esakal | प्रश्नोत्तरे
sakal

बोलून बातमी शोधा

Question and Answer

प्रश्नोत्तरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

च्यवनप्राश वर्षभर सर्वांनी घेतले तर चालेल का? आम्ही सर्व जण संतुलनचा सॅन अमृत काढा नियमितपणे घेतो. आम्ही राहतो त्या सोसायटीत अनेकांना संसर्ग झाला, मात्र आम्हा कोणालाही काही झाले नाही. आपले धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत. तसेच वाफारा घेताना त्यात काय टाकावे? कृपया मार्गदर्शन करणे.

... श्री. प्रशांत कुलकर्णी

उत्तर : सॅन अमृत चहा नियमितपणे घेण्याने आणि घसा-दुखी, सर्दी-खोकला वगैरे काही लक्षण दिसू लागली तर लगेच फॉर्म्युला के२ पासून बनविलेला काढा घेण्याने सर्वांचे आरोग्य उत्तम राहिल्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. अनुभव कळविल्याबद्दल आपले आभार. सर्व संस्कार व्यवस्थित करून व उत्तम प्रतीच्या घटकद्रव्यांपासून बनविलेला च्यवनप्राश घरातील सर्वांना आणि संपूर्ण वर्षभर घेता येतो. याने प्रतिकारशक्ती, ताकद, फुप्फुसांची कार्यक्षमता, मेरुदंडाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते. वाफारा घेण्यासाठी साधे पाणी वापरले तरी चालते, शक्य असल्यास तुळशी, पुदिना, गवती चहा, ओवा यापैकी मिळतील ती द्रव्ये टाकता येतील.

माझी मुलगी आर्किटेक्चरच्या दुसऱ्या वर्षाला आहे. ऑन लाइन शिक्षण चालू असल्याने तिच्या डोळ्यांवर खूप ताण येतो. डोळ्यांची आग होते. डोळे लाल होतात. कधी कधी डोके दुखते. कृपया आपण काही मार्गदर्शन करावे.

.... सौ. प्रभा काळे

उत्तर : झोपण्यापूर्वी थंड दुधाच्या किंवा चांगल्या प्रतीच्या गुलाबपाण्याच्या घड्या बंद डोळ्यांवर ठेवण्याचा उपयोग होईल. दिवसा सुद्धा अशा घड्या ठेवणे चांगले. नियमित पादाभ्यंग करणे, मानेला व डोक्याला रोझ ब्युटी तेलासारखे तेल लावणे, डोळ्यांमध्ये सुनयन तेल टाकणे, गुलकंद, संतुलन पित्तशांती गोळ्या, धात्री रसायन घेणे हे सुद्धा चांगले. संगणकाचा अतिवापर जसा उष्णता वाढवायला कारणीभूत होतो, तसेच अति जागरण सुद्धा त्यात भर घालणारे असते. तेव्हा रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत किमान ६-७ तास तरी शांत झोप घेण्यासाठी प्रयत्न करावेत.

लॉक डाउन सुरू झाल्यापासून माझे वजन वाढत चालले आहे. गेल्या दीड वर्षात माझे वजन १० किलो वाढले आहे. मी सध्या रोज नियमित सूर्यनमस्कार करतो आहे. या व्यतिरिक्त काय उपाय करता येतील?

... श्री. परेश मालपाठक

उत्तर : सूर्यनमस्कार करणे उत्तम आहेच, तसेच रोज अर्धा तास चालण्यास जावे. बरोबरीने रोज अभ्यंग करण्याचा आणि स्नानाच्या वेळी उद्वर्तन म्हणजे उटणे लावून चोळून मग स्नान करण्याचा उपयोग होईल. संतुलन अभ्यंग तीळ तेलाचा अभ्यंग तर सॅन मसाज पावडर हे उटणे वापरणे चांगले. रात्री नेहमीसारखे जेवण न करता फक्त मुगाचे कढण, आमसुलाचे सार किंवा फळभाज्यांचे एकत्रित सूप घेणे, वेळी अवेळी भूक लागल्यास साळीच्या लाह्या किंवा मुगाचा लाडू खाणे, दुपारचे जेवण १२ ते १ च्या दरम्यान करणे, उकळलेले गरम पाणीच पिण्यासाठी वापरणे हे सुद्धा हितावह ठरेल. मेदपाचक वटी, चंद्रप्रभा वटी घेणे, शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म करणे, त्यानंतर लेखन बस्ती घेणे हे सुद्धा वाढलेले वजन कमी करण्यासाठी उत्तम गुणकारी ठरते.