अग्ऱ्यसंग्रह

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 27 April 2018

विषनाशक म्हणून शिरीष वृक्ष आठवावा, तर तारुण्यरक्षणासाठी आवळा सर्वश्रेष्ठ समजावा. सर्वांना अनुकूल, पथ्यकर औषधांमध्ये हिरडा उत्तम मानावा.

सेनापती जसा सर्व सेनेच्या अग्रभागी उभा असतो तसेच अग्र्यसंग्रहातील प्रत्येक द्रव्य ते ते कर्म करण्यात सर्वश्रेष्ठ असते. शूर आणि धाडसी सेनापती ज्याप्रमाणे युद्धात सेना विजयी करू शकतो, त्याप्रमाणे अग्र्यसंग्रहाच्या माहितीद्वारा रोगावर विजय मिळू शकतो. मागच्या वेळी आपण विडंग जंतनाशनामध्ये सर्वोत्तम असतात हे पाहिले. आता आपण या पुढची माहिती घेऊया. 

विषनाशक म्हणून शिरीष वृक्ष आठवावा, तर तारुण्यरक्षणासाठी आवळा सर्वश्रेष्ठ समजावा. सर्वांना अनुकूल, पथ्यकर औषधांमध्ये हिरडा उत्तम मानावा.

सेनापती जसा सर्व सेनेच्या अग्रभागी उभा असतो तसेच अग्र्यसंग्रहातील प्रत्येक द्रव्य ते ते कर्म करण्यात सर्वश्रेष्ठ असते. शूर आणि धाडसी सेनापती ज्याप्रमाणे युद्धात सेना विजयी करू शकतो, त्याप्रमाणे अग्र्यसंग्रहाच्या माहितीद्वारा रोगावर विजय मिळू शकतो. मागच्या वेळी आपण विडंग जंतनाशनामध्ये सर्वोत्तम असतात हे पाहिले. आता आपण या पुढची माहिती घेऊया. 

शिरीषो विषघ्नानाम्‌ - शिरीष नावाचा वृक्ष विषाचा नाश करणाऱ्या द्रव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असतो. शिरीष वृक्षाची पाचही अंगे म्हणजे मूळ, साल, पाने, फुले व फळे ही सर्वच विषघ्न असतात, त्यातही शिरीषाची फुले विशेषत्वाने विषघ्न असतात. घरात विषारी प्राणी, कीटक प्रवेशित होऊ नये यासाठी जी औषधे संग्रहित करून ठेवायची असतात, त्यात शिरीषाचा समावेश होतो. सर्पविषाचा प्रभाव कमी करण्यासाठी शिरीषपुष्पाचे नस्य व अंजन करण्याचे उल्लेख सापडतात. पूर्वी हवा शुद्ध करण्यासाठी नगरातील पताका, नगारे यांच्यावर विशिष्ट वनस्पतींचा लेप लावला जात असे, यातही शिरीष वृक्षाचा समावेश आहे. 

खदिरः कुष्ठघ्नानाम्‌ - सर्व प्रकारच्या त्वचारोगांवर खदिर वृक्ष सर्वोत्तम होय. पानात काथ टाकला जातो, तो या खदिर वृक्षाच्या गाभ्यापासूनच तयार केलेला असतो.

खदिरः शीतलो बल्यो कण्डुकासारुचिप्रणुत्‌ ।
तिक्‍तः कषायो मेदोघ्नः कृमिमेहज्वरव्रणान्‌ ।।
श्वित्रशोथामपित्तास्रपाण्डुकुष्ठकफान्‌ हरेत्‌ ।।
....भावप्रकाश
खदिर वीर्याने थंड, ताकद वाढविणारा, खाज, खोकला, तोंडाला चव नसणे यावर औषध म्हणून उपयोगी असतो. चवीला तुरट असून अवाजवी वाढलेली मेदधातू कमी करतो, जंत कमी करतो, प्रमेह, ताप, व्रण, कोड, सूज, आमदोष, पित्तदोष, रक्‍तदोष, पांडु, त्वचारोग यावर उत्तम असतो. रक्‍ताची शुद्धी करून खदिर सर्व प्रकारच्या त्वचारोगांवर उपयुक्‍त असतो. खदिरादि काढा, खदिरासव हे यासाठी वापरले जातात. त्वचारोग असणाऱ्या व्यक्‍तींनी स्नानाच्या पाण्यात खदिराचा काढा मिसळण्याचाही उपयोग होतो. 

रास्ना वातहराणाम्‌ - रास्ना नावाची वनस्पती वातशमन करणाऱ्या द्रव्यांमध्ये सर्वोत्तम असते. सांप्रतच्या काळात रास्ना म्हणजे नेमकी कोणती वनस्पती याबद्दल मतभेद असलेले आढळतात. परंतु ही वनस्पती बहुधा हिमालयात मिळणारी असून तिची मुळे सुगंधी व वातशमनासाठी उत्तम असतात. विशेषतः आमवातामध्ये रास्ना विशेष उपयोगी असते. 

आमलकं वयःस्थापनानाम्‌ - आवळा तारुण्यरक्षण करणाऱ्या द्रव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असतो. आवळा चवीला आंबट-गोड-तुरट असतो, वीर्याने थंड व रसायन गुणांनी परिपूर्ण असतो. आवळा आरोग्यासाठी इतका गुणकारी असतो, की त्याला दाईची उपमा दिली जाते. म्हणून त्याचे एक नाव धात्रीफळ असेही आहे. वय वाढले तरी म्हातारपणामुळे होणारे त्रास होऊ नयेत, शरीरशक्‍ती टिकून राहावी, धातूंमधली दृढता कायम राहावी यासाठी आवळा उत्तम असतो. आवळ्याचे चूर्ण तूप-साखरेबरोबर नित्य नियमाने घेण्याने तारुण्याचे रक्षण होतो. बहुतेक सर्व रसायनांमध्ये, उदा. च्यवनप्राश, धात्री रसायन वगैरेंमध्ये आवळा मुख्य द्रव्य असते. 
एवम्‌ आमलकं चूर्णं स्वरसेन भावितम्‌ ।
शर्करामधुसर्पिर्भिर्युक्‍तं लीढ्‌वा पयः पिबेत्‌ ।।
....सुश्रुत चिकित्सास्थान

आवळ्याच्या चूर्णाला आवळ्याच्या रसाच्या भावना दिल्या आणि असे चूर्ण साखर, मध, तुपासह चाटून वरून दूध प्यायले तर ते तारुण्यरक्षणासाठी उत्तम असते.

हरितकी पथ्यानाम्‌ - सर्वांना अनुकूल, पथ्यकर औषधांमध्ये हिरडा उत्तम असतो. 

पथ्य हा शब्द पथ म्हणजे शरीर स्रोतस या अर्थानेही वापरला जातो. शरीरातील सर्व स्रोतसांवर काम करणाऱ्या, त्यांच्यातील अडथळा दूर करणाऱ्या द्रव्यांमध्ये हिरडा सर्वोत्तम असतो. म्हणून मलावष्टंभापासून ते हृदयवाहिन्यांमधील अवरोधांपर्यंत सर्व विकारांवर हिरडा वापरणे सयुक्‍तिक असते. याशिवाय ऋतुपरत्वे निरनिराळ्या द्रव्यांबरोबर हिरडा घेतला तर तो रोगप्रतिबंधाचे उत्तम काम करतो किंवा निरनिराळ्या संस्कारांच्या योगे अनेक प्रकारची कामे करतो. उदा. हिरड्याचे नुसते चूर्ण घेतले तर त्यामुळे पोट साफ होते, मात्र तोच हिरडा शिजवून घेतला, तर मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतो. हिरड्याबरोबर अग्निसंस्कार करून तूप बनविले तर ते जीर्णज्वरावर म्हणजे अंगात मुरून राहिलेल्या तापावर काम करते वगैरे. आवळ्याप्रमाणे हिरडासुद्धा बहुतेक सर्व रसायनांत वापरलेला असतो. असे म्हटले जाते की जी व्यक्‍ती रोज दोन हिरडे गूळ, मध, सुंठ, मिरी, पिंपळी किंवा सैंधवाबरोबर सेवन करेल, ती शंभर वर्षांचे आयुष्य जगेल. 
अग्ऱ्यसंग्रहातील यापुढची माहिती आपण पुढच्या वेळी घेऊ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shirish tree Antidote