभार लावणारी आयुर्वेदिक औषधे आणि स्पीच थेरपीसाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेणे चांगले. बरोबरीने नातवाला सुवर्ण-केशरयुक्‍त ‘संतुलन अमृतशतकरायुक्‍त’ पंचामृत, ‘संतुलन ब्रह्मलीन घृत’, शतावरी कल्प घालून दूध देण्याचा उपयोग होईल. जटामांसी, अक्कलकरा, वेखंड वगैरे द्रव्यांचे चूर्ण जिभेवर चोळण्याचा, तसेच नियमित नस्य करण्याचा फायदा होईल. मुलांचा विकास लहान वयात झपाट्याने होत असतो, त्यादृष्टीने वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन आवश्‍यक ती रसायने, कल्प लवकरात लवकर सुरू करणे उत्तम होय. केसांच्या सामर्थ्यासाठी काही दिवस ‘हेअरसॅन गोळ्या’ देता येतील. नातवाचे पोट नीट साफ होते आहे ना आणि त्याच्या पोटात जंत नाहीत ना, याकडे लक्ष ठेवणे आणि त्याला चांगले पौष्टिक खाणे देणे आवश्‍यक आहे.  

मी  ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नियमित वाचक आहे, आपल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल आपणास धन्यवाद. मी सध्या चार महिन्यांची गर्भवती आहे. मला दूध घेतल्याने खूप कफ होतो. दूध, हळद, आले, पाणी टाकून घेतले तरी काही दिवसांतच हमखास सर्दी होते. गर्भारपणात दूध घेणे आवश्‍यक आहे. तरी, दुधाला काही पर्याय आहे का? .. . स्वाती
उत्तर -
 दुधाला पर्याय असा खरे तर काहीही नसतो. दूध शुद्ध नसले तर दूध न पचणे, दूध प्यायल्यानंतर कफ होणे वगैरे त्रास बऱ्याचदा होताना दिसतात. त्यामुळे सर्वप्रथम चांगले व खरे दूध म्हणजे भारतीय वंशाच्या गाईचे, संप्रेरकांचे इंजेक्‍शन न देता काढलेले, दूध जास्त काळ टिकावे या हेतूने कुठलीही प्रक्रिया न केलेले दूध मिळविण्याचा प्रयत्न करणे चांगले. हे दूध पुढील पद्धतीने संस्कारित करता येईल. अर्धा कप दुधात अर्धा कप पाणी, आठ- दहा वावडिंगाचे दाणे, पेराएवढा सुंठीचा तुकडा (चेचून घेतलेला) टाकून मंद आचेवर उकळण्यास ठेवावे. पाव कप पाणी उडून गेल्यावर गाळून घेऊन त्यात चमचाभर शतावरी कल्प, तसेच अर्धा चमचा सीतोपलादी चूर्ण टाकून प्यावे. या प्रकारे चांगले दूध मिळवून ते संस्कारित करून घेण्याने कफ होणे बंद होईल. तरीही आवश्‍यकता वाटली, तर काही दिवस ‘ब्राँकोसॅन सिरप’ घेता येईल. वैद्यांच्या सल्ल्याने ‘प्राणसॅन योग चूर्ण’ घेण्याचाही उपयोग होईल. गर्भारपणात नियमित दूध पिणे आवश्‍यक होय.

माझा मुलगा तीस वर्षांचा आहे. लहानपणी तो फारसा आजारी पडत नसे; परंतु हल्ली दोन-तीन वर्षांपासून तो सारखा खाकरत असतो. कधी कधी तर त्याला मोठा ठसका लागतो. अधूनमधून सीतोपलादी चूर्ण व मध घेत असतो. वारंवार खाकरणे बंद होण्यासाठी अजून काय उपचार करायला हवेत? उपाय सुचवावा ही विनंती.  .... पाटणकर  
उत्तर -
 वारंवार खाकरावे लागणे हे घशात कफदोष अडकून राहात असल्याचे एक लक्षण आहे. घसा, मुख, सायनस वगैरे ठिकाणी कफदोष साठून राहू नये, तसेच कफदोष निघून जावा यासाठी नियमित गंडुष करण्याचा उपयोग होतो. कफनाशक द्रव्यांनी संस्कारित केलेले एक चमचा इरिमेदादी तेल किंवा ‘संतुलन सुमुख तेल’ आठ- दहा मिनिटांसाठी तोंडात धरून ठेवणे म्हणजे गंडुष करणे. रोज सकाळी स्नानाच्या आधी याप्रकारे गंडुष करण्याचा उपयोग होईल. सीतोपलादी चूर्ण काही दिवस नियमित घेणे चांगलेच आहे. बरोबरीने गवती चहा, आले, पुदिना, तुळशी, दालचिनी यातील मिळतील त्या द्रव्यांचा चहा करून पिण्याचाही फायदा होईल. शरीरात अतिरिक्‍त प्रमाणात कफदोष तयार होणे हे पचन व्यवस्थित होत नसल्याचे एक लक्षण आहे, त्यासाठी काही दिवस जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग गोळ्या’ घेण्याचाही उपयोग होईल.

जेवणानंतर व्यायाम करू नये असे सांगितले जाते; पण मग जेवणानंतर शतपावली करण्याची पद्धत योग्य कशी काय? 
उत्तर -
 जेवणानंतर व्यायाम करू नये हे खरे आहे. म्हणूनच आपल्याकडे दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी करण्याची, तर रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करण्याची पद्धत आहे. मात्र, बरोबरीने रात्रीचे जेवण हे पचण्यास सोपे आणि दुपारच्या निम्म्या प्रमाणात असणे अपेक्षित आहे. रात्रीचे जेवण वेळेवर केले, एखादे सूप व थोडासा भात किंवा मुगाची खिचडी किंवा भाजी-भाकरी असा साधा आहार असला, तर त्यानंतर शतपावली म्हणजे दहा-पंधरा मिनिटे चालायला जाणे चांगले होय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com