प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

माझ्या मुलाचे अपेंडिक्‍सचे ऑपरेशन होऊन दोन महिने झाले आहेत. तरीही त्याला पोटात दुखणे, चक्कर येणे, डोके दुखणे, हे त्रास होत आहेत. त्याचे वय बारा वर्षे आहे. त्याला भूक नीट लागते. कृपया मार्गदर्शन करावे...... मानस

उत्तर - शल्यक्रियेनंतर त्रास होत आहे, त्यामुळे ज्यांनी शस्त्रकर्म केले त्या डॉक्‍टरांचा सल्ला घ्यायला हवा. शस्त्रकर्मामुळे काही समस्या निर्माण झाल्या नाहीत ना याची खात्री करून घेतलेली चांगली. चक्कर येणे, पोट दुखणे हे त्रास आहेत, त्यासाठी काही दिवस पित्तशामक उपचार घेऊन उपयोग होतो आहे का हे पाहता येईल. या दृष्टीने जेवणानंतर कामदुधा गोळी, ‘संतुलन पित्तशांती गोळी’ घेण्याचा उपयोग होईल. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा ‘सॅनकूल चूर्ण’ घेण्याचा, दिवसातून दोन वेळा पोटावर ‘संतुलन रोझ ब्युटी तेला’सारखे तेल लावण्याचाही उपयोग होईल. भूक नीट लागते आहे हे चांगलेच आहे, मात्र आहारात तळलेले, आंबवलेले पदार्थ, मांसाहार, चीज, पनीर, जड कडधान्ये, शीतपेये, आइस्क्रीम वगैरे पदार्थ टाळणे चांगले. या उपायांचा फायदा होईलच, तरीही गरज वाटल्यास तज्ज्ञ वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला घेणे चांगले. 

-------------------------------------

माझे वय पंचवीस वर्षे आहे. मला काहीही गोड पदार्थ खाल्ला किंवा दूध प्यायले, दुधाचे पदार्थ खाल्ले की कफाचा त्रास होतो. तसेच माझे वजन देखील कमी आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
...... हरेश 
उत्तर -
पौष्टिक गोष्टी खाल्ल्यानंतर त्याचे रक्‍त-मांसादी धातूत रूपांतर न होता कफदोष तयार होणे हे अपचनाचे एक लक्षण आहे. तेव्हा पचन सुधारण्यासाठी जेवणानंतर ‘संतुलन अन्नयोग गोळ्या’ घेणे, जेवणानंतर लवणभास्कर चूर्ण घेणे, जेवणाच्या सुरुवातीला आल्याचा छोटा तुकडा सैंधवाबरोबर चावून खाणे हे उपाय योजता येतील. जेवताना गरम पाणी पिण्याचाही उपयोग होईल. आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा समावेश करण्याने कफदोष वाढणार नाही, उलट पचनाला मदत मिळेल. मात्र, दही, पनीर, चीज, दुधापासून बनविलेल्या मिठाया टाळणेच श्रेयस्कर. अर्धा कप दुधात अर्धा कप पाणी, चेचून घेतलेला सुंठीचा बोटाच्या पेराएवढा तुकडा आणि आठ-दहा वावडिंगाचे दाणे हे सर्व मिश्रण मंद आचेवर उकळण्यास ठेवावे, अर्धा कप पाणी उडून गेल्यावर खाली उतरवून गाळून घेऊन त्यात ‘संतुलन चैतन्य कल्प’ मिसळून प्यावे. यामुळे दूध पचायला मदत मिळेलच, शिवाय वजन वाढण्यासही हातभार लागेल. पचनशक्‍ती जसजशी सुधारेल तसतसे घरी बनविलेल्या ताज्या मिठाया या पचू लागतील व अंगीही लागतील. 

-------------------------------------

माझ्या आईचे वय बेचाळीस वर्षे असून तिचे हिमोग्लोबिन खूपच कमी असल्याचे समजले आहे. यामुळे आईला सतत थकवा जाणवतो.  हिमोग्लोबिन वाढण्यासाठी औषध, तसेच आहार सुचवावा.
...मानसी

उत्तर - हिमोग्लोबिन वाढण्यासाठी नैसर्गिक द्रव्यांची मदत घेणे श्रेयस्कर ठरते. डाळिंब, काळ्या मनुका, अंजीर, सफरचंद, केशर, तुपासह खजूर या गोष्टी आहारात समाविष्ट करण्याचा उपयोग होईल. तसेच स्वयंपाक करताना लोखंडाची पळी-कढई-तवा यांचा वापर करणेही चांगले. या उपायांनी थकवा कमी होईल, हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होईल. मात्र, हिमोग्लोबिन कमी होण्यामागे नेमके काय कारण आहे हे शोधून काढून त्यावर योग्य उपचार करणे आवश्‍यक होय, त्यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे चांगले. आयुर्वेदातील सुवर्णमाक्षिक, लोह, अभ्रक वगैरे नैसर्गिक द्रव्यांपासून बनविलेले ‘सॅन रोझ’ रसायन सकाळ-संध्याकाळ घेणे तसेच ‘संतुलन लोहित प्लस’ या गोळ्या नियमित घेणे चांगले.  

-------------------------------------

माझ्या मुलाचे वय एकवीस वर्षे आहे. त्याला उष्णतेचा खूप त्रास होतो. म्हणजे घाम खूप येतो, केस गळतात, केस कोरडेही झाले आहेत. यावर काही उपाय सुचवावा.
.... सुरेखा गायकवाड 
उत्तर -
उष्णता कमी होण्यासाठी मोरावळा, गुलकंद घेण्याचा उपयोग होईल. ‘संतुलन पित्तशांती गोळ्या’ घेणे, पादाभ्यंग करणे हे उपायही योजता येतील. सध्या तरुण मुलांमध्ये उशिरा झोपणे, वेळेवर न जेवणे, मोबाईल, संगणकाच्या सतत संपर्कात राहणे या कारणांमुळेही उष्णतेचा त्रास होताना दिसतो. त्यामुळे यातही योग्य बदल करण्याचा प्रयत्न करणे चांगले. घाम जास्ती येतो त्यासाठी ‘सॅन मसाज पावडर’ व कुळथाचे पीठ यांचे समभाग मिश्रण करून ते उटण्याप्रमाणे वापरण्याचा उपयोग होईल. केसांना ‘संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेल’ लावणे, केश्‍य, हाडांना पोषक द्रव्यांपासून बनविलेल्या ‘हेअरसॅन’सारख्या गोळ्या घेणे, केसांसाठी डाय, शांपू वगैरे रासायनिक द्रव्यांपासून बनविलेली उत्पादने न वापरणे हे सुद्धा उपयुक्‍त ठरेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com