मुलांचे  निरीक्षण करा!

संतोष शेणई
Friday, 4 May 2018

मूल तन-दुरुस्त व मन-दुरुस्त हवे. त्याचे वजन, उंची याबरोबरच त्याचे शाळेतील वावरणे याचेही निरीक्षण करायला हवे. मुलांमधील कमतरता वेळीच ओळखून उपचार करायला हवेत.

आपल्या मुलाची नीट वाढ होत नाही, वजन वाढत नाही, अशी अनेक आयांची तक्रार असते. आपले बाळ कसे गुटगुटीत दिसले पाहिजे, असे प्रत्येक आईला वाटते. पण हा गुटगुटीतपणा आरोग्याला पूरक आहे की त्रासदायक आहे, याचा विचार आई करीत नाही. शेजारचे मूल, मैत्रिणीचे मूल, नातेवाईकाचे मूल यांच्याशी आपल्या मुलाची तुलना करीत आई हिरमुसली होते. कोणत्याही आईने एक पथ्य पाळले पाहिजे, ते म्हणजे दुसऱ्या मुलाशी आपल्या मुलाची कधीच कोणत्याच पातळीवर तुलना करायची नाही. कारण मुलगे आणि मुली या काही स्त्री-पुरुषांच्या नुसत्या लहान प्रतिकृती नसतात. प्रत्येक मुलाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यानुसार त्यांना वाढू द्या. पण त्याच वेळी त्यांचे निरीक्षण करा. ते अगदी गुटगुटीत होऊ नये की अगदीच हाडकुळे असू नये. त्याचे वजन योग्य प्रमाणात असायला हवे. सुरवातीला मुलांच्या वजन-उंचीचें गणित बघू. जन्मतः मुलाचे वजन साधारणतः अडीच ते तीन किलो इतके असते. पाच महिन्यांच्या बाळाचे वजन जन्माच्या वेळेच्या वजनाच्या दुप्पट हवे. आईचे दूध विनासायास मिळत असल्याने पाच-सहा महिन्यांच्या बाळाचे वजन दुप्पट होण्यात अडथळा येत नाही. साधारण सहा महिने पूर्ण झाल्यावर बाळाला पूरक आहार सुरू केला पाहिजे. येथेच बाळाची हेळसांड होते. त्यामुळे वर्षाच्या बाळाचे वजन जन्माच्या तिप्पट झाल्याचा आनंद फारच कमी पालकांच्या चेहऱ्यावर दिसतो. पहिल्या वाढदिवसानंतर वजनाच्या वाढीचा वेग कमी झालेला असतो. दोन वर्षे पूर्ण होतात तेव्हा वजन जन्माच्या चौपट (म्हणजे जन्मतः अडीच किलो असेल, तर दोन वर्षांनी दहा किलो) इतपत वाढलेले असते. यानंतर दर वर्षी साधारणपणे एका किलोने वजन वाढत जाते. आता उंचीचे गणित पाहू. जन्माच्या वेळी उंची असते पन्नास सेंटिमीटर. एक वर्ष पूर्ण होते तेव्हा ती पंचाहत्तर सेंटिमीटरपर्यंत वाढलेली असते. चार वर्षे पूर्ण होतात, तेव्हा उंची जन्माच्या दुप्पट असते (म्हणजे अंदाजे शंभर सेंटिमीटर). नंतर पौंगडावस्था सुरू होईपर्यंत दर वर्षी सहा सेंटिमीटर इतकी उंची वाढते. मुला-मुलींच्या पोषणात कमतरता असेल, तर वजन-उंचीवर परिणाम होतो. त्या-त्या वयासाठी वजन आणि उंची किती असावी, याचे खास भारतीय मुलांसाठीचे तक्ते इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने तयार केले आहेत. एक ते पाच वर्षे या वयोगटातील मुलांच्या दंडाचा घेर १३.५ सेंटिमीटरपेक्षा कमी असेल, तर ते मूल कुपोषित समजावे. दीर्घकालीन कुपोषणाचा उंचीवर परिणाम होतो. लोह कमी पडल्यामुळे पंडुरोग (ॲनिमिया) होतो. हेही कुपोषणच असते. मुलांचे कुपोषण होणार नाही याची पालकांनी काळजी घेतली पाहिजे. 

लठ्ठपणाचा आजार
खाल्लेले मुलांच्या अंगी लागले म्हणजे आईमंडळी खूष असतात. हे अंगी लागणे म्हणजे मुले गुटगुटीत दिसणे असते. मुले गुटगुटीत नको,  सुटसुटीत असली पाहिजेत. सडपातळ मुले असतील तर ती आरोग्यवान समजायला हरकत नाही. मुले स्थूल असणे, अधिक वजनाची असणे हे त्यांच्या लठ्ठपणाच्या आजाराचे लक्षण म्हणावे लागेल. गेल्या काही वर्षांत मुलांमधील लठ्ठपणा ही एक महत्त्वाची समस्या होऊ लागली आहे. लठ्ठपणा हे एक प्रकारचे कुपोषणच आहे. गुटगुटीत म्हणजे सुदृढ, हे समीकरण अगदी चुकीचे आहे. हे वजन शक्‍तीचे निदर्शक नसते, तर ते अशक्तपणाचेच लक्षण असते. लठ्ठपणा कोणत्याही वयात वाईटच; पण लहान वयातील लठ्ठपणा हा अधिकच वाईट असतो. लहानपणी स्थूल असलेली मुले मोठेपणीही स्थूलच राहतात. या मुलांना हृदयविकार, मधुमेह होण्याची शक्‍यता सडपातळ मुलांच्या मानाने जास्त असते. सांध्याचे विकारही त्यांच्यात जास्त आढळतात. जाड्या/जाडी अशी सतत टिंगल झाल्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास कमी होतो. बदलत्या जीवनपद्धतीमुळे अतिउष्मांकाचे चटकदार पदार्थ, शीतपेये, चॉकलेट्‌स वगैरे सर्रास मुलांच्या पोटात जाऊ लागले आहेत. टीव्ही, संगणक यांसारख्या बैठेपणाला खतपाणी घालणाऱ्या सवयी जडल्या आहेत. टीव्हीसमोर बसल्या बसल्या मुले नकळत खातात. टीव्हीवरच्या जाहिरातीसुद्धा चविष्ट खाण्या-पिण्याच्या पदार्थांच्याच असतात. त्यामुळे मुलांचा आपोआपच त्याकडे ओढा वाढतो. बाजारपेठेने मुलांकडे लक्ष केंद्रित करून आपला माल विकणे हे व्यापारशास्त्राच्या दृष्टीने गैर नाही; पण त्यामुळे आपण आपली उगवती पिढी कमकुवत करतो आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. आपले मूल सर्व बाबतीत कमजोर असू नये असे वाटत असेल तर पालकांनीच सावधगिरी बाळगली पाहिजे.

शाळेतून आल्यावरही मुले गृहपाठ आणि शिकवणी यासाठी नुसती बसूनच असतात. मैदानी खेळ जवळ-जवळ खेळले जातच नाहीत. लठ्ठपणा टाळण्यासाठी शाळकरी मुलांना दिवसाकाठी कमीत कमी एक तास व्यायाम करण्याची सवय सक्तीने लावली पाहिजे. सक्ती करून सवय लागली की मग ती स्वतःहून व्यायामाला जातील. खेळायला जातील. शाळा सुटल्यावर मुलांनी मैदानावर खेळावे यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. अभ्यास नंतर आधी मैदानावरचा खेळ यासाठी पालकांनी आग्रही असले पाहिजे. गृहपाठ आणि शिकवणी इतकाच व्यायामही महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवायला हवे. 

मुलांच्या खाण्याच्या पदार्थांकडेही लक्ष द्यायला हवे. चॉकलेट, गोळ्या, केक, बिस्किटे, चिप्स, शीतपेये इत्यादींचे सेवन कमी करायलाच हवे. त्याऐवजी फळे, भाज्या यांचा आहारात अधिक समावेश होणे गरजेचे आहे. शाळेच्या डब्यात दाण्याचे लाडू, पोहे, उप्पीट, थालीपीठ यांसारख्या पौष्टिक गोष्टी दिल्या पाहिजेत. शाळेबाहेरील गाडीवाल्यांकडे विद्यार्थ्यांचे पाय वळणार नाहीत, हे पाहिले पाहिजे. म्हणजे लठ्ठपणाला आवर घालण्याचा एक पर्याय तुम्ही निवडलेला असेल. मुलाची वय, उंची, वजन याकडे लक्ष द्या. मूल सुदृढ हवे, स्थूल नको हे पक्के लक्षात ठेवा.

मैदानी खेळ हवाच!
बऱ्याच मुलांना शाळेतील शारीरिक शिक्षणाचा तास आवडत नाही. मुलांना हा तास का आवडत नाही, हे जाणून घेतले पाहिजे. कारण खरे तर गणित, शास्त्र, भूगोल, भाषा आदींच्या गराड्यातून बाहेर पडून मैदानावर मुक्तपणे खेळण्याची संधी हा तास देत असतो. पण यातला बराचसा वेळ त्याच त्या प्रकारच्या सामुदायिक कवायती करण्यात जातो. त्या कवायत प्रकारांचे क्रमांक लक्षात ठेवणे, त्यानुसार हात समोर, बाजूला, वर, खाली असे हातवारे करण्याचा मुलांना कंटाळा येतो. मग त्या सक्तीला मुले कंटाळतात. व्यायामाचा आनंद मुले घेऊ शकत नाहीत. व्यायाम करण्यापूर्वी, प्रत्यक्ष करताना आणि केल्यानंतर आनंद वाटला पाहिजे. शारीरिक शिक्षणाच्या तीस ते पस्तीस मिनिटांच्या ‘तासा’त घाम निघूनही आनंद मिळायला हवा. या तासात विविध खेळांतून आनंद तर मिळतोच, शिवाय क्रीडाकौशल्येही निर्माण होतात. इतरांबरोबर आपले समायोजन घडते. ॲथलेटिक्‍समधील गोळाफेक, उड्या मारणे, धावणे ही मूलभूत कौशल्ये अगदी आवश्‍यक आहेत. जिम्नॅस्टिक्‍समुळे शरीराला चपळपणा, डौल प्राप्त होतो. पोहण्यामुळे आपले रक्ताभिसरण, श्‍वसन सुधारते. या तीनही व्यायाम प्रकारांना ‘मदर स्पोर्टस’ म्हणतात. योगासने, दंड-बैठका, सूर्यनमस्कार या सर्वांमुळे शरीराबरोबर मनाचीही घडण होत असते. शालेय वयात शरीर बलवान, काटक, निरोगी बनायला हवे. आत्मविश्‍वास जागृत व्हायला हवा. हार-जीत दोन्हीही समजूतदारपणे स्वीकारायचे, हे खेळताना शिकता येते. चालण्या-बोलण्यात डौल येतो, शिस्त येते, रोजचे काम अधिक कौशल्यपूर्ण करता येते. आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसते. यासाठी आपण मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम होईल, असा व्यायामाचा प्रकार निवडणे चांगले असते. सूर्यनमस्कार हा योग्य असा व्यायाम आहे. नुसतेच जोर, नुसत्याच बैठका, नुसतेच धावणे यातून सर्वांगाला व्यायाम होत नाही. मोकळ्या मैदानावर सांघिक खेळ खेळणे, पोहणे, टेकडी चढणे, दूरवर सायकल चालवणे, हे सर्वच व्यायामप्रकार उपयुक्त आहेत. आपल्या वयाच्या मुलांबरोबर स्पर्धा करून आपण कशात कमी पडतो ते शोधावे. मुलाला केवळ मैदानात सोडून पालकांनी मोकळे होता नये. तर खेळणाऱ्या मुलाचे निरीक्षण करायला हवे. फुटबॉलची किक लांब का जात नाही, की चेंडू पळवत नेताना दम लागतो, की पायाची हालचाल योग्य रीतीने करता येत नाही, की फटका मारताना शरीराचा तोल नीट सांभाळता येत नाही, याचा शोध घेऊन विशेष व्यायाम करावा. त्यामागची कारणे शोधावीत. शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्वाचे घटक म्हणजे रक्ताभिसरण, श्‍वसन, ताकद, दमसास  आणि लवचिकता. शालेय जीवनातच या क्षमतांचा योग्य विकास झाला, की भावी आयुष्य सुखावह होते. म्हणून मुलांनी रोज सायंकाळी खेळायलाच हवे. अभ्यासाच्या जोडीला संगीत, नृत्य, चित्रकला, हस्तकला अशा एखाद्या कलेची, छंदाची जोपासना करावी. त्यामुळे नित्य कामात थोडा बदल होऊन विरंगुळा मिळतो आणि मन प्रसन्न राहते. 

मूल अभ्यासात मागे पडतेय?
एखादे मूल अभ्यासात मागे पडताना दिसते. म्हणजे ते बाकी चलाख असते, पण अभ्यासात त्याची बुद्धी चालत नाही, असे त्याच्या पालकांचे म्हणणे असते. त्याच्या शिक्षकांनाही तसेच वाटते. पण अशा वेळी मुलांचे शिक्षकांनी निरीक्षण करायला हवे. शिकताना मुलांची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता चांगली असायला हवी असेल, तर त्यासाठी त्याच्या रक्तातील साखरेची पातळी योग्य असली पाहिजे. मुलांना फळ्यावर लिहिलेले नीट दिसते का आणि शिक्षक बोलतात ते नीट ऐकू येते का? ते आले पाहिजे. एखादा विद्यार्थी वारंवार आजारी पडत असेल किंवा शाळेत बरेच दिवस आला नसेल, तर शिक्षकांनी त्याची विचारपूस करून पालकांना वेळेवर योग्य तो उपचार करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. विद्यार्थी शिकण्यासाठी सक्षम असणे अनेक घटकांवर अवलंबून असते. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता शिक्षकांना ठाऊक असते. ज्ञानेंद्रियांमधील उणिवा ओळखणे शिक्षकांना शक्‍य असते. म्हणजे असे की, एखाद्या मुलाला फळ्यावर लिहिलेले दिसण्यासाठी पुढच्या ओळीत बसावे लागत असेल, तर दृष्टिदोष असू शकतो. शिक्षक शिकवीत असताना काही मुले सारखी अं अं करतात. अशी मुले अंशतः बहिरी असू शकतात. डोळे आणि कान यांच्या बाबतीत लवकरात लवकर उपचार सुरू केला तर या ज्ञानेंद्रियांचे कार्य आणखीन बिघडत नाही. चालढकल केली, तर दृष्टी आणि श्रवणक्षमता कमी-कमी होत जाते. फिटनेसच्या बाबतीत ही दोन ज्ञानेंद्रिये तल्लख असणे फारच महत्त्वाचे आहे. मूल उंचीने कमी, बुद्धीने मंद अन्‌ सुस्तावलेले असेल, अभ्यासात मागे पडत असेल आणि बद्धकोष्ठतेची तक्रार असेल तर अशा मुलांमध्ये थायरॉईड हार्मोनची कमतरता नाही ना, हे रक्ताची तपासणी करून पडताळणे महत्त्वाचे असते.
 
आणखी काही गोष्टीं लक्षपूर्वक पाहा -
     मुले दात घासताना त्यांच्या हिरड्यांतून रक्त येते का? तसे असेल तर त्यांना ‘क’ जीवनसत्त्व कमी मिळते असे समजा व त्यावर उपाय शोधा.
     पायऱ्या चढणे, बससाठी पळणे, थोडे अधिक श्रम पडले तर सहन करण्याची ताकद या गोष्टी विनासायास होतात का? नसेल तर त्याच्या फुफ्फुसांची, हृदयाची ताकद कमी पडते आहे हे जाणा व उपचार करा.
     तो नियमित व्यायाम करतो का? त्याचे शरीर लवचिक, चपळ आणि सहनशील आहे का? दमसास, लवचिकपणा आणि ताकदीचे व्यायाम होतात का? 
     शाळेतून आल्यावर मैदानात जायचा उत्साह असतो का? खेळताना लवकर थकतो का? वरच्या मजल्यावरच्या वर्गात जाताना धाप लागते का? जर लोहाची कमतरता असेल किंवा हृदयाचा आजार असेल, तर मूल थकेल, त्याला धाप लागेल, साहजिकच शाळेतून आल्यावर पुन्हा मैदानात जायला तो उत्साही असणार नाही. त्याला वैद्यकीय मदतीची गरज आहे, हे जाणा.

त्या-त्या दिवसाचा अभ्यास आणि गृहपाठ त्याच दिवशी पूर्ण केला म्हणजे साचून राहत नाही. साचलेल्या गोष्टींचा मनावर ताण येतो आणि कार्यकुशलतेवर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे मुले मनाने निरोगीच असतात. आनंदी, हसरी मुले मनाने निरोगी आहेत असे समजायला हरकत नाही. स्पर्धा, हेवा, मत्सर, असूया, मनाला अक्षम, नादुरुस्त बनवतात. आपली मुले तंदुरुस्त हवीत असे वाटत असेल तर स्वतः पालकांनी तंदुरुस्त राहायला हवे. खांदे पडलेले, पाठ झुकलेली, मान ताठरलेली, पोट सुटलेले, चेहऱ्यावर ताण आणि थकवा असे पालक मुलांना दिसले तर त्यांच्यावरही नकारात्मकच परिणाम होतो. पालक तंदुरुस्त, स्मार्ट, सुडौल दिसले, तर मुलांनाही तसेच बनावेसे वाटेल. आई-बाबा घरात हसताना दिसले तर मुले हसायला शिकतील. आई-बाबांच्या चेहऱ्यावरचे ताण पाहून मुलेही कोमेजतात. मुलांबरोबर, कुटुंबीयांबरोबर खळखळून हसले, तर आपल्याबरोबर मुलांच्याही मनाची मरगळ निघून जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: santosh shenai article child health